What are the opportunities to become an entrepreneur instead of joining government jobs
What are the opportunities to become an entrepreneur instead of joining government jobsSarkarnama

तरुणांनो सरकारी नोकरीचा नाद सोडा आणि या क्षेत्रात उद्योजक व्हा! कोणत्या आहेत उद्योजक होण्याच्या संधी?

कोरोना या चिनी व्हायरच्या दुष्परिणामामुळे राज्य सरकारदेखील अर्थिक अडचणीत सापडलेय. सरकारी कर्मचाऱ्यांच्याही वेतनाचा प्रश्‍न भेडसावतोय. येत्या वर्षभरात सर्व प्रकारची नोकरभरती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या महिन्यात जाहीर केलाय. स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या सुमारे दहा ते बारा लाख तरुणांसमोर करिअरचा मोठा प्रश्‍न निर्माण झालाय. सरकारी अधिकारी बनण्याचे अऩेकांचे स्वप्न धुळीला मिळण्याच शक्यता आहे. त्यामुळे या लाखो विद्यार्थ्यांनी आता सरकारी नोकरीचा नाद सोडून रोजगार देणारे उद्योजक होण्याची जिद्द बाळगली पाहिजे.

रकारी नोकरीचे आकर्षण मोठे असते. जबाबदारी कमी, पगार जास्त आणि वयाच्या 58 वर्षापर्यंत फारसा ताण न घेता ही नोकरी करता येते असा समज आहे. निवृत्त झाल्यानंतर पुन्हा पेन्शन (आता रचना बदललीय) अशी खऱ्या अर्थाने सुरक्षित नोकरी असल्याने अनेकांचा कल तिच्याकडे असतो. त्यातील वरकमाईचेही आकर्षण अनेकांना असते. त्यामुळेच जागा दोनशे असल्या तरी परीक्षार्थी लाखोंच्या घरात असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साहेब व्हायचे स्वप्न असते. त्यामुळे ते सरकारी नोकरीतून साध्य होते.

डॉक्टर, इंजिनिअरपासून दूरशिक्षणाच्या माध्यमातून बी.ए.ची पदवी घेतलेला विद्यार्थ्यांही याकडे ओढले जातात. क्षेत्रांकडे पारंपरिक बीए. बीकॉम, बीएस्सी या अभयासक्रमांबरोबरच मेडिकल, फार्मसी, अभियांत्रिकी, कृषी या क्षेत्रातील पदवीधरांचा ओढा वाढलेला आहे. या परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांची वर्गवारी केली तर पोलीस उपनिरीक्षक, मंत्रालयीन सहायक, विक्रीकर निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या पदांच्या भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकुण संख्येच्या ७५ टक्के आहे.

कृषी, अभियांत्रिकी, मेडीकल, फार्मसी या प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात नोकरी-रोजगाराची संधी शोधण्यास संधी असते. मात्र, उर्वरित ७५ टक्के विद्यार्थ्यांकडे कौशल्याचा अभाव असल्याने नोकरी-रोजगाराच्या संधी त्यांच्यापासून दूर असतात. परिणामी हे विद्यार्थी पूर्णत: स्पर्धा परीक्षांमधून आपल्याला काहीतरी संधी मिळेल याकडे वर्षानुवर्षे डोळे लावून बसलेले असतात. पण आताची परिस्थिती या वर्गासाठी मोठी कठीण आहे. किमान ज्या पदांची आशा लावून पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करता येईल, अशा परीक्षाच होणार नसल्याने पुढे करायचे काय हा मोठा प्रश्‍न साऱ्यांच्यात पुढे आहे. नोकरी-रोजगाराची आवश्‍यक कौशल्यं आत्मसात केलेली नाहीत, ही या वर्गाची सर्वात मोठी समस्या आहे.

'लॉकडाऊन’च्या काळात पुण्यातून सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांना घरी जावे लागले 

'लॉकडाऊन’मध्ये पुण्यातून सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी घरी परतले

स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे मुख्य केंद्र पुणे आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात पुण्यातून सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी पुण्याबाहेर गेले. यातील जवळपास दीड लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे होते. यावरून पुण्यातील या विद्यार्थ्यांची संख्या आणि स्पर्धेचे स्वरूप लक्षात येईल. ‘लॉकडाऊन’च्या काळातील राज्याची, देशाची अर्थिक, परिस्थिती पाहता यातला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग रोजगारासाठी पुण्या-मुंबईत परत न जाता ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी शोधण्याची शक्यता आहे. शहरांची परिस्थिती पाहता रोजगाराच्या संधी शहरात निर्माण होण्यात सध्या मोठ्या अडचणी आहेत. शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे गावी गेलेला मोठा वर्ग लवकर परत शहरात येण्याजी शक्यता नाही.

त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार-स्वयंरोजगार कसे निर्माण करता येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शेतीपूरक व्यवसाय ही मोठी संधी!

