Shivesena - New face of Shivsena
Shivesena - New face of ShivsenaSarkarnama

बाळासाहेबांच्या भूमिकांशी 'पंगा' घेत नव्या शिवसेनेची अशी ही वाटचाल!

महाआघाडी सरकार स्थापनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाला एक वर्ष पूर्ण झाल. हे सरकार टिकलं हा मोठा चमत्कार असला तरी त्यासाठी ठाकरे आणि शिवसेना दोघेही बदलले, हे विशेष. शिवसेनेच्या या बदललेल्या रुपाविषयी!

शिवसेनेनं आपल्या पाच-साडेपाच दशकांच्या प्रवासात अनेक वेडीवाकडी वळणं घेतली! 
मात्र, ते वळण नेमकं कसं असेल, त्याची दिशा शिवसैनिकांना कळत असे ती मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर न चुकता होणाऱ्या "दसरा मेळाव्या'नच. बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात अनेक संकेत असत आणि त्यातून काही बोध घेऊन शिवसैनिक कामाला लागत! मात्र, गेल्या वर्षी शिवसेनेच्याच भाषेत सांगायचं झालं तर "विचारांचं सोनं' शिवसेनेनं लुटलं ते दसऱ्याला नव्हे तर ऐन दिवाळीत. गेल्या दिवाळीच्या चारच दिवस आधी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला सोबत घेतल्याविना कदापी सरकार बनवता येणार नाही, असा कौल मराठी माणसानं दिला होता आणि नेमकी तीच संधी साधत, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला एकदमच वेगळ्या वाटेवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. 


गेल्या दिवाळीत उद्धव ठाकरे यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा शिवसेनाचा बाज पुरता बदलून टाकणारा ठरला आणि नंतरच्या वर्षभरात केवळ नवी शिवसेनाच नव्हे तर नवे ठाकरे महाराष्ट्राला बघायला मिळाले. भाजपबरोबर "युती' करून विधानसभा निवडणुका लढवलेल्या असतानाही, उद्धव यांनी ती युती तोडली आणि थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच कॉंग्रेस यांच्याबरोबर सरकार स्थापन करून केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला. 


हा अपघात होता की चमत्कार, या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं आपल्या मगदुरानुसार द्यावं; पण एक मात्र खरं की निव्वळ राजकीय अपरिहार्यतेपोटी हे घडून आलं होतं किंवा घडवून आणलं होतं, असंही म्हणा पाहिजे तर. मात्र, हे जे काही घडलं ती मात्र उद्धव यांनी जाणीवपूर्वक केलेली खेळी होती, यात शंकाच नाही. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या "महाविकास आघाडी'च्या सरकारला उद्या, शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार आल्यापासून ते चार दिवस, चार आठवडे वा चार महिनेही टिकणार नाही, अशा वावड्या उठवून सत्तेची स्वप्नं बघणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ही मोठीच चपराक आहे. 


विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात राजकीय हालचालींना उधाण आलं. नेमस्त आणि मवाळ प्रकृती म्हणून शिवसैनिकांमध्येही हेटाळणी होत असलेले उद्धव अचानक आक्रमक झाले! सरकार युतीचंच आलं, तरी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच असेल, अशी ठाम भूमिका उद्धव यांनी घेतली. भाजप त्यास तयार नव्हता आणि उद्धव अडून बसताहेत, हे लक्षात येताच मग शरद पवार यांनी अत्यंत शांतपणे पडद्यामागून हालचाली सुरू केल्या. उद्धवही आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि त्याची परिणती अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्याच नव्हे तर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडण्यात झाली! 


हे सारं अघटित म्हणावं, असंच होतं. 
ठाकरे कुटुंबियांसाठी हा फार मोठा निर्णय होता. 
शिवसेनेच्या हाती राज्याचं मुख्यमंत्रीपद यापूर्वी एकदा म्हणजे 25 वर्षांपूर्वी आलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं तर "मंत्रालयावर भगवा' फडकल्यानंतर तेथे स्थापन झालेल्या शिवसेनेच्या शाखेचे प्रमुख या नात्यानं त्यांना स्वत:लाच मुख्यमंत्रीपदाची सूत्रं अगदी सहज हाती घेता आली असती. पण बाळासाहेबांनी त्यास नकार दिला आणि "रिमोट कंट्रोल' हातात घेऊन सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग स्वीकारला होता. 


