Should Pankaja Munde quit BJP is the question | Sarkarnama

पंकजा मुंडे यांनी भाजपचा त्याग करावा का?ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

पंकजा मुंडे यांनी भाजपचा त्याग करावा का?

योगेश कुटे
सोमवार, 12 जुलै 2021

पंकजा मुंडेंसाठी सध्या खडतर आव्हान खरेच आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रात सर्वाधिक उमटले. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही.  मुंडेऐवजी वंजारी समाजाच्या डाॅ. भागवत कराड यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आणि भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचा गळा घोटला जात असल्याच्या आरोपाच्या फैरी झडू लागल्या. त्यातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या नाराज असल्याच्या बातम्या झळकू लागल्या. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपचे सर्वेसर्वा असल्याने ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा होत आहे. एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद जाणे आणि नंतर त्यांना विधानसभेचे तिकिट न मिळणे, पंकजा मुंडे यांना तिकिट मिळणे पण त्यांचा पराभव होणे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीही न मिळणे, अशा काही घटना आणि प्रसंग यासाठी सांगितले जातात.

त्यातील खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका करत राष्ट्रवादीत प्रवेश करून आपली पुढची वाटचाल आता ठरवली आहे. बावनकुळे यांनी भाजप नेत्यांसमोर थेट शरणागती पत्करत तेथेच राहत संघटनात्मक कामात लक्ष घातले आहे. आता प्रश्न राहीला तो पंकजा मुंडे यांचा. त्यांनी आता किती दिवस `अन्याय` सहन करायचा, असा प्रश्न त्यांचे समर्थक विचारत आहेत. पंकजा देखील मी नाराज नाही, अशा सांगत असल्या तरी त्यावर कोणाचा विश्वास नाही. 

जनाधार असलेल्या नेत्या

महाराष्ट्रात भाजपमध्ये सर्वाधिक जनाधार असलेल्या नेत्या म्हणून पंकजा गोपीनाथ मुंडे यांची ओळख आहे. फर्डे वक्तृत्व असलेल्या मोजक्या नेत्यांत त्यांचा समावेश आहे. भाजप हा पक्ष माझ्या वडिलांनी उभा केला आहे. तो माझा पक्ष आहे, असे पंकजा आवर्जून अनेक सभांतून सांगतात. महाराष्ट्रातील 30 ते 35 विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचारसभांशिवाय भाजपचा उमेदवार निवडून येईल, याची खात्री नाही. अशी ताकद असलेल्या पंकजा या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या सर्वाधिक वेळा वेगवेगळ्या निमित्ताने येतच राहतात. आता फार झाले, असे म्हणत त्यांचे समर्थक भाजपचा त्याग करा, असा सूर लावतात. खडसेंसारखा निर्णय घ्या, असा आग्रह धरतात. पंकजांवर भाजपमध्ये खरोखरीच `अन्याय` होत असल्याची या वर्गाची भावना आहे. त्यातून त्यांनी वेगळा पर्याय शोधावा, असे त्यांचे म्हणणे असते. तर खरोखरीच `अन्यायग्रस्त` पंकजा यांचे `पुनर्वसन` करायचे ठरलेच तर त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत?

स्वतःचा पक्ष काढणे?

पंकजा यांची ताकद निश्चितपणे 30 ते 35 विधानसभा मतदारसंघात आहे. पण या बळावर स्वतःचा पक्ष काढणे शक्य आहे? महाराष्ट्रात शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचे पक्ष काढले. पण महाराष्ट्राची राजकीय रचना अशी आहे की या नेत्यांनाही स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. पंकजा यांच्यापेक्षाही फर्डे आणि प्रभावी वक्तृत्व असलेले राज ठाकरे यांचीही राजकीय कोंडी सध्या होत आहे. त्यामुळे स्वतःचा पक्ष काढणे, तो वाढविणे आणि त्यासाठी प्रचंड असे कष्ट घेणे हे पंकजा यांच्या मूळ स्वभावात आहे का? तर त्याचे उत्तर नाही आहे. परळीमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या वर्षभर तिकडे फिरकल्या नव्हत्या. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेले कारखाने त्यांच्याकडे आहेत. त्याची काय अवस्था आहे? गोपीनाथ मुंडे यांनीही स्वतंत्र पक्षाचा पर्याय स्वतःसमोर कधी ठेवला असेल असे वाटत नाही. समजा पंकजा यांनी पक्ष काढला तरी त्या स्वतःच्या बळावर 30 ते 35 आमदार निवडून आणतील, अशी स्थिती नाही. त्या तेथे एखादा उमेदवार पाडू शकतात, हे निश्चित आहे. पण पंकजा या स्वतःच्या बळावर दोन आकडी तरी आमदार निवडून आणतील का याची शंका आहे. यापेक्षा भाजपमध्ये जास्त आमदारांचे समर्थन त्यांना आताच आहे. त्यामुळे हा पर्याय पंकजा यांच्याकडून कठोर परिश्रमाची अपेक्षा ठेवणारा आणि खडतर आहे. शिवाय पंकजा यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनविण्याचे त्यांच्या समर्थकांचे स्वप्न या मार्गातून अजिबातच प्रत्यक्षात येणारे नाही. 