शेती हाच आजही आपल्या ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. शेतीतील नवे प्रयोग रोजगाराच्या नव्या संधी देऊ शकतो. ग्रामीण भागात दूग्ध व्यवसाय ही रोजगाराची मोठी संधी आहे. दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचे संकलन, उत्पादन ही सध्याचे एक मोठे साधन बनू शकते. गाई-म्हशींचा गोठा करून स्वत: दूध उत्पादन करण्याबरोबरच दूध संकलन हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. शहरी भागात किंवा राज्यभर दुधाचा मोठा ब्रॅण्ड असलेल्या अनेक दूध कंपन्या तसेच सहकारी संस्थांची दूध संकलन केंद्रे राज्याच्या विविध भागात आहेत.

दूध संकलनाला लिटरला एक रूपयांपासून तीन रूपयांपर्यंत कमीशन देण्यात येते.स्वत:ची किंवा भाडेतत्वार असलेली सुमारे पाच ते सात गुंठे जागा यासाठी पुरेशी ठरते. इतर आवश्‍यक खर्च संबंधित कंपनी करते. एका केंद्रावर रोज दहा-दहा हजार लिटरचे संकलन करणाऱ्या संस्था राज्याच्या ग्रामीण भागात उभ्या राहिल्या आहेत. यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे.एका गावात रोज एक लाख लिटर दुधाचे संकलन करणाऱ्या संस्थादेखील राज्याच्या अनेक जिल्ह्यात आहेत. सध्या राज्यातील अनेक गावांची अर्थव्यवस्था या साऱ्या दूध संकलन केंद्रावर अवलंबून आहे. पंधरा-वीस वर्षापूर्वीच्या जिल्ह्या-जिल्ह्यातील सहकार सम्राटांच्या हाताशी असणाऱ्या सहकारी दूध संस्था लोप पावून खासगी तत्वावरील या संस्था सध्या गावांचे अर्थकारण बनल्या आहेत.

नर्सरीचे नवे प्रयोग

ग्रामीण भाग आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. शहरातल्या जवळपास साऱ्या गोष्टी ग्रामीण भागात पोच्या आहेत. शेतीत फळबागांची जणू क्रांतीच घडली आहे. द्राक्षे, डाळींब, मोसंबी, लिंबू, केळी, चिकू, पेरू, संत्री आणि आंब्याच्या फळभागा ग्रामीण भागाचे वैशिष्ट ठरत आहे. या बागांसाठी लागणाऱ्या रोपांपासून विविध प्रकारची खते आणि पूरक साहित्याची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. या बाजारपेठेत रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. हे नर्सरी हे यासाठीचे मोठे साधन आहे. एक नर्सरी एक मोठा व्यावसायिक तयार करून किमान पन्नास लोकांना रोजगार देऊ शकते.

नर्सरीसाठी लागणारी चांगल्या प्रतीची माती, खते, औषधे, ट्रॅक्टर यासारख्या गरजांतून नवा रोजगार निर्माण होऊ शकतो. देश-विदेशातील अनेक कंपन्यांना शेतीशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक करायची आहे. या कंपन्यांची खते, ओषधे, शेतीपूरक अवजारांची डिलरशिप हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून गाव पातळीवर मोठ्या स्वरूपातील व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.नव्या सरकारी धोरणानुसार या केंद्रांच्या जुन्या स्वरूपात मोठा बदल करून सर्व प्रकारच्या साहित्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल चालविण्याचे स्किल रोजगार निर्माण करेल

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना वयाची मर्यादा हा महत्वाचा घटक असतो. अभ्यास करताना-करता अनेकांची वयो मर्यादा संपते.प्रत्येकालाच यश मिळत नाही. त्यामुळे वय निघून गेल्यानंतर ‘प्लॅन बी’ म्हणून अनेकांनी पुण्यात अभ्यासिकांपासून हॉटेल, खानावळ तसेच कॅफे सुरू केले आहेत. मात्र, ज्यांच्या जीवावर हव्य व्यवसाय उभा राहिला तो विद्यार्थी पुण्याबोहर गेल्याने हा व्यवसाय आता ठप्प झालाय. हा व्यवसाय करणारे बहुतांश माजी विद्यार्थीच असल्याने त्यांनीदखील गाव गाठले आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मिळवलेल्या या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग ग्रामीण भागात करता येऊ शकतो. व्हेज-नॉनव्हेज हॉटेलची क्रेझ ग्रमाीण भागात मोठ्याप्रमाणात वाढली आहे. हॉटेलमध्ये जेवणाची सवय शहरी भागाइतकी नसली तरी ग्रामीण भागातल्या तरूणांनी नक्कीच लागली आहे. त्यामुळे एका नव्या पद्धतीने या व्यवसायाला ग्रामीण भागात संधी आहे.

