Where was Dhananjay Munde when Ajit Pawar was taking deputy cm oath with Fadnavis | Sarkarnama

अजित पवार फडणविसांसोबत शपथ घेत होते तेव्हा धनंजय मुंडे खरच कुठे होते?

अजित पवार फडणविसांसोबत शपथ घेत होते तेव्हा धनंजय मुंडे खरच कुठे होते?

योगेश कुटे
बुधवार, 20 मे 2020

अजित पवार हे भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणार, हे ब्रेकिंग ट्विट त्यांनी केले होते. राज्यातील 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठे सत्तानाट्य घडले होते. सेनेने पवारांशी संपर्क कसा साधला, पवारांनी काॅंग्रेसचे मन कसे वळविले, त्याच वेळी ते भाजपशी कसे संवाद ठेवून होते, अजित पवारांची घालमेल का झाली, भाजपची गणिते कशी चुकली, फडणविसांनी काय खेळी केल्या, मातोश्रीमध्ये काय खलबते झाले, याचा सारा उहापोह आणि काही राजकीय धक्केही सूर्य़वंशी यांनी पुस्तकात दिले आहेत. हे सारे संकट पवारांनी कसे  परतवून लावले, आमदारांना डांबून ठेवण्यातील गमतजमती, त्यातील खाचखळगे, सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई याचे चित्रण यांनी त्यात केले आहे.

हाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबर 2019 रोजी भूकंप झाला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 23 नोव्हेंबरच्या सकाळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीसह महाराष्ट्राला हा धक्का होता. शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन पक्षांची 22 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरू असताना अचानक अजितदादांनी भाजपच्या तंबूत जाऊन सत्ता हस्तगत केली होती.

पण तिथे धनंजय मुंडेच नव्हते

राष्ट्रवादीच्या 38 आमदारांना त्यांनी शपथविधीच्या वेळी बोलविले होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी विमानेही सज्ज होती. या आमदारांना तेव्हाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-6 या बंगल्यावर एकत्र बोलविले होते. त्यानुसार काही आमदार रात्री तेथे आलेही होते. पण तिथे धनंजय मुंडेच नव्हते. अजित पवारांसोबत रात्री असणारे मुंडे अचानक गायब झाले होते. हे मुंडे नंतर सकाळी थेट मग यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांना दिसले. कार्यकर्ते त्यांना थेट ओढून शरद पवारांकडे नेत असल्याचे चित्र दूरचित्रवाहिन्यांवर दिसत होते. अजितदादांसोबत थपथविधीला नसलेले आणि पवारांकडेही दाखल न झालेले मुंडे बारा तास कोठे होते, हा प्रश्नच होता.

मुंडे बारा तास कोठे होते, या प्रश्नाचे उत्तर...

या प्रश्नाचे उत्तर पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या `चेकमेट` या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार हे भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणार, हे ब्रेकिंग ट्विट त्यांनी केले होते. राज्यातील 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठे सत्तानाट्य घडले होते. सेनेने पवारांशी संपर्क कसा साधला, पवारांनी काॅंग्रेसचे मन कसे वळविले, त्याच वेळी ते भाजपशी कसे संवाद ठेवून होते, अजित पवारांची घालमेल का झाली, भाजपची गणिते कशी चुकली, फडणविसांनी काय खेळी केल्या, मातोश्रीमध्ये काय खलबते झाले, याचा सारा उहापोह आणि काही राजकीय धक्केही सूर्य़वंशी यांनी पुस्तकात दिले आहेत. हे सारे संकट पवारांनी कसे  परतवून लावले, आमदारांना डांबून ठेवण्यातील गमतजमती, त्यातील खाचखळगे, सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई याचे चित्रण यांनी त्यात केले आहे.  

अजित पवारांना कशाची धास्ती होती?

सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांतील चाललेल्या सत्तास्थापनेच्या चर्चेवर नाराज होते. काॅंग्रेसच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या. त्यात काॅंग्रेसने विधानसभेचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद ही दोन्ही पदांची मागणी करून वादात आणखी ठिणगी टाकली होती. 22 नोव्हेंबरच्या रात्री शरद पवारांशी काॅंग्रेस नेत्यांनी हुज्जत घातली. याची चीड डोक्यात ठेवून अजित पवार हे देवेंद्र फडणविसांना त्याच रात्री भेटले होते. याच रात्री महाआघाडीच्या बैठकीतून बाहेर पडत उद्धव ठाकरे हे महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे शरद पवारांनी जाहीर केले होते. त्यामुळे भाजपला घाई करणे भाग होते. त्यात अजित पवारांना कोणीतरी सांगितले होते की उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तसेच शिवसेनेला हे मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी देण्यात आले असून त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळे यांना बसविण्याचे राष्ट्रवादीचे नियोजन आहे. त्यामुळे देखील अजित पवार यांनी भाजपशी नेत्यांशी संपर्क साधला, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

असा ठरला प्लॅन!

