Whether Mohite Patil Family From Akluj Succeed in keeping their political bastion
Whether Mohite Patil Family From Akluj Succeed in keeping their political bastionSarkarnama

अकलूजची मोहिते-पाटलांची राजकीय गढी पुन्हा सावरणार का?

मोहिते-पाटील हे अकलूज तालुक्याच्या आणि परिणामी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारे घराणे. त्यामुळे त्यांचे राजकारण संपू शकत नाही. असं बोललं जाते...खरोखरंच असे आहे का हे जाणून घेण्यासाठी आधी या घराण्याचा इतिहास जाणून घ्यायला हवा....काय आहे या घराण्याचा इतिहास...या घराण्याचे राजकारण? खरोखरच या घराण्याचे राजकारण संपते आहे की नव्या उभारीच्या दिशेने जाते आहे...हे जाणून घ्या...आणि मग बनवा आपले मत.....

राजकारणी घराणी कशी असतात...त्यांची जडणघडण कशी होते....त्यांच्या आयुष्यातले चढ-उताराचे प्रसंग हा राजकारण आवडणाऱ्यांच्या अभ्यासाचा आणि कुतुहलाचा विषय. तालुका आणि जिल्हा आणि काही अभ्यासक सोडले तर या घराण्यांचा इतिहास फारसा कुणाला माहित नसतो. आपण त्या-त्या वेळी अशा राजकारण्यांचे अधिक-उणे पाहतो. चर्चा करतो आणि सोडून देतो...पण खोलात शिरले तर हा इतिहास वाचणे हे खरोखरच रंजक असते. मोहिते-पाटील हे अकलूज तालुक्याच्या आणि परिणामी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारे घराणे. त्यामुळे त्यांचे राजकारण संपू शकत नाही. असं बोललं जाते...खरोखरंच असे आहे का हे जाणून घेण्यासाठी आधी या घराण्याचा इतिहास जाणून घ्यायला हवा....काय आहे या घराण्याचा इतिहास...या घराण्याचे राजकारण? खरोखरच या घराण्याचे राजकारण संपते आहे की नव्या उभारीच्या दिशेने जाते आहे...हे जाणून घ्या...आणि मग बनवा आपले मत.....

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ७५ वर्षातील मातब्बर घराणे अशी अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याची ओळख. स्वातंत्रपूर्व काळापासून या घराण्याची तालुक्यावर व नंतरच्या काळात साऱ्या सोलापूर जिल्ह्यावर घट्ट पकड होती. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या गटाचे नेतृत्त्व हे विजयसिंह मोहिते पाटलांकडे होते. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्या वेळी पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय 'दादा'गटाने घेतला आणि राज्यात वेगळी समीकरणे आकाराला आली. 1980 ते 95 पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रीमंडळात होते. भाजप आणि सेने यांच्या युतीचे सरकार आल्यानंतर विजयदादांचा लाल दिवा गेला. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर 1999 ते 2009 हा मोहिते पाटलांनी पुन्हा सुवर्णकाळ अनुभवला. घरात अनेक पदे आली. मात्र गेल्या दहा वर्षांत अकलूजच्या या राजकीय गढीला हादरे बसू लागले आहेत. या हादऱ्यातून गढी सावरणार की ढासळणार यावर आता सोलापूरचे राजकारण ठरणार आहे...

मोहिते पाटील काही निवडून येत नाहीत, लावा पैज!

विधानसभेची 2009 ची निवडणूक रंगात होती. तब्बल 40 वर्षांनंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने बरीच राजकीय उलथापालथ झाली होती. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा शरद पवार, छगन भुजबळ, आऱ. आर. पाटील आणि अजित पवार यांच्याकडे होती. अजित पवार हे स्टार प्रचारक असल्याने त्यांची मुलाखत घेण्यासाठी म्हणून आम्ही काही पत्रकार सकाळीच अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचलो होतो. अजितदादांच्या काही बैठका सुरू होत्या म्हणून आम्ही पत्रकार तेथेच असलेल्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो. योगायोगाने हा कार्यकर्ता मंगळवेढा-पंढरपूर परिसरातील निघाला. साहजिकच याच मतदारसंघाचा विषय चर्चेत आला.

