What is BJPs Plan for Ramrao Wadkute | Sarkarnama

वडकुते आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या जागी असते! भाजप त्यांची काय वासलात लावणार?ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

वडकुते आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या जागी असते! भाजप त्यांची काय वासलात लावणार?

Sarkarnama
शुक्रवार, 5 जून 2020

दीड महिन्यापुर्वी राज्यातील उद्धव ठाकरे सरकार अस्थिर बनले होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर विधानपरिषद निवडणूक पुढे गेल्याने उद्धव यांना सहा महिन्याच्या आत आमदार बनणे अवघड बनले होते. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रिक्त जागेवर ठाकरे यांची नियुक्ती करावी, असा ठराव मंत्रीमंडळाने दोनवेळा पाठवला होता. ती रिक्त जागा (एकूण 2) रामराव वडकुते व राहूल नार्वेकर यांच्या राजीनाम्यामुळे झालेली होती.

पुणे : एप्रिल- मे महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या दोन रिक्त जागांची चर्चा सुरू होती. त्या दोन जागा दोन रामराव वडकुते आणि राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या होत्या. हे दोघेही राष्ट्रवादीचे आमदार विधानसभा निवडणुकीपुर्वी राजीनामा देवून भारतीय जनता पक्षात दाखल झाले.

पदरी मात्र निराशा आली

त्यातील नार्वेकर विधानसभेत पोहचले दुसरे रामराव वडकुते यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडे कधी बघेल, यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

विधान परिषदेची आमदारकी ही सहा वर्षांची असते, शिवाय हे सभागृह बरखास्त होत नसल्याने प्रत्येक सदस्याला 6 वर्षांचा कार्यकाळ मिळतोच. कधीकधी राजकीय अस्थिरतेमुळे विधानसभा बरखास्त होतात, त्यामुळे विधानसभेतील आमदारांचा कार्यकाळ त्याचवेळी संपुष्टात येत असतो. तशी परिस्थिती विधान परिषदेच्या आमदारांबाबत नसते. राज्यपाल नियुक्त आमदार तर फक्त राज्य मंत्रीमंडळाच्या शिफारशीवरून झालेले असतात. त्यांचा आणि निवडणुकीचा काही संबंध येत नाही. या सुलभ प्रक्रियेतून वडकुते आणि नार्वेकर आमदार झाले होते.

या दोघांशिवाय विधानसभा निवडणुकीअगोदर विधान परिषदेच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला होता. अमरीश पटेल आणि चंद्रकांत रघुवंशी हे ते आमदार होत. दोघेपण काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. 2019 विधानसभा निवडणुकीपुर्वीची राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. अमरिश पटेल हे धुळे - नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते तर चंद्रकांत रघुवंशी हे विधानसभेच्या आमदारांनी निवडून द्यायच्या जागांमधून विधान परिषदेत गेले होते. रघुवंशी यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांच्या आमदारकीची मुदत 24 एप्रिलला संपली असती. अमरीश पटेल यांचा बराचसा कार्यकाळ शिल्लक होता. वडकुते, नार्वेकर, पटेल हे तिघेजण भाजपच्या महाभरतीत गेले तर चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेच्या गळाला लागले. या आमदारांचे राजीनामे आणि पक्षांतरावेळी राज्यात भाजप- शिवसेना महायुतीचेच सरकार येणार, असे स्पष्ट चित्र होते. काँग्रेस- राष्ट्रवादी लढतीत दिसत नव्हती. या चारही नेत्यांना आहे त्या पक्षात भवितव्य दिसत नव्हते.

आमदारकी सोडण्याचा निर्णय त्यांना उगाचच घेतला असेल कां?

नार्वेकरांना लगेच विधानसभेचे तिकीट हवे होते तर पटेलांना त्यांच्या रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीचे तिकीट मिळणार होते. मात्र रामराव वडकुते यांना कोणतीच थेट निवडणूक लढायची नव्हती तरीही त्यांनी राजीनामा दिला. हा निर्णय घेत असताना त्यांना वैयक्तिकरित्या काय आश्वासन मिळाले, हे बाहेर आले नाही. या परिस्थतीत आमदारकी सोडण्याचा निर्णय त्यांना उगाचच घेतला असेल कां? सध्या ज्या आमदारकीवर पाणी सोडत आहे ती तरी किमान मिळावी आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मंत्रीपद त्यांना अपेक्षित असणार! पण त्यांच्या मनासारखे काही घडलेच नाही. अनपेक्षितपणे भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले.

धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आमदारकी 

वडकुते यांना धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आमदार करण्यात आले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने त्यांची शिफारस केली असली तरी त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांना संधी दिली होती. वडकुते हे राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदाऱसंघातून निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. त्यानंतर ते राष्ट्रवादीचा धनगर चेहरा म्हणून पुढे आले. पुढे त्यांना अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्षही बनवण्यात आले. या पदाला राज्य़मंत्रीपदाचा दर्जा होता. जून 2014 मध्ये त्यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली. त्यानंतर सभागृह असो की समाजाचे मेळावे वडकुते हे धनगर आरक्षणाचा प्रश्न आक्रमकपणे मांडत होते. ते राष्ट्रवादी सोडतील, असे कोणाला वाटत नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीला गळती लागल्याचे पाहून ते भाजपच्या मेगाभरतीत सामील झाले.

आमदारकीचा राजीनामा देत असताना काय सांगितले कारण?

वडकुते यांनी आमदारकीचा राजीनामा देत असताना समाजाच्या आरक्षणाचे कारण सांगितले होते. प्रत्यक्षात भाजपने यासंदर्भात काही ठोस केलेले नाही. त्यामुळे वडकुते यांच्या निर्णयाचा सामाजिकदृष्ट्या काही फायदा झालेला नाही. वैयक्तिकदृष्ट्या त्यांनी स्वत:चे नुकसान करून घेतलेले आहे. त्यांनी जी आमदारकी सोडली, ती मिळणेही त्यांना दुरापास्त झालेले आहे. सद्या सार्वत्रिक निवडणूक नसल्याने भाजपला धनगर मतपेढीची लगेच आवश्यकताही नाही. शिवाय वडकुते यांचे उपद्रवमूल्य फार कमी आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.

त्यावेळी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नसता तर...

वडकुते यांनी त्यावेळी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित ते आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात दिसले असते. आज या मंत्रीमंडळात इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे धनगरांचे प्रतिनिधित्व म्हणून राज्यमंत्री आहेत. ही जागा वडकुते यांना मिळाली असती. भरणेंच्या तुलनेत वडकुते हे प्रभावी चेहरा होते, शिवाय राष्ट्रवादीला मराठवाड्यात परभणी- हिंगोलीलाही प्रतिनिधीत्व देता आले असते. हे स्थान वडकुतेंचे राष्ट्रवादीत होते, मात्र भाजपमध्ये त्यांच्या नावाची चर्चाही कुठे होताना दिसत नाही.

ही जागा वडकुते यांना मिळाली असती. भरणेंच्या तुलनेत वडकुते हे प्रभावी चेहरा होते, शिवाय राष्ट्रवादीला मराठवाड्यात परभणी- हिंगोलीलाही प्रतिनिधीत्व देता आले असते. हे स्थान वडकुतेंचे राष्ट्रवादीत होते, मात्र भाजपमध्ये त्यांच्या नावाची चर्चाही कुठे होताना दिसत नाही.

वडकुतेंचा भाजपने विचार न केल्यास

नजिकच्या काळात वडकुतेंचा भाजपने विचार न केल्यास त्यांच्यापुढे पश्चातापाशिवाय काही मार्ग असणार नाही. तेलही गेले तुपही गेले हाती धुपाटणे आले, अशी त्यांची अवस्था होवून जाईल. कारण त्याकाळात भाजपमध्ये गेलेल्या अमरीश पटेल यांची सोय भाजपने केलेली आहे. त्यांना धुळे- नंदूरबार प्राधिकारी मतदारंसघात उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या ही निवडणूक स्थगित असलीतरी अमरिश पटेल विधान परिषदेत निवडणून जाण्यास अडचण दिसत नाही. चंद्रकात रघुवंशी नंदूरबारमधील प्रभावी नेते आहेत. त्यांचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. या चौघांत वडकुते यांची सुरू असलेली पिछेहाट स्पष्टपणे दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

विधान परिषद, पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, राजकारण, Politics, राहुल नार्वेकर, Rahul Narvekar, आमदार, Nandurbar