शिवबंधन बांधणे?

शिवसेना सध्या सत्तेत आहे. त्यामुळे पक्षाला बरे दिवस आहेत. पंकजा यांनी शिवसेनेत जावे, असे सुचविले जात आहे. पंकजा यांनी एका मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले होते. ठाकरे सरकारवर त्यांनी कठोर टीका आतापर्यंत केलेली नाही. भाजपमध्ये अन्याय होत असल्याबद्दल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`ने पंकजांबद्दल सहानूभूतीही व्यक्त केली होती.  त्यामुळे ठाकरे आणि मुंडे हे समीकरण योग्य ठरेल असे अनेकांना वाटते. पण ठाकरे कुटुंबानेही आता थेटपणे सत्तेची चव चाखली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर नंबर दोनवर कोण तर आदित्य ठाकरे, हे ठरलेले आहे. ठाकरे कुटुंबच शिवसेनेत क्रमांक एकवर नेहमीच राहणार. येथे पंकजा यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. ठाकरे कुटुंब हे पंकजांना मुख्यमंत्री बनण्यासाठी सेनेचा वापर करून देईन, याची शक्यता सुतराम नाही. दुय्यम स्थान, ठाकरे कुटुंबाच्या आदेशावर संघटना चालवायची यात पंकजा यांचा कोंडमारा जास्त होईल. पुन्हा महाराष्ट्रापुरतेच काम करावे लागेल. केंद्रात, देशपातळीवर काम करण्याची संधी फारच कमी आहे.

काॅंग्रेसचा हात हाती घेणे

भाजपमध्ये नाराज झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी काॅंग्रेसमध्ये जाण्याचा विचार केला होता, असे काही मंडळी अजून सांगतात. पण त्यांनीही तो विचार प्रत्यक्षात आणला नाही.  महाराष्ट्रातील काॅंग्रेसची स्थिती पाहता पंकजा पक्षात येणे हे काॅंग्रेसजनांसाठी फारच अनुकूल परिणाम करणारे ठरेल. ओबीसी नेता, फर्डे वक्तृत्व, वैयक्तिक जनाधार या पातळीवर प्रदेश पातळीवर काॅंग्रेसमध्ये एकही नेता नाही. त्यामुळे पंकजा तेथे आल्यातर काॅंग्रेस त्यांचे स्वागतच करेल. पण तेथे पंकजांना काय मिळणार? तेथे एवढे ज्येष्ठ नेते आणि घराण्यांचे वारसदार आहेत की त्यांच्याशी पंकजा यांना सामना करावा लागेल. महाराष्ट्रात काॅंग्रेसचा एवढ्यात मुख्यमंत्री होईल, याची शाश्वती नाही. काॅंग्रेसपेक्षा इतर प्रादेशिक पक्ष बलवान ठरत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर हा पक्ष गेला आहे. या पक्षाची स्वतःची व्होटबॅंक आहे. पण नेतृत्व नीट नसल्याने पक्षाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष केंद्रात सत्तेवर येईल, असे स्वप्न अजून काॅंग्रेसवाल्यांनाही पडत नसावे. पंकजांना एखादे मंत्रीपद सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसवाले सध्या देऊ शकतात. पण ते सरकार किती काळ टिकेल, याची शाश्वती नाही. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणे तर काॅंग्रेसमध्ये अवघडच आहे.

हातावर घड्याळ बांधणे?