या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आदित्य यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं आणि पुढे राज्यात नवं राजकीय नेपथ्य उभं राहत असताना, स्वत:च मुख्यमंत्रीपद स्वीकारणं, या दोन निर्णयांस प्रदीर्घ अशी पार्श्वभूमी आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्यला मैदानात उतरवून, बदलत्या शिवसेनेची चुणूक उद्धव यांनी दाखवून दिलीच होती. खरं तर शिवसैनिकांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीच हा एक मोठा निर्णय होता. पाच दशकांहून अधिक काळ या संघटनेची सूत्रं एकाच कुटुंबाच्या हाती असूनही त्या कुटुंबातील कोणीही कधीही कोणतीही निवडणूक लढवण्याचा साधा विचारही मनात आणला नव्हता. बाळासाहेबांनी मनात आणलं असतं, तर ते मुख्यमंत्री, महापौर यापैकी कोणत्याही पदावर कधीही विराजमान होऊ शकले असते. मात्र, त्यांनी ते करण्याचं सातत्यानं टाळलं. खरं तर अशा प्रकारच्या संसदीय लोकशाहीची खिल्ली उडवण्यातच त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं होतं. शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या पहिल्या-वाहिल्या जाहीर मेळाव्यातच 30 ऑक्टोबर 1966 रोजी "राजकारण हे गजकरण आहे!' अशी कोटी करून, त्यांनी आपले इरादे जाहीर केले होते. त्यानंतर पाच दशकांनी ठाकरे घराण्यातील एक युवक थेट निवडणूक लढवत होता. आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणं आणि पुढे त्यानंतर राज्याच्या राजकीय रंगमंचावर आलेल्या वादळानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्रीपदच स्वीकारणं, हे या पक्षाच्या आजवरच्या वाटचालीतील सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणावे लागतील. राज्यशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर आजवर टाळलेल्या "पोलिटिकल अकांउटीबिलीटी'ला सामोरं जाण्याचाच हा शिवसेनेसाठी एक धाडसी निर्णय होता. शिवसेनेचं रूपडं आरपार बदलून टाकण्याचं धाडस उद्धव यांनी या दोन निर्णयांतून महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. 


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी मोठ्या थाटामाटानं शिवाजी पार्क मैदानावर पार पडला, त्यास आता वर्षं पूर्ण होत असनाना, वर्षभरातील या सरकारची सर्वात महत्त्वाची कामगिरी कोणती, असा प्रश्न उभा राहणं स्वाभाविक आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे. ते म्हणजे तीन टोकाच्या परस्परविरोधी विचारांचं हे सरकार एक वर्ष टिकलं, यापेक्षा या सरकारची अधिक मोठी कामगिरी ती काय असू शकणार? भाजपचे टीव्हीवरचे बोलके पोपट आणि त्या पक्षाचे गल्लीबोळातील प्रवक्ते हे सरकार महिनाभरात कोसळेल, गणपतीत या सरकारचा "मोरया' होईल, असे मांडे केवळ मनातच नव्हे तर जाहीरपणे खात होते. मात्र, या सरकारनं बघता बघता 100 दिवसच काय एक वर्ष पूर्ण केलं. गणेशोत्सवच काय दसरा-दिवाळीही उलटून गेली, तरी हे सरकार उभंच आहे. 


मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी "हे सरकार पाडून दाखवाच!' असे जाहीर आव्हान अत्यंत आक्रमकपणे भाजपला दिले आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही नवी समीकरणं उभी राहतील काय, शिवसेनेला केंद्रातील सत्तेच्या जोरावर अडचणीत आणून पुन्हा आपल्याबरोबर येण्यास भाजप भाग पाडणार काय (अशीच खेळी भाजपने बिहारमध्ये यशस्वी करून दाखवत लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर गेलेल्या नितीश कुमार यांना परत आणून भाजपसमवेत सरकार स्थापन करायला भाग पाडलं होतं) अशा अनेक प्रश्नांवर प्रश्नांवर तूर्तास तरी पडदा पडला आहे. 