`भाजपशी राष्ट्रवादीची आधी बोलणी सुरूच होती. मात्र काॅंग्रेसने शिवसेनेसोबत मान्यता दिल्यानंतर पवारांनी शिवसेना आणि काॅंग्रेसशी जाण्याचे मनोमन ठरविले होते. त्यामुळे भाजपशी बोलण्याला काही अर्थ नव्हता. इकडे अजितदादा अस्वस्थ होते. अजित पवारांनी 22 नोव्हेंबरची बैठक संपल्यानंतर आपल्या जवळच्या माणसांमार्फत तब्बल 38 आमदारांना फोन केले.

त्यांना रात्री साडेबाराच्या सुमारास धनंजय मुंडेंच्या बी-6 बंगल्यावर बोलविले. या साऱ्या घडामोडींत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनाही सोबत घेतले होते. मात्र पटेल आणि तटकरे यांनी थेट बंडाला विरोध केला होता. आधी पक्षातील सर्वोच्च नेत्यांशी बोलून भाजपशी युती करावी, असा त्यांनी आग्रह धरला होता. मुंडे यांनीही ही वेळ भाजपसोबत जाण्याची नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अजितदादा ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. मुंडे यांची दोन्ही बाजूंनी अडचण झाली. राजकीय गुरू असलेल्या अजितदादांना साथ द्यावी की शरद पवारांच्या सोबत राहावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.

शेवटी मुंडे यांनी निर्णय घेतला. ते निवासस्थानापासून काही मिनिटे अंतरावर असलेल्या कफ परेड येथे एका मित्राच्या भाड्याने असलेल्या फ्लॅटवर पोहोचले. पहाटे तीनपर्यंत मुंडे यांना झोप आली नाही. तोपर्यंत राष्ट्रवादीचे काही आमदार ठरल्यानुसार मुंडे यांच्या बंगल्यावर येऊ लागले. या आमदारांची योग्य व्यवस्था लावण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड, पार्थ पवार यांची लगबग सुरू होती. सात खासगी विमाने या आमदारांना घेऊन जाण्यासाठी विमानतळावर तयार होती. या आमदारांना हरियाणातील एका हाॅटेलवर नेण्याचे नियोजन होते. घरातून निघताना या आमदारांनी एकमेकांना फोन करायला सुरवात केली होती. अजित पवारांनी बैठक बोलविण्याचा निरोप त्यांना देण्यात आला होता.

38 पैकी केवळ 15 आमदारच मुंबईला पोहोचले

अजित पवारांचा निरोप केवळ 38 आमदारांनाच देण्यात आला होता. ज्या आमदारांना हा निरोप नव्हता, त्यांना अशी काही `बैठक`मुंबईत होणार आहे, याची कल्पना नव्हती. पण या फोनाफोनीमुळे त्यांच्याही लक्षात हे आले. अजितदादा हे स्वतंत्रपणे असे पाऊल उचलत असल्याचे काहींच्या लक्षात आल्यानंतर 38 पैकी केवळ 15 आमदारच मुंबईला पोहोचले. इतरांनी साहजिकच अजितदादांसोबत जाण्याची तयारी दाखवली नाही. शरद पवारांशी थेट संपर्क असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांनी बैठक बोलविल्याची माहिती त्यांना दिली. शरद पवारांना 23 नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा-एकच्या सुमारास या घडामोडींची खबर लागली. त्यामुळे अजितदादांच्या योजनेची पवारांना कल्पना आली होती. मात्र ते यशस्वी होणार की नाही, याची त्यांना शंका होती. त्यानंतर पहाटे तीन वाजता पवारांनी अजितदादांसोबत किती आमदार आहेत, याची माहिती घेतली. केवळ 15 आमदार अजितदादांसोबत असल्याचे लक्षात आल्याने भाजप सरकार स्थापन करू शकणार नसल्याचे त्यांच्या लक्षात आले,` असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

राष्ट्रपती राजवट उठली

इकडे राजभवनमध्ये इंजिनिअरने साऊंड आणि मायक्रोफोन सिस्टिमचे काम पाहणाऱ्यांना रात्री तेथेच थांबण्यास सांगितले. काहीतरी घडामोडी सुरू असल्याची बातमीची चर्चा त्यामुळे सुरू झाली.  महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठविण्यासंदर्भात राजभवनवर कशी तयारी झाली. मुख्य सचिव अजोय मेहता यांना कसे बोलविण्यात आले. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, केंद्रिय गृह मंत्रालय कसे तयारीत होते. केवळ ई-मेलवर सारे संदेश देण्यात आले. फडणविसांनी कोणता यज्ञ करून शपथविधीला हजर झाले, याची रोचक माहिती सूर्यवंशी यांनी पुस्तकात दिली आहे. शपथविधीची बातमी दूरचित्रवाहिन्यांवर दिसल्यानंतर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा किस्सा यात देण्यात आला आहे. झोपेत असलेल्या वळसे पाटलांना त्यांच्या पत्नी किरण यांनी सांगितले की अहो, उठा अजित पवार हे फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतल्याचे दाखवत आहे. त्यावर वऴसे पाटील यांनी, अगं ती अजितदादांची शपथविधीची जुनी क्लिप असेल, असे सांगून पुन्हा झोपी गेले. सौ. वळसे यांनी पुन्हा इतर चॅनेल बदलून पाहिले तरी तीच बातमी होती. मग वळसे पाटील खडबडून जागे झाले. त्यांचाही सुरवातीला विश्वास बसला नाही. मग इतर फोन सुरू झाल्यानंतर त्यांना नक्की काय घडले, याची खात्री पटली.

