popular uncle and nephew controversies in indian politics | Sarkarnama

आय अॅम द बाॅस : राजकारणातील बहुतांश काकांचे पुतण्यांना अस्मान 

आय अॅम द बाॅस : राजकारणातील बहुतांश काकांचे पुतण्यांना अस्मान 

राजानंद मोरे
गुरुवार, 17 जून 2021

राजकारणात काका-पुतण्याच्या नात्याला विशेष महत्व आहे. एकमेकांच्या जोडीने स्पर्धकाला चितपट करणारी ही जोडी नंतर कसे आपलेच शत्रू होतात, हे अनेकदा दिसून आले आहे. बिहारमध्ये पासवान कुटुंबातील संघर्ष देखील हेच दाखवत आहे. अनुभवाने ज्येष्ठ असलेले काका हे अनेकदा पुतण्यांना भारी पडतात. बिहारमध्येही तेच घडले आहे. या निमित्ताने काका-पुतण्यांच्या संघर्षाने गाजलेल्या जोड्यांचा हा आढावा

बिहारमध्ये चिराग पासवान यांना त्यांच्या काकांनी धक्का देत पाच खासदारांना फोडले. या घटनेनंतर देशातील राजकारणात काका-पुतण्याच्या नात्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले. 
लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. त्यांनी इतर चार खासदारांना सोबत घेत बंड पुकारले आहे. स्वतः पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत.

या बंडाने बिहारमधील राजकारण ढवळून निघाले असून मंगळवारी दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. चिराग यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. त्यानंतर चिराग यांनी पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. आता पक्षाकडे चिराग हे एकमेव खासदार उरले आहेत. वडिलांच्या निधनानंतर चिराग यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी काकांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. तेथून त्यांची राजकीय घसरगुंडी सुरू झाली. ती अजून सुरू आहे. काका-पुतण्यांच्या राजकारणात अनेकदा काकाच वरचढ ठरत असल्याचा अनुभव आहे. बिहारमध्येही तसेच घडत आहे. पंजाबातही माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी आपला पुतण्या मनप्रीत बादल याला चीत केले होते. हा पुतण्या आता काॅंग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये आहेत.

महाराष्ट्रातही काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकारण ढवळून काढलं आहे. पुतण्याने काकांविरोधात बंड केल्याचीच अनेक उदाहरणे आहेत. या शह-काटशहाच्या राजकीय नाट्याचे अनेक अंक अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. शरद पवार-अजित पवार, बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, सुनील तटकरे- अवधूत तटकरे, अनिल देशमुख-आशिष देशमुख अशी काही नावे लगेच समोर येतात. कोकणापासून विदर्भापर्यंत काका-पुतण्यांचं राजकारणातील अस्तित्व ठळकपणे जाणवतं.

अजित पवारांचं पहिल्यांदाच थेट बंड

देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही काका-पुतण्याची जोडी आजही अभेद्य आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर पवार काका-पुतण्यात दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा होती. पण काही तासांतच विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत काका-पुतण्याचे नातं अभेद्य असल्याचे दाखवून दिलं. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक बातम्या विरोधकांनी पेरल्या पण या नात्यात कधीच दुरावा आला नाही. आपणच बाॅस असल्याचे शरद पवार यांनी वेळोवेळी दाखवून दिले.

राज ठाकरेंची वेगळी चूल

महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अन् मनसे प्रमुख राज ठाकरे ही काका-पुतण्याची जोडीही नेहमीच चर्चेत राहिली. राज ठाकरे यांच्याकडे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. पण उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आल्याने ते नाराज होते. शिवसेनेतील त्यांचे महत्व कमी होत गेल्याने ते 2005 मध्ये बाहेर पडले आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. पण राज ठाकरे यांनीही कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. आजही त्यांच्या प्रतिमेसमोर ते तितक्याच नम्रपणे झुकतात. पण येथेही बाळासाहेब वरचढ ठरले.