तसा मतदारसंघही महत्त्वाचा होता. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मंत्री विजयसिंह मोहिते पाटील निवडणूक लढवित होते. मोहिते पाटील, सोलापूरचे नेते, त्यांचा सर्व तालुक्यांत असलेला संपर्क यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असे आम्ही पत्रकार म्हणालो. पण तो राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता अजितदादांच्या घरातच आम्हाला सांगत होता. 'मोहिते पाटील काही निवडून येत नाही, लावा पैज!,' असे त्याने आत्मविश्वासाने म्हटले. आम्ही पैज काही लावली नाही. पण त्याने अजितदादांच्या घरात व्यक्त केलेला अंदाज इतका परफेक्ट निघेल, असे वाटले नव्हते. पण हा अंदाज एका मोठ्या राजकीय खेळीची सुरवात होती, हे नंतर लक्षात आले.

मोहिते-पाटलांचा सुवर्णकाळ असताना झालेला पहिलाच पराभव

राज्यात २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि मोहिते-पाटलांच्या राजकीय पतनाची जणू ती सुरवातच ठरली. मोहिते-पाटलांच्या या गढीला पहिला धक्का बसला तो २००९ विधासभा निवडणुकीत. या वर्षी निवडणूक आयोगाने मतदारसंघाची पुनर्रचना केली. यात माळशिरस हा मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. परिणामी या मतदारसंघातून तब्बल सहावेळा निवडून आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांना नव्याने तयार झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उभे करण्यात आले. या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. मोहिते-पाटलांचा सुवर्णकाळ असताना झालेला हा पहिलाच पराभव होता.

यापूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव कधीच झाला नव्हता. त्यांचे वडील स्वर्गीय शंकरराव मोहिते-पाटील यांचा जिल्हाभर असलेला दरारा. तरूण वयात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, १९८० साली पहिल्यांदा आमदार त्यानंतर सलग सहावेळा आमदारकी मिळविलेल्या मोहिते-पाटलांना हा मोठा झटका होता. राज्यातील राजकारण काहीही असो सोलापूर जिल्ह्याची सूत्रे अकलूजच्या शिवरत्न या बंगल्यावरून हालत. जिल्ह्यातल्या साऱ्या सहकारी संस्था मोहिते-पाटील यांच्या ताब्यात होत्या. जिल्ह्यातील कोणताही निर्णय शंकराव मोहिते-पाटील व त्यांच्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशिवाय होत नव्हता.

या पार्श्वभूमीवर २००९ च्या निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा होता. २०१४ लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी लाट त्यावेळी देशभर होती. या लाटेतही विजयसिंह २५ हजार मतांनी निवडून आले. त्याआधी त्यांचे चिरंजीव रणजीतसिंह यांना प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद, युवकचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले. राज्यसभेवर खासदार करण्यात आले. हयातभर मंत्री राहिलेल्या विजयसिंह यांनी बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण,

अशोक चव्हाण या सर्वांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद कायम राखले. काहीकाळ त्यांना उपमुख्यमंत्री होण्याची संधी पक्षाने दिली. या काळात सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटनही खाती त्यांनी प्रामुख्याने सांभाळली. सोलापूरचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे वर्षानुवर्षे होते. एवढेच नाही तर राज्याच्या राजकारणात त्यांच्या गटाचे म्हणून वीस ते 25 आमदार असावेत, असेही बोलले जात होते.

शंकरराव माने-पाटील हे मोहिते पाटील कसे झाले?

मोहिते-पाटलांचे मूळ गाव अकलूजजवळील वेळापूर. मूळ नाव माने-पाटील. नारायणराव मोहिते हे त्यांचे आजोबा. नारायणराव अकलूजचे पाटील होते. नारायणराव यांना मुलगा नव्हता. नारायणराव गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने आपल्या मुलीचा मुलगा म्हणजे शंकरराव माने या नातवाला दत्तक घेतले. त्यामुळे शंकरराव माने-पाटील दत्तक विधानानंतर शंकरराव मोहिते-पाटील झाले. स्वातंत्र चळवळीत आघाडीवर असलेल्या शंकरराव तसेच त्यांचे दोन बंधू सदूभाऊ व बाबासाहेब उर्फ मारूतराव यांना तुरूंगवास भोगावा लागला होता. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या चळवळीचे हे तीन्ही भावंडे कट्टर समर्थक होती.

