दिल्लीच्या एका बँकेच्या मॅनेजरला एक फोन येतो. खुद्द पंतप्रधान त्याच्याशी बोलत असतात. मग हा मॅनेजर बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपयांची रक्कम काढतो. एका ट्रंकेत ठेऊन तो बाहेर पडतो.
एका विशिष्ट ठिकाणी त्याला सांगितल्या गेलेल्या व्यक्तीच्या हाती ती ट्रंक सोपवतो. काही वेळातच त्याला कळते की पंतप्रधान त्याच्याशी बोलल्याच नव्हत्या. अमूक व्यक्तीला पैसे द्यावेत असे त्यांनी या मॅनेजरला सांगितलेच नव्हते.
...अवघी दिल्ली हादरते....हेच ते सत्तरच्या दशकात गाजलेले नगरवाला प्रकरण...एखाद्या चित्रपटात शोभेल अशा या प्रकरणाची आठवण खास 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी
नवी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीटवरची स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा. वेदप्रकाश मल्होत्रा हे या बँकेचे मॅनेजर. २१ मे १९७१ चा दिवस नेहमीप्रमाणे उगवला. बँकेचे कामकाज सुरु असताना सकाळी एक फोन आला. मल्होत्रांनी फोन घेतला...मी पी. एन. हक्सर बोलतोय. मॅडमना तुमच्याशी बोलायचंय......मॅडम म्हणजे तत्कालिन पंतप्रधान (स्व.) इंदिरा गांधी.
हक्सर हे त्यांचे त्या काळचे मुख्य सचीव. काही वेळाने कथित मॅडम फोनवर आल्या. फोनवरच्या या मॅडमनी मल्होत्रा यांना ६० लाख रुपये तयार ठेवण्यास सांगितले. हे पैसे घेऊन एका विशिष्ठ ठिकाणी जा. तिथे एक व्यक्ती तुम्हाला भेटेल आणि कोडवर्ड सांगेल 'बांग्लादेश का बाबू'. तुम्ही 'बार अॅड लाॅ' असे सांगून तुमची ओळख त्याला द्या आणि त्याच्याकडे पैसे द्या, असे या मॅडमनी मल्होत्रांना सांगितले.
खुद्द पंतप्रधानांचाच आदेश म्हटल्यावर मल्होत्रांनी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपये काढले. ती नोटांची बंडले एका ट्रंकेत ठेऊन ते बँकेच्या गाडीने सांगितल्या ठिकाणी निघाले. त्यांना त्या ठिकाणी एक उंच गोरीपान व्यक्ती भेटली. मी रुस्तुम सोहराब नगरवाला, असे सांगत त्या व्यक्तीने ठरलेला कोडवर्ड उच्चारला. 'बांग्लादेश का बाबू'. मल्होत्रांनी सांगितल्यानुसार आपली ओळख पटवली आणि पैशांची ट्रंक नगरवालाच्या हाती दिली. या रकमेची पावती तुम्हाला स्वतः पंतप्रधान देतील, असे सांगून नगरवाला तेथून निघून गेला.
मल्होत्रांनी पंतप्रधानांचे निवासस्थान गाठले पण पंतप्रधान तिथे नव्हत्या. त्या होत्या संसद भवनात. मल्होत्रा तिथे पोहोचले. पण तिथेही त्या भेटल्या नाहीत. मल्होत्रांनी मग पंतप्रधानांचे मुख्य सचीव हक्सर यांना गाठून पावतीची मागणी केली. त्यावेळी हक्सर यांनी घडल्या प्रकाराबद्दल चक्क कानावर हात ठेवले. पंतप्रधान निवासस्थानातून असा फोन केलाच गेला नाही हे ऐकताच मल्होत्रांच्या पायाखालची जमीन सरकली.
