vilasrao deshmukh
vilasrao deshmukh

लावणीच्या कार्यक्रमातच विलासरावांना सरकार पडत असल्याचा निरोप आला आणि...

एका पत्रकाराच्या फोनमुळेविलासराव जागे झाले...

विधीमंडळाचे अधिवेशन म्हणजे कोणत्याही सरकारची कसोटी असते. त्यातही काठावरील बहुमत असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला तर डोळ्यात तेल ठेवूनच कारभार करावा लागतो. अशा सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्ष सतत प्रयत्न करत असतात. सरकार पाडण्याच्या अनेक प्रयत्नांना तोंड द्यावे लागलेले मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख.

महाराष्ट्रात नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे तसाही आनंदच असतो. विदर्भाच्या प्रश्नांसाठी म्हणून हे अधिवेशन तेथे घेण्याचा प्रघात आहे. मात्र मुंबईतील दगदग सोडून नेते, सरकारी अधिकारी सारे येथे सहलीच्या मूडमध्ये असतात. त्यामुळे  सरकार आणि विरोधक दिवसा अधिवेशनात आणि रात्री लावणीत दंग, असे चित्र अनेक अधिवेशनांत दिसून येई. विरोधी पक्षाचे दिग्गज आणि सरकारमधील मंत्री मांडीला मांडी लावून लावणीचा ठेका धरत. रंगलेल्या अशा रात्री कटकारस्थानेही तशीच रंगत. गेल्या काही वर्षांत या अधिवेशनातील गंमत कमी झाली असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक राजकीय भूकंप याच नागपूरमध्ये घडले आहेत.

विलासरावांकडे मुख्यमंत्रीपद

राज्यात १९९९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला कमी जागा मिळाल्या आणि नारायण राणे यांच्या सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यावेळी काही अपक्ष आमदारांच्या मदतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आले. या निवडणुकीत काँग्रेसला 75  जागा, शिवसेनेला 69 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ५६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर   शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती होती. यावेळी नारायण राणे हे  शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते तर, भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. भाजपने शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धुडकावून लावली होती. या शिवसेना आणि भाजपच्या वादात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्ते आले आणि अनपेक्षितपणे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले.

तारेवरची कसरत

काँग्रेसकडे 75 आणि राष्ट्रवादीचे 58  असे मिळून आघाडीकडे 133 आमदारांचे सख्याबळ होते. तर विधानसभा निवडणुकीत 12 अपक्ष आमदार निवडणून आले होते. काही इतर मित्रपक्ष आणि अपक्षांच्या मदतीने आघाडी सरकार सत्तेत होते. शिवसेना आणि भाजपचे एकत्रीत संख्याबळ 127 आमदार होते. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जास्त संख्याबळाचे अंतर नव्हेत. त्यामुळे विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे सरकार टिकविणे कसोटीचे होते. `मी रोज सकाळी उठलो की आमदारांची आधी डोकी मोजतो, असे विलासराव त्या वेळी गमतीने म्हणत असत. 

त्यामुळे सरकार टिकविणे हे आघाडीपुढील मोठे आव्हान आणि हे सरकार पाडणे हे नारायण राणे यांच्यासमोरील परीक्षा असे हे चित्र असे. त्यामुळे कधी अपक्षांना, तर कधी आघाडीतील आमदारांनाच फोडण्याचे प्रयत्न सुरूच राहत असत. या आमदार पळवापळवीच्या नाट्याचे प्रयोग अधुनमधून होत असत.

एका खोलीत सुरू होते नियोजन...

असाच एक प्रयोग नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने घडल्याचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी विलासराव देशमुख यांच्यावरील लेखात लिहिला आहे. हा लेख विलासराव निर्वतल्यांतर त्यांच्या आठवणीनिमित्त `साधना` ने प्रसिद्ध केला आहे. 

द्वादशीवार यांच्या म्हणण्यानुसार नागपूरचे अधिवेशन नेहमीप्रमाणे तणावाचे होते. मात्र कामकाज संपल्यानंतर नेत्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा रिवाज होतो. यात विरोधी पक्षाचे दिग्गज आणि सरकारमधील मंत्री मांडीला मांडी लावून लावणीचा ठेका धरत. तशाच एका रात्री विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्यासाठी आमदार निवासामध्ये एक बैठक सुरु होती. सगळे ठरले होते. सरकार पाडण्याचा बेत पूर्णपणे ठरला होता. सत्तावीस आमदार फुटणार म्हटलल्यानंतर विलासराव देशमुख यांचे सरकार अल्पमतात येणार, असा बेत होता. त्यासाठी आमदार निवासातील एका खोलीत हे सरकारविरोधी आमदार जमून नियोजन करत होते. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत हे आमदार सरकारच्या विरोधात मतदान करून भूकंप घडविणार होते. आर्थिक मागण्यांवरील मतदानात सरकारचा पराभव झाला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार होता. सरकार पडणार याचा या आमदारांना पूर्ण विश्वास होता. एका आमदाराने ही आनंदाची म्हणून बातमी द्वादशीवार यांना सांगितली.

पहिला फोन पवारांना... 

द्वादशीवार यांच्या म्हणण्यानुसार ही बातमी पत्रकार म्हणून  अंकात प्रसिद्ध करायची की मित्र असलेल्या विलासरावांना सांगायची अशा पेचात होतो. मात्र मैत्री भारी ठरली. त्यांनी विलासरावांना फोन केला.  विलासराव त्यावेळी लावणी ऐकत बसले होते. त्यावेळी त्यांचा फोन वाजला अन् त्यांना सरकार पडणार असल्याची नियोजनाची कथा द्वादशीवार यांनी त्यांना ऐकवली. ही माहिती कोणी दिली, अशी विचारणा विलासरावांनी त्यांच्याकडे केली. त्या नेत्याचे नाव ऐकल्यानंतर मग विलासराव यांनीही ही माहिती गंभीरपणे घेतली. हे मी आधी शरद पवारांना सांगतो आणि त्यानंतर पुढचे पाहू, असे सांगत विलासरावांना फोन केला. त्यानंतर तसेच घडले. शरद पवारांचा फोन त्या खोलीवर गेला आणि सगळी दाणादाण उडाली. थोड्याच वेळात विलासरावही तेथे थडकले. त्यानंतर आमदारांची दणादाण झाली ते  बंड त्या खोलीतच जिरले आणि विलासराव यांचे सरकार तरले. अर्थात मित्र म्हणून असलेल्या द्वादशीवार यांनी ही माहिती वेळीच सांगितली नसती तर विलासराव यांचे सरकार मध्येच पडण्याचे थांबले. पण त्यानंतर आपल्या सरकारची साडेतीन वर्षे पूर्ण होताच विलासरावांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com