Story of 4 rickshaw drivers who become successful politicians in Maharashtra | Sarkarnama

'त्या' चौघांची राजकारणाची सवारी - रिक्षाचे स्टेअरिंग ते लोकप्रतिनिधी

'त्या' चौघांची राजकारणाची सवारी - रिक्षाचे स्टेअरिंग ते लोकप्रतिनिधी

अतुल मेहेरे
बुधवार, 10 मार्च 2021

या चारही नामी हस्ती पूर्वी रिक्षा चालवायच्या आणि आज राजकारणात त्यांचे मोठे नाव आहे, चांगला दबदबा आहे. हिंदी भाषेत एक म्हण आहे की, ‘समय से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नही मिलता.’

एखाद्याचं नशीब केव्हा, कुठे, कसं उजळेल हे काहीच सांगता येत नाही. अर्थात त्याला प्रयत्नांचे सातत्य आणि परिश्रमांची जोड लागतेच.

आपल्या राज्यात चार अशा व्यक्ती आहेत की, ज्यांनी एकेकाळी भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी मिळेल ते काम केले. नशिबाने कलाटणी घेतली अन् हे चौघेही आज महाराष्ट्राच्या राजकारणातील बुलंद आवाज बनले आहेत.

या चारही नामी हस्ती पूर्वी रिक्षा चालवायच्या आणि आज राजकारणात त्यांचे मोठे नाव आहे, चांगला दबदबा आहे. हिंदी भाषेत एक म्हण आहे की, ‘समय से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नही मिलता.’ अगदी याप्रमाणेच नशिबाने साथ दिली तर काय होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे चार जण आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ कशी मिळाली आणि आयुष्याला कुठून कलाटणी मिळाली हे आपण आज जाणून घेणार आहोत.

'त्या' चौघांची राजकारणाची सवारी - रिक्षाचे स्टेअरिंग ते लोकप्रतिनिधी... या चार हस्ती आहेत, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक, औरंगाबाद पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे. 

चंद्रशेखर बावनकुळे: ऑटोरिक्षाचालक, जि.प. सदस्य ते ऊर्जामंत्री...

धडपडीला मेहनतीची जोड आणि ठरवलेली गोष्ट करून दाखवण्याची जिद्द असेल तर माणूस कुठे जाऊन पोहोचू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे. उदरनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला ऑटो रिक्षाचे स्टेअरिंग हाती धरले. त्यानंतर कोराडी औष्णिक केंद्रात छोटे-मोठे कंत्राट घेऊन कामे करणे सुरू केले आणि योगायोग म्हणजे नंतर त्याच खात्याचे मंत्रिपद भूषवण्याचे भाग्यही त्यांना लाभले. असे म्हटले जाते की, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. ही बाब बावनकुळे यांनाही लागू होते. 

कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उभारले जात असताना त्यांचे वडिलोपार्जित घर या प्रकल्पात केले. प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्रसुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यावेळी भविष्यात याच खात्याचे आपण ‘बॉस’ होऊ असे स्वप्नही त्यांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी कधी बघितले नव्हते. ऑटो चालवून त्यांनी घरची जबाबदारी स्वीकारली.

नागपूर-कोराडी या दरम्यान कितीतरी लोक प्रवासी म्हणून त्यांच्या संपर्कात आले. यातून मिळालेल्या ऊर्जेनेच त्यांचे भवितव्य घडले. असेही म्हणतात की, कुठल्याही क्षेत्रात वर जायचे असेल तर गॉडफादर लागतो. बावनकुळे यांना नितीन गडकरी यांच्यासाखे तगडे गॉडफादर लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 

ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा भाजपला कोणी विचारत नव्हते. भाजपात काम करणे म्हणजे लष्करात जाऊन घरच्या भाकरी भाजणे, असे म्हटले जात होते. राजकीय घराणे नसल्याने कोणी विचारत नसताना गडकरींसारख्या नेत्याने आपल्यावर विश्वास दाखवला हीच त्यांच्यासाठी समाधानाची बाब होती. त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता भाजपाचे काम करणे सुरू केले.

या दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनीही भाजपला निराश केले नाही. ते निवडून आले. त्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आपले सर्व राजकीय कौशल्य दाखवण्याची त्यांना संधी मिळाली. ही निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक सक्रिय सदस्य म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

ही टर्म पूर्ण होत असतानाच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली. तत्कालीन आमदार व राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन बहुजन रिपब्लिकन एकता मंच नावाचा पक्ष स्थापन केला. त्यांनीही रिंगणात उडी घेतली. भाजपचे त्यावेळी फारसे तगडे उमेदवार नव्हते. तेव्हा बड्या नेत्यांच्या लढाईत बावनकुळे यांना भाजपने उतरवले. त्यावेळी डमी उमेदवार म्हणून बावनकुळे यांना संबोधले जात होते. मात्र त्यांनी चमत्कार घडविला आणि आमदारही झाले. त्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या.

भाजपची सत्ता येताच मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले. पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी ऊर्जावान मंत्री म्हणूनच गाजवला. दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या व्यक्तीला ऊर्जा खात्याची खडानखडा असलेली तांत्रिक माहिती बघून अनेक वर्षांपासून याच खात्यात काम करणारे अभियंते व अधिकारीही आश्चर्य व्यक्त करतात. आज बावनकुळे भाजपचे प्रदेश महामंत्री आहेत. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो, हेच शेवटी खरे आणि तेच बावनकुळेंनी सिद्ध केले.  

आमदार संजय शिरसाट : फुगे विक्रेता, रिक्षाचालक ते आमदार...

औरंगाबाद पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा संघर्ष विचार करायला लावणारा आहे. त्यांचे वडील एस.टी. चालक होते. पाच भाऊ आणि एक बहीण असा परिवार. कमावणारे एकटे वडील अन् तेही ड्रायव्हर. सहा मुलांचे शिक्षण करणे त्यांना अवघड झाले होते. अशात संजय यांनी १०वी उत्तीर्ण केल्यानंतर भाकरीच्या शोधात घराच्या बाहेर पाऊल टाकले. सुरुवातीला भाजीपाला विकला, गॅसचे फुगे विकले.

त्यानंतर ७ रुपये रोजाने कॉसमॉस कंपनीत कामे केली. तेथेच ऑपरेटर म्हणून त्यांची पदोन्नती झाली. पण पुढे युनियनच्या भानगडी झाल्यानंतर त्यांनी ते काम सोडले आणि ऑटोरिक्षाचालकाचे काम सुरू केले. 

औरंगाबादमध्ये तेव्हा परिस्थिती फार वाईट होती. मराठी लोकांच्या टोप्या उडवल्या जायच्या, धोतरं सोडली जायची. अशात लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचाराने त्यांना झपाटले. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाडच्या अधिवेशनात घोषणा केली होती की, शिवसेनेचा विस्तार राज्यभर करायचा. त्यावेळी संजय शिरसाट शिवसेनेसोबत जोडले गेले ते आजतागायत.  त्याला ३६ वर्षे झाली. 

त्यावेळी त्यांची फार बिकट परिस्थिती होती ती. दोन-दोन दिवस चपाती डोळ्यांनी बघायलासुद्धा मिळत नव्हती. अशात नगरसेवक पदासाठी निवडणुकीचा अर्ज भरायला गेले, तेव्हा ५०० रुपये नव्हते, ते लोकांनी भरले आणि सन २००० मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. पुढे ते १५ वर्ष ते नगरसेवक होतो. २००९ ला पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ लाही निवडून आले.

आज विधानसभेत त्यांचा आवाज बुलंद आहे. वडील एस.टी. ड्रायव्हर, मी ऑटोरिक्षा ड्रायव्हर होतो. पण मुलांना चांगले शिकवायचे ठरवले आणि आज मुलगी हर्षदा कमर्शिअल पायलट आणि मुलगा सिद्धांत नगरसेवक असल्याचे आमदार शिरसाट अभिमानाने सांगतात. 