१९४६ च्या सुमारास शंकराराव मोहिते-पाटील अकलूजचे सरंपच झाले. सुरवातीला या साऱ्या कुटुंबाचा ओढा शेतकरी कामगार पक्षाकडे होता. मात्र, कॉंग्रेसचा विचारदेखील तितकाच रूजलेला होता. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शंकरारावांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली. मात्र, ऐनवेळी ती नाकारण्यात आल्याने त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. मात्र, शेतकरी कामगारपक्षाचे उमेदवार तुकाराम जाधव यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केल्याने अपक्ष आणि शेकापचा पाठिंबा असलेले उमेदवार म्हणून त्यांनी कॉंग्रेसचे बलाढ्य उमेदवार माळीनगरचे जगन्नाथ गिरमे यांचा पराभव केला. मोहिते-पाटील पहिल्यांदा विधानसभेत पोचले.

राज्यात १९५२ च्या निवडणुकीनंतर राज्यात यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व कॉग्रेसमध्ये सर्वमान्य होऊ लागले. यशवंतरांनी राज्यातील साऱ्या मातब्बरांना कॉंग्रेसमध्ये सामील करून घेत राज्यात त्यांना सहकारी कारखानदारी सरू करून देण्याचा धडाका लावला. १९६० साली महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या कामास मोठीच गती मिळाली. शंकररावांचे स्वप्न असलेला कारखाना  यशवंतरावांच्या सहकार्याने अकूलजला उभा राहिला. १९६२ तसेच १९६7 च्या निवडणुकीत शंकरराव कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. या काळात त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बस्तान बसले होते.

गाजलेल लक्षभोजन बनलं निवडणुकीत उमेदवारी नाकरण्याचे कारण

१९७२ साली राज्यात आणि देशात मोठा दुष्काळ होता. याच काळात विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विवाह अकलूजला झाला. दुष्काळात खाण्याची भ्रांत होती. केंद्र आणि राज्य सरकारे हवालदिल झाली होती. या काळात त्या विवाहात एक लाख लोक जेवल्याची चर्चा देशभर झाली. वर्तमानपत्रात त्याच्या मोठ्या बातम्या आल्या. ही चर्चा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत गेली. त्याचा परिणाम असा झाला की यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न करूनही शंकरराव मोहिते-पाटील यांना १९७२ च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. तडजोड म्हणून त्यांच्याऐवजी त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही माणसाला उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली.

तडजोडीचा उमेदवार म्हणून मोहिते-पाटील यांच्या विश्‍वासातील चांगोजीराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. चांगोजीराव बिनविरोध आमदार झाले. आणीबाणीनंतर १९७७ च्या निवडणुकीत शंकरराव विरूद्ध पाणीवचे शामराव पाटील यांच्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत शंकररावांना पराभव पत्करावा लागला. त्यांचा हा पराभव आणि शामराव पाटील यांच्याशी असलेल्या त्यांच्या राजकीय वैराच्या अनेक कहाण्या आजही राजकीय कार्यकर्ते सांगत असतात. त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत शामराव पाटील यांच्या विरोधात लढून विजयसिंह महिल्यांदा विधानसभेत पोचले. त्यानंतर सलग २००४ पर्यंत सलग सहा निवडणुका त्यांनी जिंकल्या. 1990-95 चा अपवाद वगळता ते मंत्रीही राहिले.

घरातल्या नव्या पिढीने भारतीय जनता पार्टीची वाट धरली

विजयसिंह मोहिते पाटील २०१४ ते २०१९ या काळात खासदार होते. मात्र, राष्ट्रवादीत त्यांना फारसे स्थान नव्हते. परिणामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांचे चिरंजीव रणजीतसिंहांच्या नेतृत्वाखाली घरातल्या नव्या पिढीने भारतीय जनता पार्टीची वाट धरली. पंत्रपधान मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा नेत्रदीपक सोहळा करण्यात आला. विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील वगळता साऱ्या कुटुंबाने अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. विजयसिंहांनी स्वत: थेट प्रवेश केला नाही तरी त्यांची सारी ताकद नव्या पिढीच्या मागे होती. या निवडणुकीत फलटणचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामागे त्यांनी आपली सारी ताकद उभी केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली तरीही निंबाळकर मोठ्या फरकाने निवडून आले. गेल्या मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक लागली. या निवडणुकीतदेखील भाजपाने दिलेल्या नवख्या राम सातपुते यांना निवडून आणत गढ राखला खरा. पण एकेकाळी जिल्ह्यावर राज्य करणाऱ्या मोहिते-पाटलांच्या मर्यादा तालुक्यातदेखील या निवडणुकीने पहिल्यांदा स्पष्ट केल्या. याचे प्रमुख कारण म्हणजे आमदार सातपुते हे केवळ सुमारे अडीच हजार मतांनी निवडून आले.