बराच वेळ होऊन गेला तरीही मल्होत्रा परत आले नाहीत, हे पाहून हादरलेल्या बँकेच्या इतर अधिकाऱ्यांनी जवळच असलेले पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशन गाठले. तोवर ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवला. कश्यप नांवाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात झाली. पैशांची ट्रंक घेऊन नगरवाला ज्या टॅक्सीत बसला तो टॅक्सीवाला शोधला गेला.
नंतर त्याने टॅक्सी बदलली होती. तोही टॅक्सीवाला सापडला. असे करत पोलिस डिफेन्स काॅलनीतल्या एका बंगल्यावर पोहोचले. तिथे पुन्हा एकदा नगरवालाने दुसरी टॅक्सी केली होती. या टॅक्सीवाल्याला त्याने बक्षिसीही दिली होती. असे करत करत पोलिस पोहोचले ते पारशी धर्मशाळेत. तिथे नगरवाला सापडला. त्याच्याजवळ ६० लाखांची रक्कमही सापडली. त्याचा जबाब नोंदवण्यात आला. पुढच्या दहा मिनिटांमध्ये न्यायालयाची सुनावणी घेऊन नगरवालाला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
नगरवाला तुरुंगात गेला. त्यानंतर त्याने या प्रकरणात एक याचिका दाखल केली. आपली केस पुन्हा ओपन करण्याची त्याची मागणी होती. पण ती फेटाळली गेली. दरम्यानच्या काळात या प्रकरणाचे तपास अधिकारी कश्यप यांचा एका अपघातात मृत्यू झाला. नगरवालाने नंतर काही माध्यमांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तोही सफल झाला नाही. असे होत असतानाच १९७२ साल उजाडले. २ मार्च हा नगरवालाचा वाढदिवस. नगरवालाने दुपारचे जेवण घेतले आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने रुग्णालयात नेले गेले. पण नगरवाला वाचू शकला नाही.
या प्रकरणात अनेक प्रवाद समोर आले. बँक मॅनेजर मल्होत्रा 'पंतप्रधान रिलिफ फंडा' शी संबंधित होता. त्याचे पंतप्रधान बंगल्यावर नगरवाला प्रकरण घडण्यापूर्वीही जाणे येणे होते, अशीही चर्चा झाली. स्वतः नगरवाला लष्करातून निवृत्त झाला होता. आपले हेरखाते आणि बांग्लादेशच्या मुक्तीवाहिनी यांच्यातला तो मध्यस्थ होता आणि ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी मुक्तीवाहिनीचे सैनिक सीमा ओलांडून भारतात येणार होते व त्यांच्या शस्त्रास्त्रे व दारुगोळ्यासाठी ही रक्कम होती, असेही बोलले गेले. पण नगरवालाच्या मृत्युनंतर हे सगळेच प्रकरण इतिहासाच्या पानात दडले गेले. मल्होत्रा पुढे बँकेतून निवृत्त झाले. त्यांना इंदिरा गांधींचे पूत्र संजय गांधी यांच्या मारुती उद्योग लिमिटेडमध्ये चीफ अकाउंटंटची जागा देण्यात आली. हा योगायोग होता की मल्होत्रांना दिले गेलेले बक्षीस होते, हे देखिल गुलदस्त्यात राहिले.
नगरवालाने आपण सापडावे या दृष्टीनेच त्या दिवशीच्या हालचाली केल्या होत्या, असेही म्हणायला वाव आहे. कारण ज्या कारणासाठी हे पैसे देण्यात येणार होते ती योजनाच त्या दिवशी रद्द झाली होती असे म्हणतात. या प्रकरणाशी संबंधित असलेले नंतरच्या काळात काळाच्या पडद्याआड गेले.
त्यापैकी कुणीही आज हयात नाहीत. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाई केली नसती तर कदाचित ही रक्कम परत बँकेत आली असती. मात्र, तक्रार नोंदवली गेली आणि सगळा घोळ झाला, असेच म्हणावे लागते. एकूण नगरवाला प्रकरण हे आपल्या देशाच्या इतिहासातले एक गूढ बनून राहिले आहे!