A Special Feature about MNS Chief His Residence and his facinating appearance | Sarkarnama

राग दरबारी : महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा रंग माझा वेगळा...

राग दरबारी : महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा रंग माझा वेगळा...

लेखक -उस्ताद बसून खां साहेब...
मंगळवार, 12 मे 2020

विस्तीर्ण शिवाजी पार्काच्या किनाऱ्याला 'कृष्णभुवन' नावाची इमारत उभी आहे. कुणी तिला 'कृष्णभुवन' म्हणतात, कुणी 'कृष्णकुंज'..... कुणी सत्यदेव म्हणा, कुणी सत्यनारायण काय फरक पडतो? इन-मीन चार मजली इमारत. पुस्तकं आणि शेकडो डीव्हीड्या, चित्रफितींच्या पार्श्वभूमीवर सोफ्यात साहेब बसलेले असतात. तो खास ठाकरी खर्ज आपली चौकशी करतो. हाच आवाज जाहीर सभांमध्ये विरोधकांचे वाभाडे काढताना किती भयंकर वाटतो. आत्ता मात्र त्याच्यात कमालीचं सौजन्य आणि सुसंस्कृतपणा भरलेला आहे..महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा असा रंग माझा वेगळा......

मुंबईत मलबार हिलची टेकडी हा एक वरकरणी शांत शांत वाटणारा परिसर. लक्षाधीशांचे इमले, गर्द झाडी, आणि पायथ्याशी समुद्राची गाज. तीन बत्तीच्या सिग्नलवर उजवीकडे बांकदार वळण घेतलं की हवेत सत्तेचा गंध दर्वळू लागतो. डोळ्यांना जाणवतो. पोलिसांचा वाढता वावर, हुकमतबाज शिट्ट्या आणि जिपांची ये-जा, जाणवायला लागते. इथं महाराष्ट्राची सत्ता निवास करुन आहे, याची जाणीव होते. सामान्य माणसाला हमखास थोडंसं दबकायला होतं. मोठमोठे शेटिये आपल्या लंब्या लंब्या गाड्या घेऊन जाताना येताना दिसतात. वॉकी टॉकीवरचे पोलिस एकमेकांशी एवढं का बोलत असतील, असं एखाद्याला वाटू शकतं.

मुंबईतला हा अर्थातच गर्भश्रीमंत परिसर. शिवाय सत्तानिवासिनीचं तीर्थस्थळ इथंच. नामदारांच्या बंगल्यांची रांग सुरु होते. गर्द झाडांमध्ये, आणि उंच उभ्या भिंतींमागे उभे असलेले हे जुने बंगले गजबजलेले असतात. दाराशी पोलिसांचे ताफे असतातच. लांबलचक मोटारींची वर्दळ सतत सुरु असते.

इथं राहणारं पब्लिक मुळा, मेथी, मटार अशा भाज्या कुठून आणत असतील? नूडलची पाकिटं कुठल्या किराणाभुसाराच्या दुकानातून घेत असतील? असे प्रश्न पडतील एखाद्याला. खरं तर नाही पडणार. कारण ही मंडळी असलं काही स्वत:हून खरेदी करायला जात नाहीत. पाच-पन्नास नोकरचाकर दिमतीला असल्यावर राशनपाण्याची चिंता कोण करत बसेल?

उजव्या हाताला सह्याद्री अतिथीगृह. डावीकडे वळलं की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान. 'वर्षा'.  तिथली हवा तर आणखी टाइट. गेली कित्येक दशकं महाराष्ट्राचा कारभारी इथं राहातो, राज्याचा गाडा हाकतो. राजकारणाचे नवनवे डावपेच इथं लढवले जातात. दिल्लीशी संधान बांधलं जातं किंवा तुटतंही.

पण तिथं हल्ली मुख्यमंत्री राहात नाहीत. ते दूर उपनगरात बांदऱ्याला राहतात. बैठकांपुरते इथं येतात. परत जातात. म्हणून या निवासस्थानाचं महात्म्य कमी झालेलं नाही. सत्तासुंदरीचा दिवस आळोखेपिळोखे देत इथंच, या टेकडीमागे उगवतो, हे अजूनही शंभर हिश्शांनी सत्य आहे.