मुंडे परिवारात फूट

दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि सध्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या काका-पुतण्यातील राजकीय युध्द अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. काकांचं बोट धरून राजकारणात आलेल्या धनंजय मुंडेंनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना आमदारकीपर्यंत अनेक पदं दिली. 2009 मध्ये पंकजा मुंडे यांना विधानसभेचं तिकीट मिळालं अन् काका-पुतण्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेत संधी दिली. पण 2013 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.
 धनंजय यांनी पंकजा मुंडे यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव केला. 

संदीप व अवधूत तटकरेंचा काकांविरोधात शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनाही त्यांच्या पुतण्याने धक्का दिला आहे. ते प्रदेशाध्यक्ष असतानाच संदीप तटकरे यांनी रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून त्यांच्यावर कुरघोडी केली. त्यावेळी संदीप यांचे वडील अनिल तटकरे व बंधू अवधूत दोघेही आमदार होते. पण तटकरे कुटूंबातील राजकीय वैमनस्य वाढत गेल्याने संदीप यांनी 2016 मध्ये काकांविरोधात बंड पुकारात आव्हान दिलं. त्यानंतर तीन वर्षातच अवधूत व अनिल तटकरेही शिवसेनेत दाखल झाले. खुद्द सुनील तटकरे यांनी या पुतण्यांचे आव्हान मोडून काढल्याचे दिसत आहे.

बीडमध्ये क्षीरसागरांचं बंड

बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनीही काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बंड पुकारलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करत संदीप यांनी माजी मंत्री असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना धूळ चारली. संदीप यांनी 2016 मध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपासूनच आपल्या काकांना आव्हान देण्यास सुरूवात केली होती. त्यात त्यांना यशही मिळालं. जयदत्त हे शिवसेनेत गेल्यानंतर संदीप यांना धनंजय मुंडेंनी बळ दिलं. या राजकीय लढाईत काकांवर मात करत संदीप 'जायंट किलर' ठरले. पण जयदत्त हे देखील कमी अनुभवी नाहीत. त्यामुळे ते सध्या योग्य संधीच्या प्रतिक्षेत आहेत.

विदर्भात आशिष देशमुखांचं आव्हान

नागपूरमधील काटोल मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी घेत आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांचा पराभव करत धक्का दिला. पण 2018 मध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी असल्याने त्यांना काकांविरोधात निवडणूक लढता आली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारमध्ये असले तरी आशिष देशमुख सातत्याने काकांवर टीका करताना दिसतात.

उत्तर प्रदेशात काकांसमोर अखिलेश नरमले

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यामध्ये 2017 मध्ये तणाव निर्माण झाला. त्यावेळी मुलायमसिंग यांच्या जागी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव विराजमान झाले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी आघाडी केली. या निवडणुकीत सपाला मोठा फटका बसला. शिवपाल यादव निवडून आले तरी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रगतीशील समाजवादी पक्षाची स्थापना करून पुतण्यासमोर आव्हान उभं केलं. पण आता 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काका-पुतण्याची जोडी पुन्हा एक होणार आहे. अखिलेश यादव यांनी काकांच्या पक्षाशी आघाडी करण्याचे संकेत दिले असून त्यांच्यासाठी विधानसभेची जागा अन् सत्ता आल्यास कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे जाहीर केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

राजकारण, Politics, रामविलास पासवान, खासदार, महाराष्ट्र, Maharashtra, शरद पवार, Sharad Pawar, अजित पवार, Ajit Pawar, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, Raj Thakre, गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, Dhanajay Munde, सुनील तटकरे, Sunil Tatkare, अनिल देशमुख, Anil Deshmukh, आशिष देशमुख, कोकण, Konkan, विदर्भ, Vidarbha, काँग्रेस, Indian National Congress, मनसे, MNS, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, पंकजा मुंडे, Pankaja Munde, पराभव, defeat, आमदार, वर्षा, Varsha, संदीप क्षीरसागर, Sandip Kshirsagar, जयदत्त क्षीरसागर, Jaydatta Kshirsagar, मात, mate, टोल, निवडणूक, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, विकास, उत्तर प्रदेश, अखिलेश यादव, Akhilesh Yadav