beed politics news
beed politics newsSarkarnama

एकमेकांचे राजकीय अस्तित्त्व संपवायला निघालेले बीडचे क्षीरसागर नांदतात एकाच बंगल्यात

राज्यात अनेक राजकीय घराणी आहेत. या घराणेशाहीचा राजकारणावर प्रभाव आहे. प्रत्येक घराण्यात भाऊबंदकीचा वाद टोकाचा दिसून येतो. घर फुटते. लक्ष्मणरेषा येते. मग एकाच कुटुंबाची नवीन घरे होतात. बीडच्या दिवंगत लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर व सोनाजीराव क्षीरसागर यांचा बीडमधील बंगला सर्वांपेक्षा वेगळा. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचा कट्टर विरोधक असलेला पुतण्या संदीप हे एकाच बंगल्यात राहत आहेत. जयदत्त यांच्यासह इतर तीन बंधू, त्यांची मुले, सुना, नातवंडे असे एकत्र राहत आहेत. या एकाच घरात एकमेकांच्या विरोधात डावपेचही आखले जातात...

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कोणी पुणे किंवा मुंबईतील मित्र, समर्थक त्यांना भेटायला बीडच्या घरी गेला तर त्याचा गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही. संदीप यांना भेटायला गेलो आणि तेथे त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर भेटले तर बिचाऱ्याचा गोंधळ उडेल. अरे याच काकाच्या विरोधात संदीप यांनी निवडणूक लढविली आणि ते येथे कसे काय, असा प्रश्न पडेल. असाच गोंधळ जयदत्त यांच्याही जिल्ह्याबाहेरील समर्थकांचा होऊ शकतो. काकांच्या घरात पुतण्या काय करतोय, असे त्याला वाटेल. पण ते तसेच आहे. गेली 25 वर्षे क्षीरसागर कुटुंब एकाच घरात राहत आहेत. राजकीयदृष्ट्या एकमेकांना संपविण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी एकत्र घर अजूनही पक्के आहे. 

कॉंग्रेसच्या नेत्या आणि बीडच्या दिवंगत खासदार क्षीरसागर काकू या राजकारणातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखल्या जात. या कुटुंबांची चौथी पिढी राजकारणात आहे. काकूंना चार मुलगे. जयदत्त, रवींद्र, भारतभूषण आणि विठ्ठल. हे चौघे त्यांच्या परिवारासह एकाच बंगल्यात नांदत आहेत. तीसहून अधिक व्यक्ती या बंगल्यात आहेत. 

केशरकाकूंचे कर्तृत्त्व!

बीड जिल्ह्यात तसे हजारो बंगले आहेत. पण, त्या बंगल्यांची ओळख वेगळीच. केवळ "बंगला' शब्द म्हटले की तो फक्त क्षीरसागरांचाच!, असे बीडमध्ये समजले जाते. 50 वर्षांपूर्वी महिलांसाठी फक्त चूल आणि मूल येवढेच समीकरण होते. कुठलेही आरक्षण नसताना अगदी अल्पसंख्यांक समाजातून आलेल्या केशरबाई क्षीरसागर यांनी त्यांचे गाव राजूरीचे सरपंचपद स्वर्तृत्वाने मिळविले. पंचायत समितीच्या सभापती, तीन वेळा खासदार आणि आमदार अशी राजकीय कारकिर्द त्यांनी गाजविली. जिल्ह्याच्या राजकारणावरही त्यांची हुकूमत होती.

पंचायत समितीच्या सभापतीपदानंतर बीडमधील सुभाष रोडवरील विजय टॉकीज जवळ राहणाऱ्या केशरबाई नंतरच्या काळात साठे चौकात राहत असत. मागच्या 20-25 वर्षांपूर्वी त्या नगर रोड भागातील पोलिस मैदानासमोर राहण्यास आल्या. केशरकाकू व सोनाजीराव क्षीरसागर यांच्या हयातीतच नगर रोडवर त्यांनी नवे निवासस्थान उभारलेले. आता बंगल्याचे वैशिष्ट्य दोन पक्षांचे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविलेले सख्खे भाऊ, काका-पुतणे येथे एकत्र नांदत आहेत.

घरातच अशी आहेत पदे

जयदत्त क्षीरसागर हे माजी मंत्री असून त्यांनी चार वेळा आमदारकी आणि वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रीपद सांभाळलेले आहे. अनेक शैक्षणिक, सहकारी संस्थांचे देखील ते प्रमुख आहेत. त्यांचे विरोधक संदीप क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांच्याही अधिपत्याखाली पंचायत समिती आहे. भारतभूषण क्षीरसागर अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. दीपा क्षीरसागर प्रतिथयश केएसके महाविद्यालयाच्या प्राचार्या असून त्यांनीही शहराचे नगराध्यक्षपद सांभाळलेले आहे. त्या देखील प्रतिथयश लेखिका असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून अखिल भारतीय नाट्यसंमेलन शाखेच्याही त्या अध्यक्षा आहेत.

