Pawar rose to power by defeating Kakade but later won him over too | Sarkarnama

काकडेंना नमवत पवार मोठे झाले..पण त्यांनी काकडेंनाही जवळ केलेब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

काकडेंना नमवत पवार मोठे झाले..पण त्यांनी काकडेंनाही जवळ केले

संतोष शेंडकर
गुरुवार, 16 जुलै 2020

यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या उमेदवारीची माळ नवख्या शरद पवारांच्या गळ्यात टाकली. मात्र, उमेदवारीची खात्री असलेल्या कै. मुगुटराव काकडे यांना डावलण्यात आले. यामुळे नाराज काकडे गटाने कै. बाबालाल काकडे यांना मैदानात उतरविले. इथून पवार-काकडे यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू झाला. बारामतीच्या रणांगणात याचे पडसाद गेली चाळीस वर्षे उमटत होते. हा संघर्ष अलिकडे बोथट होत गेला आणि आता शरद पवार यांनीच मोठ्या मनाने काकडे गटाचे वारसदार सतीश काकडे यांना वाढदिवसाचे भोजन देऊन पासष्ट वर्षाच्या संघर्षाचा स्वादिष्ट समारोप केला. या राजकीय संघर्षाची ही कहाणी.

बारामतीच्या राजकारणात शरद पवार यांचा उदय झाला. मात्र त्यांना सुरवातीपासूनच काकडे कुटुंबियांशी राजकीय संघर्ष करावा लागला. काकडे देखील राजकारणात आणि सहकारात मुरलेले घराणे होते. त्यामुळे हा संघर्ष राज्यात चर्चेत राहिला. बारामतीपासून जवळच असलेल्या निंबूत परिसरात काकडेंचे वर्चस्व होते. येथूनच सहकाराची मुहूर्तभेट त्यांनी रोवली. 1911 साली कै. साहेबराव काकडे यांनी सहकारी सोसायट्या स्थापन करण्यास पुढाकार घेऊन सहकाराचा शुभारंभ केला. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र कै. मुगुटराव काकडे व कै. बाबालाल काकडे यांनी नीरा कॅनाल सोसायट्यांचा संघ, बारामती-इंदापूर सुपरवायझिंग युनियन, पुणे जिल्हा खरेदी विक्री संघ, जिल्हा बँक, नीरा बाजार समिती या नामवंत सहकारी संस्था ताब्यात घेतल्या आणि अनेक वर्ष त्यावर वर्चस्व गाजविले.

कै. मुगुटराव काकडे यांनी सहकाऱ्यांना घेऊन १९६३ ला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि काकडे गट राज्याच्या राजकारणात मोठा झाला. त्याकाळी साखर कारखाना म्हणजे मोठे साम्राज्य होते.  त्यांनी सहकारी सोसायट्या, उपसा सिंचन योजना, बंधारे उभारायला सहकार्य केले.

त्यामुळे पवार गटासाठी काकडे गटाचे प्रकरण सुरवातीला तसे जडच होते. १९५५-५६ साली नीरा कॅनाल सोसायट्यांचा संघ ही संस्था काकडे गटाने पवार गटाकडून ताब्यात घेतली. या संघाचे अध्यक्ष-सेक्रेटरी असलेल्या गोविंदराव पवारांचा काकडेंनी पराभव केला. गोविंदराव हे शरद पवारांचे वडिल. पवार-काकडे खरा संघर्ष तिथून सुरू झाला.

काकडे-पवार खडाखडी अशी झाली...

नीरा कॅनाल सोसायटीच्या १९५५ च्या निवडणुकीत मुगुटराव काकडे विरूध्द गोविंदराव पवार असा सामना झाला. त्यानंतर १९६७ च्या विधानसभा निवडणूकीत शरद पवार विरूध्द बाबालाल काकडे

तर १९८५ च्या विधानसभा निवडणूकीत - शरद पवार विरूध्द शहाजी काकडे अशी निवडणूक झाली. . 1995 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात रतन काकडे लढले होते. याशिवाय जिल्हा बँकेच्या चार-पाच निवडणुकांमध्ये अजित पवारांविरोधात सर्जेराव काकडे उभे राहत होते.