मोहिते-पाटलांनी सारी शक्ती लावल्यानंतर आणि मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक असलेल्या तालुक्यातील छोट्या-मोठ्या घटकांनी केवळ भाजपासाठी जिवाचे रान करूनही केवळ अडीच हजार मतांनी आमदार सातपुतेंना विजय मिळाला. निवडणूक झाली. भाजपाची सत्ता आल्यानंतर रणजीतसिंहांना आमदारकी, मंत्रीपद मिळेल, असे वाटत असतानाच महाआघाडीची सत्ता आली. त्यामुळे मोहिते-पाटील यांची सत्तेची स्वप्ने सध्यातरी भंगली आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकीत मोहिते पाटलांना संधी मिळू शकते, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.

मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेने मोहिते पाटील यांना पछाडले होते

एकेकाळी जिल्ह्याच्या संपूर्ण सत्तेचे केंद्र असलेला अकलूजचा गढ ढासळायला लागल्याची चर्चा पहिल्यांदा मंगळवेढ्याच्या पराभवाने सुरू झाली. मात्र. त्याची सुरवात आधीच दहा वर्षापासून सुरू झाली होती. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. या काळातही विजयसिंह शरद पवार यांच्यासोबत राहिले. पक्ष स्थापन झाल्याबरोबर त्यांच्यासोबत सत्तादेखील आली. मोहिते-पाटलांना सत्तेतील भागीदारी मिळाली. त्यांच्याकडे त्यांच्या आवडीचे बांधकामखाते मिळाले. मात्र नंतर काहीतरी पवार आणि मोहिते यांच्यामध्ये बिनसले. नक्की काय बिनसले हे कोणी अधिकृतरित्या सांगितले नाही. मात्र माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी त्यावर 2019 मध्ये एका पत्रकार परिषदेत प्रकाश टाकला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातून उभे राहणार की पुन्हा शरद पवारच तिकडे जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर मोहिते हे थेट भाजपच्या व्यासपीठावर गेले.  त्या साऱ्या घडामोडींवर चर्चेवर भाष्य करताना माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला. ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेने विजयसिंह मोहिते पाटील यांना पछाडले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शरद पवार यांचा त्यांच्यावर राग होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना जून 2002 मधली होती.

तेव्हा भाजप-सेनेचे सरकार यायला 21 आमदार कमी पडत होते. ते मिळवून देण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांनी सांभाळली. त्यासाठी मला आणि ए. टी. पवार यांनाही संपर्क साधला होता. मी ही बाब शरद पवारांच्या कानावर घातली. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फुटीपासून तेव्हा वाचला होता. या साऱ्या घडामोडींनंतर मोहितेंशी शरद पवारांचे अंतर हे दोन गाड्यांच्या आदळण्याने अपघात होऊ नये, एवढेच सुरक्षित राहिले होते. पवारांच्या गाडीला मोहितेंची गाडी ओव्हरटेक करू शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपची बुलेट ट्रेन पकडली,``अशा शब्दांत ठाकरे यांनी भाष्य केले होते.

जिल्ह्यातूनच मोहितेंना आव्हान!

ठाकरे यांच्या तेव्हाच्या दाव्यावर पवार किंवा मोहिते यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. विजयदादा रूसू नयेत म्हणून पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री केले. सोबत  2003 पासून सोलापूर जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील छोट्या शिलेदारांना पक्षाने ताकद द्यायला सुरवात केली आणि या शिलेदारांनी मोहिते-पाटील यांनाही आव्हान दिले. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात नेतृत्व उभे राहिले त्यांनी अजित पवारांना आपला नेता मानायला सुरवात केली त्यातच माळशिरस तालुक्यातूनही मोहिते-पाटलांना आव्हान मिळू लागले.

