Pankja-mahadeo jankar
Pankja-mahadeo jankar

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात... त्यांनी महादेव जानकरांना बरोबर घ्यावे!

महाराष्ट्रातील राजकारणात ताजेपणा आणणारा प्रयोग!

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाराजीनाट्य महाराष्ट्रभर गाजले. केंद्रीय मंत्रीमंडळातील विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याच्या मुद्यावरून मुंडे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून पंकजा या भाजपचा योग्य वेळी त्याग करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत, याच्या शक्यता राजकीय पंडितांनी व्यक्त केल्या. सध्या तरी पंकजांनी आपली तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला असला तरी भविष्यात काय करावे, याचा विचार त्यांच्या मनात सुरू असेलच. त्यासाठी नवीन पर्याय कोणता याच विचार केला तर एक चांगले समीकरण त्यांच्या राजकारणाला आकार देऊ शकते. या समीकरणावर त्यांनी विचार करायला हरकत काय आहे?

हे समीकरण आहे ते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाशी युती करणे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष असलेले महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी मानसपुत्र मानले होते. पंकजा यांचे पती अमित पालवे हे रासपचे असल्याचे महादेवराव आवर्जून सांगत असतात. पंकजा आणि जानकर यांची राखी पौर्णिमेची भेट ही मिडियातूही गाजते. बहिण-भावाचे हे  नाते राजकारणातही एकत्र आले तर? या समीकरणातून मोठी राजकीय शक्ती उभी राहू शकते. त्याला प्रतिसादही चांगला मिळू शकतो. भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्ताखाली माधव पॅटर्न (माळी, धनगर आणि वंजारी समाज) राबवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शड्डु ठोकला होता. तोच प्रयोग पुन्हा नाराज पंकजा यांनी करायला काय हरकत आहे?  

पंकजा यांच्याकडून वरचेवर आक्रमकतेचे आणि नाराजीचे प्रदर्शन केले तर त्यांचा भाजपमधील राजकीय प्रवास खडतर होऊ शकतो. धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असल्याने पंकजा यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद असतील. शिवसेनेत ठाकरे पिता-पुत्रांनाच जर मुख्यमंत्रीपद हवे असेल तर पंकजा मुंडे यांना शिवसेनेत जाऊन काय मिळणार?  काँग्रेसमध्ये जाणे सध्या त्यांच्या हिताचे ठरनार नाही. त्यातच त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे अनेक तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे लगेच पंकजा यांना तिथेही काही मिळणार नाही. त्यामुळे पंकजा यांच्याकडे पर्याय उरतो तो म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचा. महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांचे समीकरण जुळले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो.    

रासपची ताकद कुठे!

महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना २००३ मध्ये केली. मात्र, महादेव जानकर यांना खरी लोकप्रियता महाराष्ट्रात मिळाली. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात विरोधी पक्षांची मोठ बांधली. त्यामध्ये महादेव जानकर यांचा माध्यमातून धनगर समाजाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी केला.  जानकर यांनी 2014 ची लोकसभा बारामती मतदारसंघातून लढवली.  बारामती मददार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जानकर यांनी जवळ पास 5 लाखापर्यंत मतदान मिळवून राजकिय धक्का दिला. त्या पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दौंडमधून रासपचे उमेदवार राहुल सुभाष कुल हे 14 हजारांच्या वर आघाडी घेऊन निवडून आले. त्यांतर २०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर महादेव जानकर कॅबिनेट मंत्री झाले. २०१७ झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत १२ उमेदवार आणि पंचायत समितीवर १८ उमेदवार निवडून आले आहेत. गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुठ्ठे हे रासपचे आमदार आहेत.  

जानकर यांनी पक्षाची बांधणी ही पश्चिम महाराष्ट्रात केली असली तरीही मराठवाडा आणि विदर्भातही त्यांना माननारा वर्ग आहे. धनगर समाज ही जानकर यांची ताकद आहे. राज्यात धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या ही प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सोलापूर, धुळे, सांगली, अकोला या सहा जिल्ह्यात आहे. त्यानंतर परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा समावेश होतो. येथील तब्बल ४० ते ४५ विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची ताकद आहे. तर राज्यातल्या १५० विधानसभा मतदारसंघात या समाजाची संख्या दखलपात्र आहे. 