शरद पवारांना पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी...

त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवारांना बाबालाल काकडे यांनी आव्हान दिले. या ऐतिहासिक निवडणुकीने महाराष्ट्राला दिग्गज नेता मिळाला. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी हे तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तींना उमेदवारी द्या. पवार नवखे आहेत. असा दावा करत होते. हे `ज्येष्ठ` म्हणजे काकडे कुटुंबातीलच कोणाला तरी उमेदवारी मिळावी, असा त्यामागचा सूर होता. परंतु पवारांचे विद्यार्थी काँग्रेसचे काम, संघटन, संयम पाहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पवारांचाच आग्रह धरला.

पवारांच्या उमेदवारीमुळे समजा पराभव झालाच तर काॅंग्रेसची बारामतीची एक जागा गेली, असं समजा,` असे विरोध करणारांना चव्हाणांनी ठणकावलं. बारामतीचे काकडे, कराडचे बाळासाहेब देसाई आणि कऱ्हाडचे आनंदराव चव्हाण, अकलूजचे मोहिते हे पिढ्यानपिढ्या एकमेकांचे नातेवाईक. यशवंतराव चव्हाण यांना हा गट एकत्र येऊन प्रभावशाली होईल असे वाटत होते. यातूनच त्यांनी मुगुटराव काकडेंना कारखाना देण्यास आणि १९६७ ची काँग्रेसची उमेदवारी देण्यास विरोध केला. चव्हाणांनी १९६७ ला पवारांना पूर्ण साथ दिली आणि प्रचारासाठी स्वतः सभा घेतल्या. पाहुणे- पाहुणे एक होऊन आपल्याला भारी पडू नयेत हा चव्हाणांचा होरा असेलच. पण चव्हाण हे घराणेशाही, बडी मंडळी यांच्याही विरोधात होते, हेही यावरून लक्षात येते.

शरद पवारांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज मंडळींनी काँग्रेसचा राजीनामा दिला. नाराज मंडळींसह शेकापने बाबालाल काकडे यांना पाठींबा दिला. पवार यांच्यासोबत काँग्रेसचा शिक्का होता. शिवाय स्वातंत्र्यसैनिक, तरूण कार्यकर्ते सोबत होते. बारामतीतील, पुण्यातील काँलेजचे विद्यार्थी मदतीला आले. पवार बाजारात भाजीपाला विक्री करायचे त्यावेळच्या बाजारकरी लोकांनही हिरीरीने प्रचार केला. पवारांना ३५ हजार तर काकडेंना १७ हजार मते मिळाली. जिल्ह्यात सर्वात जास्त फरकाने पवार निवडून आले. १९७२ ला मताधिक्य वाढले आणि पवार गृह राज्यमंत्री झाले. त्यानंतर शिक्षणमंत्री, कृषीमंत्री, मुख्यमंत्री पदापर्य़ंत पोहोचले. तरी बारामतीतील काकडेंशी स्थानिक संघर्ष उडत होताच.

देसाई-मोहिते आणि काकडे असाही त्रिकोण

या साऱ्या घडामोडींबद्दल बोलताना मुगुटराव यांचे बंधू व पणन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शामकाका काकडे म्हणाले, ``यशवंतराव चव्हाणांचा काकडेंना साखर कारखाना द्यायला विरोध होता. पण अप्पांचे (कै. मुगुटराव काकडे) आणि तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब भारदे यांचे सलोख्याचे संबंध होते. भारदेंनी चव्हाणांच्या विरोधात जाऊन अप्पांना कारखाना दिला. कराडचे देसाई, अकलूजचे मोहिते आणि बारामतीचे काकडे यांचा गट एकत्र येऊन प्रभावशाली होऊ नये, यासाठी चव्हाण काळजी घेत होते.