अखेर दरवाजा तोडला!

फडणवीस आणि अजितदादा यांचा शपथविधी झाल्याचे कळाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांची इकडे धावपळ सुरू झाली. आमदारांची शोधाशोध सुरू झाली. जे आमदार फोन उचलत नव्हते त्यांच्याजवळच्या मंडळींना फोनाफोनी सुरू झाली. पण धनंजय मुंडे यांचाच तपास लागत नव्हता. मुंडे हे शपथविधीसाठी राजभवनावर पण हजर नव्हते आणि शरद पवारांनाही ते सापडत नव्हते. स्वतः पवारांनी त्यांना फोन केले. त्यांचे घर, कार्यालय येथे त्यांचा शोध घेतला. धनंजय यांचे लहाणपणापासून मित्र असलेले पुण्यातील तेजस ठक्कर यांच्याशी पवार बोलले. ठक्कर मुंबईत पोहोचले. त्यांनीही शोध सुरू केला.

अनेकांना वाटते ते अजित पवारांसोबत असावेत

अनेकांना वाटते ते अजित पवारांसोबत असावेत. मात्र तेथेही ते नव्हते. मग ठक्कर यांच्या कफ परेड येथील फ्लॅटवर शोध घेण्याचे ठरले. ठक्कर आपल्या फ्लॅटवर पोहोचले. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा दोनदा वाजवला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. वेळ तर निघून जात होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही दरवाजा उघडला न गेल्याने ठक्कर मग सोसायटीच्या सेक्रेटरीकडे गेले. फ्लॅटचा दरवाजा तोडण्याची गरज ठक्कर यांनी त्या सेक्रेटरीला सांगितली आणि आवाज झाला तर पोलिसांकडे जाऊ नका, असेही सांगितले. मग दरवाजा तोडला. आतमध्ये गेल्यानंतर पाहतात तो काय, मुंडे हे गाढ झोपलेले होते.

महाराष्ट्रात इकडे तुफान राजकीय नाट्य घडत असताना आणि सर्वत्र मुंडे यांचा शोध सुरू असताना ते निर्धास्त निद्रेच्या आहारी गेलेले होेते. मुंडे यांनी जेव्हा स्वतःचा मोबाईल चेक केला तेव्हा शरद पवार, अजित पवार व इतर नेत्यांचे शंभरहून अधिक मिस्ड काॅल होते. मुंडे यांना मग तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरला आणण्यात आले. तेथे त्यांची सर्वच जण वाट पाहत होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. (विनापरवानगी दरवाजा तोडला म्हणून फ्लॅटमालकाने ठक्कर यांना तो रिकामा करण्यासाठी नोटीस दिली.)

अनेक अर्थ या साऱ्या घटनांतून निघतात

धनंजय यांचा बंडाला पाठिंबा होता पण ते सहभागी नव्हते. सहभागी होते पण ते मनापासून नव्हते, मनापासून नसले तरी कृती पाठिंब्याचीच होती, असे अनेक अर्थ या साऱ्या घटनांतून निघतात. या साऱ्या प्रकरणाचा मुंडे यांच्या राष्ट्रवादीतील वाटचालीवर काही परिणाम झाला का, असा प्रश्न विचारला असता लेखक सुधीर सूर्यवंशी `सरकारनामा`शी बोलताना म्हणाले की नक्कीच परिणाम झाला आहे. शरद पवारांचे ब्लू आईड बाॅय म्हणून धनंजय ओळखले जात होते. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांना गृह किंवा जलसंपदा असे खाते मिळणार असल्याची चर्चा होती. ते मिळाले नाही. त्यामुळे साहजिकच पवार यांचा त्यांच्यावर पहिल्यासारखा विश्वास राहिला नाही, असे म्हणता येईल, असे मत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

सूर्यवंशी यांनी पुस्तकात केलेल्या दाव्यांविषयी धनंजय मुंडे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र तो होऊ शकला नाही.     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

महाराष्ट्र, Maharashtra, राजकारण, Politics, शरद पवार, Sharad Pawar, अजित पवार, Ajit Pawar, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, मुख्यमंत्री, धनंजय मुंडे, Dhanajay Munde, आमदार, पत्रकार