पालेभाज्यांचा पुरवठा शिवारातून घरात

लॉकडाऊनच्या काळात शहरी भागात घरपोच पालेभाज्या व फळांची पुरवठा करणारी साखळी निर्माण झाली. मात्र, तत्कालिक व्यवसाय म्हणूय यााकडे न पाहता यातून कायम स्वरूपी रोजगार-स्वयंरोजगाराची मोठी संधी निर्माण होऊ शकते. शहरात याआधीच अशा स्वरूपाचे व्यवसाय गेल्या काही वर्षापासून सुशिक्षित तरूण करीत आहे. मात्र, ही संख्या अल्प आहे. पुण्या-मुंबईतून आपल्या गावात गेल्यानंतर गाव पातळीवरून उत्तम दर्जाच्या पालेभाज्या व फळांचा पुरवठा करताना आधुनिक मार्केटिंगची जोड दिली तर शहरातल्या घरा-घरात ताज्या भाज्या पोचविण्याचा हा व्यवसाय मोठा आकार घेऊ शकते. आपल्याकडील शहरांची रचना आणि लोकसंख्या पाहता या क्षेत्रात रोजगाराच्या अनंत संधी आहेत. याबरोच दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा व्यवसायदेखील वाढू शकतो. ताजा माल आणि शेतातून थेट घरात ही संकल्पना या रोजगाराला उर्जितावस्था मिळवून देऊ शकते.

सोलर उद्योगात मोठी संधी

मुबलक आणि स्वच्छ प्रकाश ही आपल्याकडे मोठी देणगी आहे. भारताचा भौगोलिक विचार केला तर वर्षातले जवळपास सर्व दिवस सूर्य प्रकाश असतो. ग्रामीण भागात आजही चोवीस तास वीज पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे सोलर उर्जा क्षेत्रात रोजगारची संधी ग्रामीण भागात मोठी आहे. अनेक सोलर कंपन्यांना ग्रामीण भागात डिलर नमायचे असतात. मात्र, सोलर तंत्रज्ञानाचे किमान ज्ञान असणारे लोक मिळत नाहीत. अगदी कमी काळाचे प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय ग्रामीण भागात सुरू करता येऊ शकतो.

माहिती सेवा केंद्र

संगणकाचे किमान ज्ञान असलेली कोणतीही व्यक्त माहिती सेवा केंद्र सुरू करू शकते. सरकारी सेवा केंद्र ग्रामीण भागात आहेत. मात्र, त्यांची संख्या अल्प आहे. डिजीटल सेवेची व्याप्ती ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात अधिक लकांनी या सेवा क्षेत्रात उतरले तरी रोजाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. पॅन, आधार, ऑनलाइन सातबारा यासारख्या असंख्य सुविधा, बॅकांच्या ऑनलाइन सुविधा केंद्र ग्रामीण भागात सुरू करण्यास बँकांनी सुरूवात केली आहे. बँकेच्या छोट्या स्वरूपातील एक्सटेन्शन कॉऊंटरचा प्रतिनिधी म्हणून नेमला जातो.

या प्रतिनिधीमार्फत २० हजार रूपयांपर्यतंचे व्यवहार करता येतात. गाव पातळीवर रोजगाराची ही एक चांगली संधी आहे. शहरात राहिलेल्या मुलांना हा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. या जोडीला एलआयसी तसेच अनेक खासगी विमा कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात या सर्वच कंपन्यांना व्यवसाय वाढवायचा आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळासारख्या (एमकेसीएल) कंपन्यांची नव्या स्वरूपातील प्रशिक्षण केंद्रेदेखील रोजगार स्वयंरोजगाराचे साधन होऊ शकते.

उद्योगातील रोजगाराच्या संधी

लॉडाऊनच्या काळात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात औद्योगिक क्षेत्रात काम करणारे परप्रांतीय कुशल तसेच अकुशल कामगार मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी गेले आहेत. यातील काही लोक पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाही. पुणे परिसर तसेच राज्यातील सर्वच भागातील उद्योग सुरू झालेत. मात्र, त्यांच्याकडे काम करायला पुरेसे मनुष्यबळ नाही. पुणे परिसरात सध्या पाच लोख रोजगार आहेत. कुशल-अकुशल दोन्ही प्रकारच्या कामगारांची उद्योगांना गरज आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या काहीजणांकडे तांत्रिक कौशल्ये आहेत. अशा तरूणांना उद्योगात सामावण्याची ही मोठी संधी आहे. परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी गेल्याने शहरात राहून रोजगार मिळविण्याची ही एकमेव संधी आहे. कारण शहरातील इतर व्यवसायातील रोजगार जवळजवळ संपलेला आहे. त्यामुळे वेल्डिंग, इलेक्ट्रिशिअन, बांधकाम कंत्राटदार, प्लबिंग, काचा बसविण्याचा व्यवसाय, गॅरेज, हार्डवेअर अशा क्षेत्रात रोजगारच्या अमाप संधी आहेत. फक्त नोकरीच्या मागे न लागता त्या संधींचा शोध घ्यायला हवा.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com