याच भावनेतून पुन्हा एकदा चव्हाण यांनी अप्पांना १९६७ ची उमेदवारी नाकारली. आम्हाला खच्ची करण्यासाठी. विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या शरद पवार यांना उमेदवारी दिली. म्हणून मग बाबांना (कै. बाबालाल काकडे) अपक्ष उभे करण्याचा निर्णय घेतला. शेकापने बाबांना पाठिंबा दिल्याने निवडणुक अत्यंत चुरशीची झाली. परंतु काँग्रेस मातब्बर पक्ष होता. चव्हाणांनी ताकद लावून एका मतदारसंघात तब्बल चार सभा घेतल्या. पक्ष पाठिशी असल्याने पवार १४ हजार मतांनी निवडून आले.``

वसंतदादांनी काकडेंना बोलावून उमेदवारी दिली...

त्यानंतर अठरा वर्षांनी १९८५ साली पवार-काकडे संघर्ष जोरदार झाला. त्या निवडणुकीत पवारांनी काॅंग्रेसची साथ सोडून स्वतःचा समाजवादी काॅंग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. शरद पवार यांच्या विरोधात शहाजी काकडे यांना इंदिरा काँग्रेसची उमेदवारी मिळाली. वसंतदादा पाटील यांनी काकडे गटाला सर्व ताकद पुरविली. वसंतदादा पाटलांनीच शहाजी काकडे यांना बोलवून उमेदवारी दिली होती. पवारांच्या निवडणुकांतील ती एक संघर्षपूर्ण निवडणूक ठरली. मात्र यावेळीही १८ हजार मतांनी काकडे गटाचा पराभव झाला. त्यापुढील काळात मात्र पवार केंद्रात गेले. देशातल्या पहिल्या फळीचे नेते बनले. त्यांना निवडणुकांना विरोधच उरला नाही.

काकडे यांच्या कुटुंबातील संभाजीराव काकडे हे पण दुसरीकडे पवारांना राज्य पातळीवर आव्हान देण्याचा अधुनमधुन प्रयत्न करत होते. कधी जनता पक्ष तर कधी जनता दल या मार्फत ते पवार विरोधकांची एकी बांधण्याचा अधुनमधुन प्रयत्न करत होते. त्यामुळे शरद पवार-संभाजीराव काकडे यांच्या संबंधातही चढ-उतार राहिला. समाजवादी असलेले संभाजीराव काकडे हे विधान परिषदेला आमदार, दोन वेळा खासदार होते. आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. शरद पवारांनी पुलोदची आघाडी केली. मात्र त्या वेळी इतर समाजवादी पक्षाचा पाठींबा मिळविण्यासाठी व पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी संभाजीराव काकडे यांनी वाटा उचलला होता. असे ऐक्याचे प्रयोगही होत होते.

`पवार आमच्याशी खूनशीपणाने वागले नाहीत...`

श्याम काकडे आणखी आठवण सांगताना म्हणाले की पवारांना पक्षाचा पाठिंबा मिळत गेला आणि त्यामुळे त्यांना पुढे पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यांनी कायम राजकीय विरोध केला परंतु वैयक्तीक विरोध किंवा खुनशीपणा केला नाही. माझे व अजितदादांचे चांगले संबंध आहेत. २००५-०५ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मी पुरंदर व बारामती तालुक्यातील गावे असलेल्या नीरा बाजार समितीला सभापती होतो. अजित पवारांनी त्यावेळी मला राष्ट्रवादीकडून पुरंदरची आमदारकी लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु 'सहकार' सोडून मला काही करायचे नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

श्यामकाका यांच्या म्हणण्यानुसार आम्ही नेहमीच भांडत होतो, असे नाही. पवार हे 1984 मध्ये लोकसभेवर निवडून आले. नंतर त्यांनी लोकसभेचा राजीनामा देत पुन्हा विधानसभेत जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी बारामती लोकसभेच्या पोटनिवडणुकीत संभाजीराव काकडे यांना सर्वांनी काॅंग्रेसच्या विरोधात उमेदवारी दिली. या निवडणुकीत काॅंग्रेसच्या शंकरराव पाटलांना संभाजीराव काकडेंनी पराभूत केले. त्या वेळी पवारांनी मदत केली. लाला आणि पवार मिळून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षही ठरवायचे, असेही शामकाकांनी स्पष्ट केले. मात्र थोडा काळ सख्य जमल्यानंतर पुन्हा विरोध हा असायचाच. त्यानंतर अजितदादांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघात 1995 मध्ये रतन काकडे यांनी निवडणूक लढविली होती.