या तालुक्यात मोठ्या संख्येने धनगर समाज आहे. गेल्या वीस-तीस वर्षात या समाजात शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या. त्यांच्यात जागृती झाली. अर्थिक सुबत्ता आली. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढू लागल्याने त्यांच्यातील नेतृत्व उभे राहू लागले. परिणामी मोहिते-पाटलांना मानणारा वर्षानुवर्षांचा धनगर मतदार मोठ्या संख्येने दूर गेला. त्यामुळे तालुक्यातील सत्तादेखील धोक्यात आली आणि मोहिते-पाटलांच्या गढाला हादरे बसू लागले. मोहिते पाटील कुटुंबातील ना कोणी आमदार ना खासदार अशी वेळ परत आली आहे.

सहकार गेला...महत्त्वही गेले!

मोहिते-पाटलांची सत्ता उभी होती सहकाराच्या भक्कम पायावर. एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते ती म्हणजे सहकारातील त्यांचे यश आणि अपयश. १९६० पासूनच्या त्यांच्या राजकारणाकडे पाहिले तर जोपर्यंत ते सहकारात यशस्वी होते तोपर्यंत ते राजकारणातदेखील यशस्वी झाल्याचे दिसते. मोहिते-पाटलांच्या राजकारणाची सुरवात ही खऱ्या अर्थाने सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर झाली. कारखान्यापाठोपाठ त्यांनी शिवामृत  दूध संघ सुरू गेला. येकेकाळी हा संघ राज्यात सर्वाधिक दूध संकलित करणारा संघ होता.

सदाशिवनगर येथे सुरू केलेला तालुक्यातील दुसरा सहकारी साखर कारखाना. रणजीत कुक्कुट पालन संस्थादेखील राज्यात अग्रगण्य होती. सुमित्रा पतसंस्था, शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँक तसेच अनेक छोट्या-मोठ्या पतसंस्थाचे जाळे त्यांनी तालुक्यात उभारले होते. ज्या काळात या साऱ्या संस्था यशस्वी ठरल्या. या संस्थांच्या सभासदांचे हीत झाले. त्या काळात मोहिते-पाटलांचे राजकारणदेखील बहरल्याचे दिसते. ज्या क्षणी या संस्था अर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या. त्याचा फटका या संस्थांच्या सभासदांना बसला. त्याचवेळी मोहिते-पाटलांचे राजकारणदेखील अडचणीत आले.

गढी सुरक्षित असल्याचा दावा?

या साऱ्या पडझडींवर भाष्य करताना मोहिते यांचे निकटवर्तीय गढी सुरक्षित आणि भक्कम असल्याचा दावा करतात. या घराण्याच्या गेल्या ७५ वर्षांच्या राजकीय इतिहासात असे अनेक चढउतार आले. आधी शंकरराव व आता विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली त्यातून यशस्वीरित्या मार्ग निघाला आहे. इतक्या अडचणीच्या काळतही सोलपूर जिल्हा परिषद, माळशिरस तालुका पंचायत समिती, अकलूजसारखी राजयातील मोठी ग्रामपंचायत मोहिते-पाटालांकडेच आहे. खासदार रणजीतसिंह नाईक०निंबाळकर, आमदार राम सातपुते यांना मोहिते पाटलांनीच निवडून आणले आहे. त्यामुळे गढी ढासळायची सोडा हादरेदेखील बसले नाही, असे त्यांचे कार्यकर्ते विश्वासाने सांगतात.

मोहिते-पाटील यांनी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा दिली आहे. त्यामुळे त्यांचे राजकारण संपू शकत नाही. उलट यापुढील काळात अधिक बहरेल, अशी भावना त्यांचे तालुक्यातील समर्थक ॲड. संजय मगर यांनी व्यक्त केली.अकलूजसारख्या शहराचा मोहिते-पाटील यांनी केलेला विकास. त्यांचे सहकारातील काम आणि नव्या पिढीकडे असलेली दूरदृष्टी यामुळे त्यांचे भविष्य अधिक उज्वल असल्याची भावना ॲड. मगर यांनी व्यक्त केली. राजकारण हे कधीच सरळ नसते. चढउतार हे होत असतात. त्यामुळेच आगामी काळात मोहिते पाटील घराणे राजकारणातील आपले बस्तान परत बसवणार का, हे काळच सांगेल....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com