प्रताप सरनाईक : अंड्याचा ठेला, रिक्षाचालक ते आमदार...

सरनाईक यांचा राजकीय, आर्थिक प्रवास तसा थक्क करणारा आहे. तरुणपणी त्यांनी अनेक व्यवसाय केले. त्यात अंडाभुर्जीची गाडीही डोंबिवलीत ते लावत होते. काही काळ रिक्षाही चालवली. त्यांचे मूळचे आडनाव हे गांडुळे होते. त्यांनी नंतर ते सरनाईक केले. प्रताप सरनाईक यांनी २०१९ साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता १२५ कोटींहून अधिक आहे.

ठाण्यातील दहीहंडी उत्सवातून ज्यांनी आपले नाव कमावले त्यात सरनाईक यांचा समावेश आहे. त्यांनी ‘कान्हा’ आणि हृदयानंतर या दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली. परिश्रमाला नशिबाची साथ मिळाली आणि आज ते महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. 

ते महाराष्ट्रात चर्चेत आले ते 2008 च्या सुमारास. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वीस लाख रुपयांचा हिरेजडित मोबाईल त्यांनी भेट दिला होता. त्यामुळे सरनाईक हे उभ्या महाराष्ट्राला माहीत झाले. सिद्धिविनायक गणपतीला भेट मिळालेला हा मोबाईल सरनाईक यांनी लिलावात वीस लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यांनी तो त्यांचे तेव्हाचे नेते अजितदादांना सप्रेम भेट दिला. पण अजितदादांनी तेव्हा तो स्वीकारला नव्हता. पण सरनाईक मोठे प्रस्थ असल्याचे महाराष्ट्राला दिसून आले.

ठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे मित्र म्हणून तेव्हापर्यंत त्यांची ओळख होती. ती मोबाईल प्रकरणामुळे पुसली आणि सरनाईक नावाचा ब्रॅंड तयार झाला. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. राज्यात 2009 च्या निवडणुकीत कोळी-माजिवडा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उभे राहणे टाळून त्यांनी शिवसेनेची वाट पत्करली आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळात त्यांचा समावेश झाला. मूळचे वर्धा येथील सरनाईक हे लहानपणी डोंबिवलीत आले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे दहावीपर्यंत झाले. 

राहुल जाधव : ऑटोचालक, नगरसेवक ते महापौर…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांचाही प्रवास तसा वेगळाच आहे. त्यांचा जगण्यासाठीचा फार संघर्ष नसला तरीही कारकिर्दीच्या सुरुवातीला ते पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा चालवायचे. रिक्षाचालकाचे काम करताना त्यांचा जनसंपर्क चांगला झाला. सामाजिक कार्याची आवड होतीच, त्यात ते विद्यमान पैलवान आमदार महेश लांडगे यांच्या संपर्कात आले आणि राजकारणात प्रवेश करते झाले.

महेशदादा तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. २०१२ मध्ये आणि त्यापूर्वी १५ वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता महापालिकेवर होती. त्यामुळे २०१२ पहिल्याच प्रयत्नात राहुल जाधव नगरसेवक झाले. त्यानंतर विधानसभेच्या उमेदवारीवरून महेश लांडगेंचे पक्षासोबत मतभेद झाले आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी भोसरीचे पहिले आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विलास लांडेंचा त्यांनी पराभव केला. नंतर महेशदादांनी भाजपला समर्थन दिले. २०१७ ला ते अधिकृतपणे भाजपमध्ये आले. 

२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राहुल जाधव भाजपच्या तिकिटावर निवडून आले. पहिले अडीच वर्ष महापौरपद ओबीसीसाठी राखीव होते. हा कार्यकाळ संपल्यानंतर सव्वा वर्ष ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर बनले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

राजकारण, Politics, महाराष्ट्र, Maharashtra, पिंपरी, आमदार, Pratap Sarnaik, गाय