पंकजा मुंडे यांचा जनाधार!

महाराष्ट्रात भाजपमध्ये सर्वाधिक जनाधार असलेल्या नेत्या म्हणून पंकजा गोपीनाथ मुंडे यांची ओळख आहे. फर्डे वक्तृत्व असलेल्या मोजक्या नेत्यांत त्यांचा समावेश आहे. भाजप हा पक्ष माझ्या वडिलांनी उभा केला आहे. तो माझा पक्ष आहे, असे पंकजा आवर्जून अनेक सभांतून सांगतात. महाराष्ट्रातील 30 ते 35 विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचारसभांशिवाय भाजपचा उमेदवार निवडून येईल, याची खात्री नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. मुंडे यांना महाराष्ट्रामध्ये मानणारा एक मोठा वर्ग आहे. गोपीनाथ मुंडेंनी बांधलेली ओबीसी समाजाची मोट ही पंकजा यांची जमेची बाजू आहे. राज्यामध्ये बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, ठाणे, अकोला, मुंबई, यवतमाळ, नंदूरबार, गडचिरोली, पुणे, लातूर आणि वाशिम जिल्ह्यात वंजारी समाजाची संख्या मोठी आहे. या जिल्ह्यांतील तब्बल ४० ते ४५ मतदारसंघांवर समाजाचे चांगले प्रभुत्व आहे.    

वंजारी समाज आणि धनगर समाजाची एकत्रित ताकद

पंकजा आणि जानकर एकत्र आले तर अहमदनगर, बुलडाणा, बीड जालना, उस्मानाबाद, धुळे, सोलापूर, पुणे, नाशिक, या जिल्ह्यांमध्ये राजकीय पर्याय देऊ शकतात. या जिल्ह्यांमध्ये इतर समाजाची तोडीफार जरी ताकद मिळाली तरी सुद्धा विधानसभेला त्यांचे उमेदवार निवडून येवू शकतात. तर जळपास ३० ते ३५ मतदार संघात कोणत्याही पक्षाचा उमेदवार ते पाडू शकतात. २००९ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फटका शिवसेना आणि भाजपला बसला होता. मनसेचे १३ आमदार विजयी झाले होते. त्याच प्रमाणे महादेव जानकर आणि पंकाजा मुंडे एकत्र आल्यास राज्यातील राजकारणात चांगली ताकद निर्माण करू शकतात. 

भाजपला फटका बसू शकतो

गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भापजला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांनी वाड्या वस्त्यावर भाजपचा झेंडा फडकवला. त्यामुळे भाजपचा मतदार असला तरी मुंडे नावाबद्दल मतदारांच्या मनामध्ये मोठी सहानुभूती आहे. त्यातच वंजारी समाजाचे एकगठ्ठा मतदान हे भाजपला होते. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपला ही हक्काची मते मिळतात. तसेच गोपीनाथ मुंडे यांनी जोडलेला ओबीसी समाजही भाजपच्या मागे आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो.

पंकजा यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची राजकीय ताकद वाढवली तर निश्चितपणे त्यांच्या महत्वाकांक्षा वास्तवात उतरू शकतात. कारण लोकनेत्याची ताकद डावलणे हे तितकसे सोपे नसते. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. त्यांना एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कामांची पुण्याईही आहे. सध्या त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी बोलल्याप्रमाणे जर मेहनत केली तर निश्चितच त्या पुन्हा राजकारणात मजबूतीने उभ्या राहू शकतात. महाराष्ट्रात काॅंग्रेसचे 40 ते 45 आमदार निवडून येतात. काॅंग्रेसएवढे आमदार मुंडे-जानकर युती नक्की निवडून आणू शकेल. 

पण त्यासाठी हे दोन्ही नेते जमिनीवर येऊन विचार करतील का, हा प्रश्न आहे. जानकर हे स्वतःला पंतप्रधान व्हायचे आहे, असे जाहीरपणे बोलून दाखवतात. त्याची खिल्ली उडविली जाते. पंकजांच्या मनात महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री व्हायची मनिषा आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापले अहंकार बाजूला ठेवत नवीन समीकरण तयार करत राजकारणात ताजेपणा आणण्याचा विचार करायला काय हरकत आहे? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com