मलबार टेकडीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. इथल्या एकेका बंगल्याचं चारित्र्य खंगाळून काढलं तरी महाराष्ट्राचा वेगळाच इतिहास भुईत गाडलेल्या प्राचीन अवशेषांसारखा वर वर येईल. या बंगल्यांच्या भिंतींनी काय काय पाहिलंय, आणि काय काय ऐकलंय? राजकारणावर आपण ऐसपैस चर्चाबिर्चा करतो, भांडतो-तंडतो, खऱ्या खोट्या कंड्या पिकवतो, कुजबुज-गॉसिप करतो, तेव्हा या बंगल्यांच्या भिंती फिदीफिदी हसत असतील का? खिशाला पेन लावून, बगलेत फाइल मारुन एखादा मातब्बर पुढारी आपल्या गाडीत बसायला निघाला की पाच-पन्नास डोकी लवतात. शे-शंभर कंबरा लचकतात. शेपाश्शे सलाम ठोकले जातात. शिट्ट्या- वाहनांचा धुरोळा उडतो, तेव्हा या भिंतींना त्यातलं फोलपण जाणवत असेल का? 

सत्तेची महाराष्ट्रात सत्राशेसाठ ठाणी...

मलबार टेकडी हा विषय पुढे कधी तरी घेऊ. घेऊच! बांदऱ्याच्या 'मातोश्री'वरही चक्कर टाकूच टाकू. पण सत्ता फक्त या दोन ठिकाणीच राहाते, असं काही नाही. तिची सत्राशेसाठ ठाणी महाराष्ट्रात आहेत. सत्तेची ही बदाम राणी तिच्या बावन पत्त्यांसह महाराष्ट्रभर विखुरलेली आहे. तिच्या दरबारातले अनेक मानकरी ठिकठिकाणी विखुरलेले आहेत.

त्यातला एक मनसबदार मुंबईतच शिवाजी पार्काच्या काठावर राहातो. मलबार हिल नावाची ही धनवंत टेकडी आणि मुख्यमंत्र्यांचं बांद्रा यांच्या मधोमध दादरला आहे हे शिवाजी पार्क. अगदीच परिचित पत्ता. या विस्तीर्ण पार्काच्या किनाऱ्याला `कृष्णभुवन` नावाची इमारत उभी आहे. कुणी तिला 'कृष्णभुवन' म्हणतात, कुणी 'कृष्णकुंज'..... कुणी सत्यदेव म्हणा, कुणी सत्यनारायण काय फरक पडतो?

जेम्स आणि बाँड....

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा बेलभंडार उचलणारे तिखट जिभेचे राजसाहेब ठाकरे या इमारतीत राहतात. इन-मीन चार मजली इमारत.नवनिर्माण सेनेच्या कडवट सैनिकांचा कडेकोट पहारा. पोलिसांच्या जीपगाड्या मुक्कामीच. इमारतीसमोरचा रस्ता आम वाहतुकीसाठी बव्हंशी बंदच असतो. कंपाऊण्डची भिंतही चांगली उंच. दणकट सरकतं गेट. चौकशांनंतर आत गेलं की डावीकडे श्वानकक्ष दिसतो. दोनेक तगडे ग्रेट डेन तिथं झोपलेले दिसतात. झोपलेलेच बरे! जागे होऊन जीभ काढून आपल्याकडे बघून हसले तर पंचाइत व्हायची. साहेबांचे हे जेम्स आणि बाँड जागतिक कीर्ती मिळवून आहेत. ही त्यांची दुसरी किंवा तिसरी पिढी असेल. साहेबांचे हे इमानी पहारेकरी हुकवून शेजारच्या लिफ्टकडे जाताच येत नाही. 

जेम्स आणि बाँडकडे भीतीयुक्त आदराने दुर्लक्ष करुन पुढ्यातल्या कार्यालयात शिरायचं आणि थांबायचं. तुम्ही महत्त्वाचे किंवा उपयुक्त किंवा जिव्हाळ्याचे वगैरे असाल तर `वर` चौथ्या मजल्यावर वर्दी जाते. चहापाण्याची चौकशी होते. बसायला खुर्चीबिर्ची मिळते. खरोखरच महत्त्वाचे किंवा उपयुक्त किंवा जिव्हाळ्याचे वगैरे असाल तर 'वरुन' बोलावणं येतं. जेम्स आणि बाँडला अदबीने नमस्कार करुन चिमुकल्या लिफ्टमध्ये शिरायचं. चपला किंवा बूट काढून घरात शिरायचं.

खास ठाकरी खर्जात होते चौकशी....

