Rashtriya Swayamsevak Sangh Rss Dand Stick Making Process | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंड बनतो तरी कुठे!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंड बनतो तरी कुठे!

बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात काळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी फुलपॅंट, पट्टा, मोजे, जोडे आणि दंडाचा (काठी) प्रामुख्याने समावेश आहे. हा दंड तयार करण्यासाठी विदर्भातले एक गाव प्रसिद्ध आहे. नागपूरच्या संघ शिक्षा वर्गाला जाणारे देश-विदेशातले स्वयंसेवक आवर्जून आपल्या बरोबर हा दंड घेऊन जातात. हे गाव कुठले...हा दंड बनविण्यासाठी प्रक्रिया काय, हे खास 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशात दंडाला (काठी) अनन्यसाधारण महत्त्व आहे. भरीव आणि उत्कृष्ट प्रतीची काठी धामणगावनगरीत तयार होते. नागपूर येथे दरवर्षी होत असलेल्या रेशीम बागेच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गात ४५ प्रांतातील ११ क्षेत्रांमधून स्वयंसेवक येतात. या स्वयंसेवकांकडे दरवर्षी धामणगावची काठी पोहोचते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात काळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी फुलपॅंट, पट्टा, मोजे, जोडे आणि दंडाचा प्रामुख्याने समावेश आहे.
हा दंड तयार करणे एक उत्कृष्ट कला व कौशल्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये असो की अन्य ठिकाणी दंड हा भरीव व भाजलेला आणि सरळ असणे जरुरीचे आहे. दंड विक्रेते शेतकऱ्यांच्या शेतातील धुऱ्यावर असलेले बांबूचे कुंदे खरेदी करतात. त्यानंतर सदर बांबूंना दंडामध्ये रुपांतरित करण्याकरिता विक्रेत्यांना खूप परिश्रम करावे लागतात. 

काठीला (दंड) सरळ करण्याकरिता जवस तथा सरकी तेलाचा वापर करावा लागतो. तद्‌नंतर विस्तवावरून या काठ्यांना भाजल्या जातात. या प्रक्रियेनंतर उन्हात गठ्ठे करून काही दिवस ऊन दिल्यानंतर या काठ्या सरळ टवटवीत भरीव आणि वापरण्यायोग्य होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्र असलेल्या नागपूर येथील रेशीम बाग याठिकाणी दरवर्षी संघाचा वर्ग होत असतो. या वर्गात देश-विदेशातील ४५ प्रांतांतील ११ क्षेत्रांमधून संघ स्वयंसेवक उपस्थित राहतात. अनेक स्वयंसेवक धामणगावची काठी वापरतात. आपल्यासोबत घेऊनसुद्धा जातात. प्रत्येक प्रांतात धामणगावची काठी पोहोचते. तसेच ज्याठिकाणी शंकरपट भरविला जात होता त्या-त्या ठिकाणी धामणगावच्या प्रसिद्ध काठीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असे.

गौरवास्पद कलाकौशल्य

उत्कृष्ट काठी तयार करण्याच्या कलेत धामणगाव नगरीचे नाव पूर्वीपासूनच अग्रेसर आहे. येथील नंदेश्‍वर, भैसारे व अन्य काही कुटुंब प्रामुख्याने काठी तयार करतात. त्यांनी तयार केलेली काठी आम्ही संघांच्या शाखांमध्ये लहानपणापासूनच वापरतो आहे. धामणगावनगरीत काठी तयार करण्याबाबत उत्कृष्ट कलेचे दर्शन घडते ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रांत सहसंघचालक चंद्रशेखर राठी यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून काठ्या पुरवित आहे. माझे आजोबा पांडुरंग, वडील शंकरराव, मी आणि आता माझा मुलगा नीलेश गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे. आम्ही तयार केलेल्या काठ्या (दंड) नागपूर येथील संघ कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून जात आहेत. याव्यतिरिक्त विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, हिंगणघाट, बुलडाणासह जवळजवळ पूर्ण विदर्भात आम्ही तयार केलेल्या काठ्या वापरल्या जातात -शेषराव नंदेश्‍वर, कारागीर, धामणगावरेल्वे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ, Vidarbha, नागपूर, Nagpur, नगर, कला, व्यवसाय, Profession, बुलडाणा, Buldana