या वर्षभरात टाकरे सरकारनं कोणते ठोस निर्णय घेतले, यापेक्षाही मुख्यमंत्रीपद उद्धव कसं सांभाळतात, हाच कळीचा मुद्दा होता. आपण अनुनभवी आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं होतंच; 


उद्धव मुख्यमंत्री झाले तेव्हा हा गडी म्हणजे "कच्चं लिंबू' आहे, असं भलेभले समजत होते. आजवर उद्धव यांनी ज्या काही खेळ्या केल्या होत्या, त्या एकतर "मातोश्री'वरील खलबतखान्यातून वा शिवाजी पार्कवरील जाहीर सभांमधून. तेथे बॅट त्यांची, बॉल त्यांचा, स्टंप त्यांचे आणि मुख्य म्हणजे अम्पायरही तेच, अशी परिस्थिती होती. आता हे चित्र बदललं होतं. कधीही साधा नगरसेवक वा आमदार-खासदार न झालेला हा नेता आता थेट मुख्यमंत्री झाला होता. आजवर त्यानं विधिमंडळाचं कामकाजही क्वचितच बघितलं होतं आणि तेही गॅलरीतून! त्यामुळे उद्धव हे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होणार नाहीत, अशीच खूणगाठ अनेकांनी आपल्या मनाशी बाळगली होती. मात्र, त्यांनी अगदी अल्पावधीतच मुख्यमंत्रीपदावर कब्जा केला आणि गेले आठ महिने अवघा देश कोरोना विषाणूच्या फैलावाशी लढत असताना, आपणही त्या लढाईत मागे नाही, हे सातत्यानं दाखवून दिलं. या एका मोठ्या संकटाशी देश सामना देत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार टीव्हीच्या छोट्या पडद्याच्या माध्यमातून जनतेला "भिऊ नकोस; मी तुझ्या पाठीशी आहे!' छापाची भाषणं देत असताना, उद्धव यांनी मात्र जनतेशी संवाद साधण्याचं धोरण अवलंबिलं आणि त्यांची देहबोली, समजदारी आणि परिपक्वता यामुळे शिवसेनेचे पारंपरिक विरोधकही त्यांच्या प्रेमात केव्हा पडले, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही! 


केवळ ठाकरे कुटुंबांनीच थेट सत्ता स्वीकारून बदलाचं वारं महाराष्ट्रात आणलंय हे दाखवून देण्यापुरता उद्धव यांचा हा निर्णय मर्यादित नव्हता. तर शिवसेनाच बदलत चाललीय, हे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर महिनाभरात नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दाखवून दिलं. "शिवसेनेनं राजकारणाशी घातलेली धर्माची सांगड ही आमची मोठीच चूक होती आणि त्याचा आम्हाला मोठा फटका बसला,' हे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना, त्यांनी काढलेले उद्गारच याची साक्ष आहे. एका अर्थानं हा थेट बाळासाहेबांच्या भूमिकेशी घेतलेला "पंगा'च आहे. बाळासाहेबांच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं बहर आला होता, तो 1987 मध्ये विलेपार्ले मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी खांद्यावर भगवी शाल घेतल्यानंतरच. त्यांनंतरच "हिंदूहृदयसम्राट' असं बिरूद त्यांना कायमचं चिकटलं. उद्धव यांनी थेट विधानसभेत "धर्म आणि राजकारण' यांच्यासंबंधात दिलेला कबुली जवाबच बदलती शिवसेना आणि बदललेले उद्धव यांची प्रचीती आणून देत आहेत. त्यावर त्यांच्या गेल्या वर्षभरातील कार्यपद्धतीनं शिक्कामोर्तब केलं आहे. 


खरं तर शिवसेनेची "राडेबाज' अशी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न उद्धव यांनी या शतकाच्या प्रारंभीच त्यांच्या हातात "कार्यकारी प्रमुख' या नात्यानं पक्षाची सूत्रं आली, तेव्हापासूनच सुरू केला होता. उद्धव यांचं अवघं आयुष्य हे अत्यंत राडेबाज अशा संस्कृतीत गेलं असलं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या पिताश्रींच्या छायेखाली आयुष्याची पाच दशकं गेल्यानंतरही उद्धव यांचा बाजच नव्हे तर बाणाही निराळाच होता. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून सूत्रं हाती आल्यानंतर त्यांनी त्याची चुणूक "मी मराठी!' नव्हे तर "मी मुंबईकर!' अशी घोषणा देऊन दाखवून दिली होती. शिवसेना केवळ मराठी माणसांपुरती संकुचित ठेवल्यास या संघटनेच्या वाढीला मर्यादा येतील, या एकमात्र हेतूनं त्यांनी तो निर्णय घेतलेला असूही शकतो. पण आता राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून करतानाही ते त्याच धोरणानुसार वागताना दिसत आहे. 