घरात पुन्हा एखाद्या लाडाच्या श्वानाशी जमेल तशी मैत्री सुधरायची. पुस्तकं आणि शेकडो डीव्हीड्या, चित्रफितींच्या पार्श्वभूमीवर सोफ्यात साहेब बसलेले असतात. तो खास ठाकरी खर्ज आपली चौकशी करतो. त्यातलं मार्दव चकित करणारं असतं. हाच आवाज जाहीर सभांमध्ये विरोधकांचे वाभाडे काढताना किती भयंकर वाटतो. आत्ता मात्र त्याच्यात कमालीचं सौजन्य आणि सुसंस्कृतपणा भरलेला आहे. अर्थात हुकमतदेखील आहेच. हा गृहस्थ चहा, सरबत विचारतबिचारत नाही. ते थेट येतंच. आणि घ्यायचं असतंच. 'मी दुपारी ताक पितो, चहा नाही'....असलं काहीबाही मनात आलं तरी, तिथं जिभेवर येत नाही. चहा टॉपच असतो.

बोलता बोलता ध्यानात येतं की, साहेबांना माध्यमांच्या दुनियेत काय चाललंय, ते नीट ठाऊक आहे. तपशीलात! कुठल्या चॅनलच्या पत्रकारांचे तीन महिने पगारच कसे झालेले नाहीत. कुठल्या वृत्तपत्रात संपादकाला काढून टाकताहेत, कुठला पत्रकार गंभीर आजारी आहे वगैरे. राजकारणातले बारकावे त्याला पत्रकारापेक्षा अधिक ठाऊक आहेत. आतल्या खबरा त्याच्यापर्यंत पोचल्या आहेत. राज्याचं शकट हांकण्यात मोठी भूमिका बजावणारे त्याला स्वत:हून फोन करतात. येऊन भेटतात. मोठमोठाले उद्योजक त्याच्याशी सलगीनं बोलतात. फोन करतात. चित्रपट, नाटकाच्या दुनियेतले सितारे त्याच्या कार्यालयात बसून 'वरच्या' वर्दीची वाट पाहात असलेले आपणच आधी बघितलेले असतात. कलाक्षेत्रातल्या नामचीनांशी त्याचे घरगुती संबंध आहेत, हे जाणवत राहातं.

असा वक्तृत्ववान नेता मतदारांकडून उपक्षित का?.....

राज्यकर्त्यांनी घातलेल्या घोळाची आकडेवारी त्याच्यापर्यंत पोचलेली असते. त्याचं विश्लेषणही त्याला करता येतं. एवढा अष्टगुणी नेता मग असा पराभूत अवस्थेत का? असा आपल्याला प्रश्न पडतो. महाराष्ट्राची नस आणि धमनी ज्यानं ओळखली आहे, अशा या वक्तृत्त्ववान नेत्याला लोक मतं का बरं देत नाहीत? याच्या जाहीर सभांची गर्दी म्हणजे निव्वळ मनोरंजनासाठी जमलेले बघे असतात का? दशक उलटलं तरी या सुजाण नेतृत्त्वाला राजकीय यश का बरं मिळत नाही? कमी कुवतीचे, क्षमतेचे आणि बुध्दीचे अनेक नवेकोवळे नेते यशस्वी होताना दिसतात. मग याच गृहस्थाला मराठी रयत मनावर कां घेत नाही? 'माझ्या हातात सत्ता देऊन बघा...' असं वारंवार सांगूनही लोक ऐकत का नाहीत?

नवनिर्माणाच्या या पाईकाला भवितव्य नाहीच का? शंभर प्रश्नांचं भेंडोळं घेऊन आपण तिथून निघतो. उत्तरं मिळत नाहीत. ती आपणच शोधत बसतो. मग लक्षात येतं की मेख वेगळीच आहे. आपल्याला जे प्रश्न पडतात, ते बहुधा या नेत्याला पडतच नाहीत. पडलेच, तरी त्याची फिकीर नाही. सत्तेच्या दरबारात अनेक शिलेदार, मनसबदार उभे आहेत. काही लोक आपली रांग धरुन उभे राहतात. काही पुढल्या रांगेत घुसण्यासाठी धडपडतात. काही मागे पडतात. नवनिर्माणाच्या या नेत्याला रांगेत उभं राहण्यात काहीही स्वारस्य नाही. मराठी स्वभावाला तख्ताची हौस नाही. अल्पसंतुष्टी हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे.

कसा? ते पुढल्या एखाद्या भेटीत पाहूच. 'राग दरबारी' हे गोष्टीवेल्हाळ सदर त्यासाठीच तर आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

शिवाजी पार्क, महाराष्ट्र, Maharashtra, समुद्र, पोलिस, राजकारण, Politics, दिल्ली, मुख्यमंत्री, चहा, Tea, पत्रकार, चित्रपट, नाटक, कला, मनोरंजन, Entertainment