पंकजा यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय असेल. त्यात त्यांना फारसा राजकीय लाभ होण्याची शक्यता फारच कमी आहे. पवारविरोध ही गोपीनाथ मुंडे यांची प्रमुख राजकीय शैली होती. पंकजा यांचा तेवढा कडवा पवारविरोध नसला तरी त्यांची मूळ व्होटबॅंक त्या आधारावरच पोसलेली आहे. त्यांचे चुलतबंधू धनंजय हे राष्ट्रवादीत आहेत. धनंजय आणि पंकजा या एकाच पक्षात राहतील, याची शक्यता फारच कमी आहे. पंकजा राष्ट्रवादीत आल्या तर धनंजय यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले राहतील. राष्ट्रवादीतही पवार कुटुंब हे पहिल्या स्थानावर आहे. तेथेही पंकजा यांना दुय्यम भूमिका घ्यावी लागेल. त्यांना मानणारा वर्गही त्यांच्यापासून दूर जाईल. फायद्यापेक्षा त्यांचे नुकसानच जास्त होण्याचा धोक आहे. त्यामुळे सध्या तरी हा पर्याय विचारात नाही, यावर टिक करावे लागेल.

मग काय करावे?

पंकजा यांचे वय त्यांच्या बाजूने आहे. राजकारणात त्यांना मोठा पल्ला गाठायचा आहे. राजकीय आयुष्यात असे चढउतार येत असतात. भाजपमध्ये त्यांचे स्थान लोकनेता म्हणून आजही अबाधित आहे. त्यांना दुखावून भाजपला काहीच लाभ होणार नाही, ही वस्तुस्थिती त्या पक्षाच्या नेत्यांना माहीत नसेल, असे नाही. त्या पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार पंकजा यांच्यावर `अन्याय`होतो आहे, हे गृहितकच चुकीचे आहे. पक्ष बदललेला आहे. तो मोदी-शहा यांच्यासारख्या कठोर नेत्यांचा पक्ष आहे, हे पंकजा लक्षात घेत नसल्याचा दावा भाजपची मंडळी करतात. एखाद्या राज्यातील मातब्बर जातसमूहांच्या नेत्यांना डावलून इतरांना संधी देण्याचा प्रयोग मोदी आणि शहा यांनी केला. त्यात फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 2014 मध्ये क्रमांक लागला. तेव्हा खडसे यांनी नाराज होेणे स्वाभाविक होते. कारण त्यांची ज्येष्ठता त्यांना मोठी वाटत होती. पण 2014 मध्ये पंकजा या दुसऱ्या वेळच्या आमदार फक्त होत्या. त्यांनाही मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न तेव्हा पडणे आणि ते प्रत्यक्षात येणे अवघडच होते. तरीही त्यांनी तेथूनच आपल्यावर `अन्याय`होत असल्याचा जो सूर अनाहूतपणे लावला तो आतापर्यंत कायम ठेवला आहे. या जोपासलेल्या अन्यायग्रस्त भावनेचाच त्यांना आता त्रास होत आहे. त्यामुळे पक्षाने कोणताही निर्णय घेतला की पंकजा नाराज, अशाच बातम्या होऊ लागल्या आहेत. त्या पण हा संभ्रम दूर होणार नाही, याची काळजी घेत आहेत. विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवर संधी द्यायची नाही, हा नियम पक्षाने केला. त्याची कठोर अंमलबजावणी झाली आणि त्यात पंकजा, खडसे यांना विधान परिषदेवर स्थान मिळाले नाही. खरे तर पक्ष संघटना म्हणून हा मोठा निर्णय होता. पण मोदी-शहांनी तो अंमलात आणला. त्यामुळे ओबीसी नेत्यांत `अन्याया`ची भावना आणखी वाढीस लागली.

पक्ष नाराज की पंकजा?

परळीतील पराभवानंतर पंकजांनी मेळावा घेतला. या मेळाव्याला एकनाथ खडसेंना बोलविले. खडसेंनी पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात तोफ डागली. पंकजांनीही अप्रत्यक्षपणे तोच सूर लावला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे व्यासपीठावर असताना त्यांना भाषणाला अडचण यावी, अशी परिस्थिती निर्माण झाली. तरीही पक्षाने ते खपवून घेतले. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी त्यांनी एक दिवसाचे उपोषण जाहीर केले. ते एकटे पंकजांचे उपोषण दिसू नये म्हणून पक्षाचे नेते त्यात सहभागी झाले. म्हणजे पक्ष आणि पंकजा हे वेगळे नाहीत, हे दाखविण्याचा प्रयत्न पक्षाने केला. मुंबईतील आपण आपले कार्यालय सुरू करणार आहोत, अशी घोषणा पंकजा यांनी या मेळाव्यात केली होती. (खरे तर या घोषणेची गरजच काय होती? कारण नेता हा लोकांना भेटावाच लागतो.) शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचे स्वप्न त्यांनी या वेळी बोलून दाखविले होते. हा मेळावा म्हणजे भाजपला आपली ताकद दाखवून द्यायचा त्यांचा विचार आहे, हे भाजपच्या नेत्यांना माहीत नाही असे थोडेच आहे.

