Sharad Pawar-Manmohansingh
Sharad Pawar-ManmohansinghSarkarnama

मंत्रीपदाची शपथ घेतली आणि ती फाईल क्लिअर करण्यासाठी पंतप्रधानांचा शरद पवारांना फोन!

अन्नधान्याच्या टंचाईवर कशी मात केली, हे खुद्द शरद पवार यांनी सांगितले..

पुणे : अन्नधान्याच्या बाबतील देश स्वयंपूर्ण आज झाला असला तरी धोरणकर्त्यांसमोर कृषी क्षेत्रातील आव्हाने कशी उभी असायची, याचा अनुभव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशिवाय कोणाला सर्वाधिक असणार? अन्नधान्यामुळे गोदामे भरून गेलेली असताना आणि हे अन्नधान्य साठविण्यासाठी सर्वाधिक खर्च होत असतानाची सध्या तक्रार होत असते. पण कधीकाळी परिस्थिती अशी होती की धोरणकर्त्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या रहायच्या. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी करावा लागणारा लढा हा एखाद्या चित्तथरारक लढाईसारखाच होता. कारण सुमारे 125 कोटींच्या लोकसंख्येच्या भोजनाची काळजी घेण्यासाठी अनेक उपायोजना कराव्या लागायच्या. तेव्हा कुठे यश मिळायचे. याशिवाय दुष्काळ, पूर, रोगराई अशा अस्मानी संकटांचा सामना करत ही परिस्थिती सरकारांना हाताळावी लागते. 

देशात सध्या गहू आणि तांदूळ यांचा मुबलक साठा आहे. अन्नधान्य महामंडळाकडे सुमारे 1000 दशलक्ष टन या धान्याची खरेदी केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात विक्रमी खरेदी यंदा झाली. त्याच्या जवळपास चौपट अन्नधान्य आज सहज उपलब्ध आहे. देशाची वार्षिक गरज ही सुमारे 260 दशलक्ष टन इतकी असते. उलट त्याच्या साठवणुकीवर प्रचंड खर्च करावा लागत आहे.  हे अन्नधान्य सरकार सार्वजनिक व्यवस्थेद्वारे का जनतेला देत नाही, असा सवाल सध्या विचारण्यात येत आहे. मात्र पंधरा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती.

देशात 1960 ते 70 दरम्यान जन्मलेल्या अनेकांना त्यांच्या लहाणपणी मिलोचा गहू खाल्लाच्या आठवणी आजही कायम असतील. हा गहू अमेरिकेतून आयात झालेला होता. हरितक्रांतीनंतर गव्हाचे देशांतर्गत उत्पादन वाढले. तरीही तो सहजपणे उपलब्ध होत होता, असे नव्हते. त्यामुळे  त्यानंतरच्या दशकात जन्मलेल्या मंडळींना रेशनच्या दुकानात रांगेत उभे राहून अन्नधान्य खरेदी केल्याचे स्मरणात असेल. सन 2000 नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलत गेली आणि देशातील साठा गरजेइतका होऊ लागला. म्हणजे सुमार 200 लाख टनापर्यंत गरजेइतके धान्य देशात साठवू लागले.

मात्र 2004 मध्ये दुष्काळाचा उत्पादनावर परिणाम झाला. याच काळात पंतप्रधानपदाची सूत्रे ही मनमोहनसिंग यांच्याकडे आणि शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री झाले. कृषीमंत्रिपदाची शपथ घेऊन पवार हे घरी आले. त्याच वेळी त्यांच्याकडे एक फाईल आली होती. ही फाईल होती गहू आयातीचा निर्णय घेण्याची. या अनुभव पवार यांनी एका कृषीदिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात सांगितला. ``डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेऊन घरी आलो तेव्हा पहिली फाईल माझ्यासमोर आली ती परदेशातून गहू आयात करण्यासंबंधीची. मी अतिशय अस्वस्थ झालो. मी सही न करता विचार करतो म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी मला डॉ. मनमोहन सिंह यांचा फोन आला. ते म्हणाले, ``पवार साहब आपने स्टॉक की पोजिशन क्या है देखी क्या? जर तीन आठवड्यात आपल्या देशात धान्य आले नाही तर वेगळ्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे नाईलाजाने मला ती फाईल क्लिअर करावी लागली. दुर्दैवाने परदेशातून आपल्याला गहू आणावा लागला.``

त्यानंतर परिस्थिती बदलली आणि देश स्वयंपूर्ण पवार यांच्याच कारकिर्दीत झाला, हा इतिहासही घडला. पण दुष्काळाच्या काळात सरकारे कशी कामे करायची हे पण त्यांना याच कार्य़क्रमात सांगितले. ``एकेकाळी, १९७२-७३ साली वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. माझ्याकडे गृहखाते आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे काम सोपवले होते. दुष्काळ पडला, अन्नधान्य नव्हते. अशावेळी आम्ही परदेशातून अन्नधान्य आयात करत होतो. मला आठवतंय, अन्नधान्याची बोट मुंबईच्या बंदरावर लागली की, मी त्या ठिकाणी जायचो आणि धान्य लवकर उतरवून ते राज्याच्या रेशन धान्य दुकानात पोहचवण्याची खबरदारी घ्यायचो. ते धान्य वेळेत पोहचले नाही तर संघर्ष आम्ही थांबवू शकलो नसतो. मला आठवतंय, अन्नधान्य नव्हतं म्हणून एक दिवशी लाटणं घेऊन मुंबईतील काही महिला मंत्रालयासमोर आल्या होत्या. ही स्थिती महाराष्ट्राची होती. नाईक साहेब हे त्यावेळी पंजाब, हरयाणा या राज्यातील मुख्यमंत्र्यांना फोन करुन सांगायचे की, राज्य सरकारमधील मंत्री मी तुमच्याकडे पाठवत आहे, तुम्ही काहीतरी धान्य आम्हाला द्या. मग तिथून आपण धान्य आणत होतो.``

ही परिस्थिती अनुभवलेला भारत आता वेगळ्या स्थितीत आहेत. अन्नधान्य साठवायला गोदामे कमी पडत आहेत, अशी परिस्थिती आहे. हे कसे घडले हे पण पवार यांनी कथन केले. शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज दिले, मालाच्या किंमती वाढविल्या, उत्पादन वाढेल असे बी- बियाणे तयार केले, संशोधनाला अधिक महत्त्व दिले, या सर्वांचा चांगला परिणाम आज बघायला मिळतोय. दहा वर्षांनंतर जेव्हा मी या खात्याचे काम सोडले, तेव्हा मला आनंद होत होता. या देशातील काळ्या आईशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या कष्टांनी जगामध्ये दोन नंबरचा गहू निर्यात करणारा देश म्हणून भारताला मान मिळवून दिला. तांदूळ निर्यात करणारा जगात प्रथम क्रंमाकाचा देश म्हणून शेतकऱ्यांनी आपल्याला ओळख निर्माण करुन दिली. दोन नंबरचा साखर, कापूस निर्यात करणारा देश म्हणून नावलौकिक मिळवून दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com