सहकारावरील काकडेंचे वर्चस्व लयाला

शहरी मंडळींकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात घेण्यात मुगुटराव काकडेंचा मोठा वाटा होता. सहकारात पवार गटाला पुणे जिल्ह्यात फारशी सत्ता त्या काळात नव्हती. शिवाजीराव काळे, साहेबराव सातकर आणि अनंतराव थोपटे यांच्या सोबतीने १९७१ मध्ये बाबालाल काकडे बँकेचे अध्यक्षही झाले. मुगुटराव काकडेही संचालक होते. काकडे गटाच्या सहकारातील सत्तेला अजित पवार यांनी १९९० मध्ये पहिला सुरुंग लावला. अजितदादांनी काकडे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात घेतली. पणन महामंडळाच्या निवडणुकीत शामकाका काकडे हे १९८५ पासून ३५ वर्ष संचालक राहिले. या निवडणुकीत पवारांच्या पाठींब्यावरील उमेदवारांचा सलग पराभव होत गेला. १९९९ साली मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मधुकर चव्हाण यांच्या सहकार्याने शामकाका उपाध्यक्षही झाले. 'मी संचालक होऊ नये म्हणून पवार गट खूप प्रयत्न करायचा' असे शामकाका यांनी सांगितले. शामकाकांनी भूविकास बँकेच्या निवडणुकीत पवार गटाच्या गणपतराव पवार यांना पराभूत केले.

`सोमेश्वर`साठी सतत रस्सीखेच

सोमेश्वर कारखान्यातही ९२ पर्यंत पवार गटाला यश मिळाले नाही. शरद पवार हे मुख्यमंत्री असतानाही ते काकडे गटाकडून कारखाना घेऊ शकले नव्हते. ८७ साली कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी लागली होती. परंतु ९० च्या विस्तारीकरणावरून उठलेले मोहोळ शमले नाही. राजकारणात नव्या दमाने आलेल्या अजित पवारांनी काकडे गटाचा एकेक शिलेदार आपल्याकडे घेत ९२ च्या ऐतिहासिक निवडणुकीत काकडे गटाचे मर्मस्थळ असलेला कारखाना ताब्यात घेतला तो आजतागायत. यानंतर काकडे गटाच्या ताब्यातील संस्थांचा संकोच होत गेला. कारखान्यात, जिल्हा बँकेत शिरकाव करता आला नाही. तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात पवारांना कार्यकर्तेही मिळत नव्हते तो पूर्ण भाग पवारांच्या ताब्यात आला. तालुक्या-जिल्ह्यासोबत पवार राज्यात आणि केंद्रातही सर्वोच्च शक्ती झाले.

सतिश काकडे यांचा लढा आणि सलोखा

अशा स्थिततही काकडे गटाचे वारसदार सतीश काकडे यांनी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनात उडी घेत पवारांशी संघर्ष कायम ठेवला. राजू शेट्टींसोबतच्या आंदोलनात राज्यातील साखरउद्योगाचे लक्ष वेधले. तालुक्यातील पवारविरोधी महाआघाडीचे अध्यक्ष बनले. अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हाही स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात निवडून आले. २००७-०८ ची निवडणूक काकडे गटाने थोड्या फरकाने गमावली तर २०१४-१५ च्या निवडणुकीत विजयाच्या जवळ जातात असे वाटतानाच मोठ्या फरकाने पराभूत झाले. अजित पवार यांनी सतीश काकडे घेऊन येत असलेली कामे विरोधक म्हणून कधी नाकारली नाहीत. विरोधक म्हणून त्यांना थेट भेटीची परवानगी होती. निवडणुकीच्या वेळेला राळ उठविली तरी विकासकामात सहकार्यच केले. त्यामुळे संघर्ष विरत चालला होता. अडीच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार यांना मदतीचा हात दिला.

बेरजेचे राजकारण झाले सुरू...