या साऱ्या घडामोडींनंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय सचिव नेमले. मध्य प्रदेशसारख्या राज्याची जबाबदारी दिली. त्या पक्ष संघटनेत सक्रिय होऊन मिश्र संदेश द्यायचे बंद करतील, अशी पक्षाला अपेक्षा होती. त्या पक्षात खूष आहेत की नाराज याचा थांगपत्ताच त्या लागू देत नाहीत. त्यामुळे ही संभ्रमावस्था त्यांनी बंद करून टाकली तर त्यांच्यासाठी ते योग्य राहीन.

फडणवीस केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्रात कोण?

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे त्यांचे आताच प्रमुख स्पर्धक आहेत. खरे ते पंकजा आणि फडणवीस या दोघांमध्ये सुरवातीला सख्य होते. फडणवीस यांना 2013 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष करण्यात गोपीनाथ मुंडे यांचीच प्रमुख भूमिका होती. दुर्देवाने गोपीनाथरावांचं निधन झाले आणि नंतर सारेच राजकीय चित्र बदलले. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. पंकजा या मंत्री झाल्या. दोघांमध्ये सुरवातीला बरा ताळमेळ होता. पण पंकजांची `जनतेच्या मनातील मुख्यमंत्री`ही भावना उघडपणे व्यक्त झाली आणि दोघांत सुप्त संघर्ष सुरू झाला. चिक्की प्रकरणामागे फडणवीस यांचा हात होता, असा पंकजा समर्थकांचा समज झाला, पंकजांकडे महिला व बालकल्याण खाते होते. या खात्याच्या जाहिरातींत मुख्यमंत्री म्हणून काही वेळा फडणवीस यांचा फोटो नसल्यापर्यंत हा वाद गेला. मुख्यमंत्री फडणवीस हे बीडच्या दौऱ्यावर असताना भाजपचा एकदा एकही आमदार त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, अशी परिस्थिती आली होती. यामागे पंकजांची फूस असल्याचा समज निर्माण झाला. मग त्यातून पंकजा यांचे विरोधक असलेल्या विनायक मेटे यांना फडणवीस यांनी जवळ केले. हा संघर्ष अजून कायमच आहे.

कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांतील असे संघर्ष नवीन नाहीत. गोपीनाथ मुंडे- नितीन गडकरी असा वाद भाजपमध्ये होताच. तरीही अशा वादांत कधी एक पाऊल मागे घेऊन वाटचाल करावी लागते. पंकजा यांनी ती तशी सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्रातून आज ना उद्या फडणवीस हे केंद्रात जातील. त्या वेळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या पर्यायामध्ये भाजपमध्ये जी नावे आहेत त्यात पंकजा यांचेच नाव आघाडीवर आहे. मोदी आणि शहा यांची जोडी पुढील पाच-दहा वर्षे तरी भाजपमध्ये सक्रिय राहील, अशी स्थिती आहे. त्यांच्याशी पंकजांना जुळवून घ्यावे लागेल. त्यासाठी `अन्याया`ची भावना दूर करावी लागेल. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरील नाराजीबद्दल बोलताना `माझे पुनर्वसन करायला मी काही पूरग्रस्त नाही`, असे थेट वाक्य वापरले होते. या वाक्यावर त्या कायम राहिल्या तर त्यांचे भाजपमध्येच भले होऊ शकेल, अशी परिस्थिती आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

पंकजा मुंडे, Pankaja Munde, नरेंद्र मोदी, Narendra Modi, महाराष्ट्र, Maharashtra, खासदार, वंजारी समाज, Vanjari Community, डाॅ. भागवत कराड, Dr. Bhagwat Karad, भाजप, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, एकनाथ खडसे, Eknath Khadse, चंद्रशेखर बावनकुळे, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, Sharad Pawar, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, Raj Thakre, आमदार, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, Government, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, लोकसभा, राजकारण, Politics, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, विनायक मेटे, Vinayak Mete, नितीन गडकरी, Nitin Gadkari, पुनर्वसन