शिवसेनेत उद्धव यांनी जे काही बदलाचं वारं गेल्या दोन दशकांत आणलं. त्याचा हा "कळसाध्याय' म्हणजे क्लायमॅक्सच आहे आणि दहा वर्षांपूर्वी शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी "लॉंच' केलेले आदित्य ठाकरे यांचीही त्यांना पुरेपूर साथ आहे. आदित्य राजकारणात येण्याआधी "व्हॅलेंटाइन डे'ला शिवसेनेचा विरोध असे आणि त्या मुहूर्तावर मोडतोड तसेच राडेबाजी करण्यात शिवसैनिक आघाडीवर असत. आदित्य यांनी सर्वप्रथम त्यास पूर्णविराम दिला! आदित्य यांना मैदानात उतरवण्याच्या निर्णयामागे राज ठाकरे यांनी तरुणांना सोबत घेत, शिवसेनेपुढे उभ्या केलेल्या आव्हानाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे तरुणांच्या भाषेत बोलायला आदित्य यांनी सुरुवात केली. मुंबईत "नाइट लाइफ' 24 तास सुरू राहायला हवं, ही त्यांची मागणी मुंबईकर तरुणाईला मग भावून गेली, यात नवल नव्हतं. त्याचवेळी केवळ मैदानी खेळ, व्यायामशाळा, गणेशोत्सव आदी "इव्हेंट्स'मध्ये गुंतून पडणाऱ्या सैनिकांना त्यांनी "सोशल मीडिया'ची दीक्षा दिली आणि शाखा-शाखांचे "वॉट्सअप' ग्रूप तयार केले. 


काळ बदलतोय, समाज बदलतोय आणि तरुणाईही बदलतेय, हे आदित्य यांच्या ध्यानात आलं आहे आणि त्यातूनच बदललेली शिवसेना आपण गेले वर्षभर पाहतोय. त्यामुळेच सुशांतसिंग राजपूत या गुणी अभिनेत्याच्या मृत्यूनंतर काही विरोधी पक्षनेते आणि त्यांना अंकित असलेली न्यूज चॅनेल्स यांनी आदित्य यांना "टार्गेट' करण्याचा अकटोविकट प्रयत्न केला. पण केवळ उद्धव आणि आदित्यच नव्हे तर अवघी शिवसेना शांत राहिली. हेच बाळासाहेबांच्या हयातीत घडतं तर संबंधित चॅनेल्सवर हल्लाच झाला असता! शिवसेना बदलतीय याची आणखी साक्ष ती कोणती? 


अर्थात, याचा सोयीस्कर अर्थ विरोधी पक्ष लावू पाहतच आहे आणि उद्धव यांनी कॉंग्रेसशी केलेली हातमिळवणी शिवसैनिकांना पसंत नसल्यानेच ते गप्प आहेत, असं सांगण्यात येत आहे. मात्र, नव्या ठाकऱ्यांना त्याची जराही फिकीर नसल्याचे दिसत आहे. 


आता या सरकारचं पहिलं वर्ष तर संपलं आणि मुख्य म्हणजे त्यातील आठ महिने हे कोरोनाच्या सावटाखाली गेले. आता लोकांना अपेक्षा आहे ती ठोस निर्णयांची आणि काही बदलांची! 2017 मध्ये झालेली मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपशी कडवी लढत देऊन जिंकताना शिवसेनेची घोषणा होती "करून दाखवलं!' या घोषणेचे जनक आदित्य ठाकरे हेच होते, असं सांगण्यात येतं. तीच अपेक्षा या सरकारकडूनही आता महाराष्ट्रातील जनतेची आहे. नवी शिवसेना आणि नवे ठाकरे पुढच्या निवडणुकीतही हीच म्हणजे "करून दाखवलं!' अशी घोषणा देऊ शकले, तरच शिवसेनेचं नवं रूपडं आणि नवा बाज जनतेनं स्वीकारला आहे, असं म्हणता येईल! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com