अजित पवार हे 2014 च्या निवडणुकीनंतर सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांनाही बेरजेची आवश्यकता वाटत होती. सतीश काकडे यांनी अजित पवारांना विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी निंबूतमध्ये निमंत्रित केले आणि जंगी मिरवणूक काढली. पवार कुटुंबियांशी पन्नास वर्षाच्या वादाला पूर्णविराम देत आहे अशी घोषणाही काकडे यांनी काकडे गटाचे ज्येष्ठ नेते शामकाका काकडे यांच्या उपस्थितीत केली. शेतकरी चळवळीत लढत राहणार हेही आवर्जून स्पष्ट केले. त्यानंतर सतीश काकडे-अजित पवार यांचे मैत्रीपर्व सुरू झाले. अजितदादांनी विरोधक असताना सतीश काकडे यांना दिलेली प्राधान्याची वागणूक, विकासकामात केलेली मदत यामुळे सतीश काकडे प्रभावात आले. सतीश काकडे यांनी 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अजितदादा आणि सुप्रियाताई यांचेच काम केले. मात्र, शरद पवार यांच्याशी सविस्तर भेट झाली नव्हती. लॅाक डाऊनच्या आधी सिल्वर ओक या निवासस्थानी पवार यांना भेटून गावासाठी राष्ट्रीयकृत बँक द्या अशी मागणी केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसादही मिळाला.

या साऱ्या घडामोडींबद्दल बोलताना सतिश काकडे म्हणाले की माझ्या चुलत्यांनी राजकीय विरोध करताना पवारांवर टीका केली होती. तो त्यांचा अधिकारही होता. मी मात्र मागच्या पिढीचा असल्याने शरद पवारांवर कधी टीका केली नाही. अजितदादांवर मात्र केली होती. पण दादांचा कामाचा झपाटा, विकासात विरोधक असतानाही मला केलेली मदत हाही मोठेपणा आहे. पवारसाहेबांबद्दल आपल्या मनात आदरच होता. परवाच्या भेटीने तो आणखी वृद्धिंगत झाला. शेतकऱ्यांसाठी कुणी करत असेल तर माझ्यासारख्याला त्याबद्दल आदरच राहणार. त्यांच्यासारख्या सर्वोच्च व्यक्तीने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा एकाअर्थी सन्मानच केला आहे, असेही सतीश काकडे यांनी सांगितले.

अशी झाली साखरपेरणी...

शेतकरी संघटनेचे बारामतीतील हक्काचे स्थान म्हणजे काकडे हे होते. पवार यांच्याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे बारामतीत येऊन आंदोलन करत होते. तेव्हा त्यास सारी रसद ही काकडे यांची असायची. त्यानंतर शेतकरी संघटनाही राष्ट्रवादीच्या नजीक केली. शेट्टी आणि पवार यांचे वैर मिटले. राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यासाठी पवार-शेट्टी यांच्या चर्चेत सतीश काकडे यांनी मोलाची भूमिका वठविली होती. या चर्चेसाठी शेट्टींसह सतीश काकडे पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी त्रेपन्न वर्षात प्रथमच गेले. पवार यांनी अडीच-तीन तास शेतीचे प्रयोग दाखविले. ज्या दिवशी ही भेट झाली.

त्याच दिवशीच सतीश काकडे यांचा वाढदिवस असल्याचे समजताच जेवूनच जा असा आग्रह पवारांनी शेट्टी व काकडे यांना केला. त्यांचे आदरतिथ्य़ खुद्द सुप्रिया सुळे यांनी केले. वाढदिवस स्मरणात रहावा म्हणून एकत्रित छायाचित्रही काढले. सतीश काकडेही यामुळे भारावून गेले. यामुळे १९६७ ला शरद पवार यांच्याशी सुरू झालेल्या संघर्षाचा डिनर डिप्लोमसीमुळे पूर्ण समारोप झाला. राजू शेट्टींच्या मध्यस्थीच्या निमित्ताने सतीश काकडेंनी गोविंदबाग गाठली आणि एकाच वेळी पवार-काकडेंच्या व पवार-शेट्टींच्या संघर्षाच्या इतिहासाची सांगता झाली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

Sharad Pawar, शरद पवार, Politics