त्यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर नगसेवक देखील असून तेही वैद्यकीय क्षेत्रातील मुत्रपिंड तज्ज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर देखील स्त्रीरोग व वंधत्व तत्ज्ञ आहेत. संदीप क्षीरसागर यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांनी देखील जिल्हा परिषदेचे सभापतीपद सांभाळलेले असून सध्या ते नवगण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी रेखा क्षीरसागर या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर, मुलगा हेमंत क्षीरसागर नगर पालिकेचे उपाध्यक्ष आणि स्वच्छता सभापती आहेत. जयदत्त क्षीरसागर यांची मुले मात्र व्यवसायात स्थिरावलेली आहेत.

पहिली राजकीय ठिणगी

सर्वात ज्येष्ठ जयदत्त यांनी आमदार म्हणू राज्यात लक्ष घालायचे. दुसरे बंधू रवींद्र यांनी साखर कारखाने, जिल्हा परिषद या निमित्त जिल्ह्यातील राजकारण सांभाळायचे. तिसरे भारतभूषण यांनी बीडचा कारभार चालवायचा, अशी अलिखित कामाची विभागणी होती. त्यामुळे या तिघा भावांत राजकीय असा वाद नव्हता. मात्र त्यांच्या दुसऱ्या पिढीत तो सुरू झाला. रवींद्र यांचे चिरंजीव संदीप हे 2007 मध्ये पंचायत समितीच्या राजकारणात उतरले. पंचायत समितीचे सभापती आणि नंतर जिल्हा परिषदेतही सभापती म्हणून त्यांना संधी मिळाली. जिल्ह्यात त्यांचे प्रस्थ वाढले. त्याच वेळेच भारतभूषण यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद मिळाले. त्यांचा मुलगाही त्याच वेळी नगरपालिकेत ऊठबस वाढवू लागला. भारतभूषण जिल्ह्यात लक्ष घालू लागले. तिथेच पहिली ठिणगी उडाली.

तुमच्याकडे शहराची जबाबदारी आहे तर शहरात का लक्ष घालता, असा सवाल करत संदीप यांनीही मग बीड शहरात आपले प्रस्थ वाढविण्यास सुरवात केली. नंतर 2017 मध्ये झालेल्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत तर कहर झाला. डॉ. भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांच्या  विरोधात त्यांचे थोरले बंधू व विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर हे काकू-नाना आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे टाकले.

दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने तो राज्यात चर्चेचा विषय झाला. या निवडणुकीत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली. पण, उपनगराध्यक्षपद आणि सभापतींच्या निवडणुकीत मात्र संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीने बाजी मारली. यात संदीप क्षीरसागर यांचे धाकटे बंधू हेमंत क्षीरसागर विजयी झाले. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांची निवड झाली.

विधानसभा निवडणुकीत काका-पुतणे वाद

हा संघर्ष येथेच थांबला नाही. संदीप यांनी काका जयदत्त यांनाच आव्हान देण्याच निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची त्यांना साथ होतीच. राज्यातील राजकारणही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बदलले. राष्ट्रवादीचे अनेक नेते हे भाजप आणि सेनेत गेले. तसाच निर्णय घेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेची वाट धरली. जयदत्त क्षीरसागर यांना तात्पुरते मंत्रीपदही भेटले.

पण, विधानसभा निवडणुकीत पुन्हा थेट जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर असा काका-पुतणे सामना बीड मतदारसंघात रंगला. यात पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली. ही निवडणूक फार कटुता निर्माण करून गेली. तरीही एकाच घरात हे सर्वजण राहिले. या बंगल्याचं वैशिष्ट्य म्हणजे घरात एक माजी मंत्री, विद्यमान आमदार, एक नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष, एक जिल्हा परिषद सदस्य, एक कारखान्याचे अध्यक्ष, एक नगरसेवक आणि एक माजी नगराध्यक्ष अशी बक्कळ पदं या घरात आहेत.

डावपेचही एकाच घरात

साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्यानंतरर या निवडणुकीसह नंतरच्या सर्व निवडणुकाच्या वेळी हे कुटुंब एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.  पुढची जिल्हा परिषद, त्यानंतर ग्रामपंचायती व नंतर लोकसभा आणि विधानसभा अशा पाच निवडणुका झाल्या. या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी एकमेकांच्या विरोधात प्रचाराला निघताना दोन्ही गटांच्या गाड्याही एकाच पार्किंगधून निघाल्या. आताही पार्किंग तशी कॉमनच आहे. त्यांची कार्यालये देखील इथेच असल्याने वेगवेगळी राजकीय नियोजने आणि आरोप - प्रत्यारोपांची पत्रके तसेच एकमेकांविरुद्धची निवदेने देखील येथूनच निघतात.

कोरोनाच्या काळातही या बंगल्यात अनेक वाद उमटले. जयदत्त हे मुंबईहून बीडमध्ये आल्यानंतर त्यांना फिरू देऊ नका, क्वारंटाईन करा, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणारे पत्रक आमदार संदीप यांनी काढले होते. क्वारंटाईन झाले तरी जयदत्त याच बंगल्यात राहणार होते. मात्र राजकीय वादात संदीप ते पण विसरले. जयदत्त समर्थकांनी मग संदीप यांनाही क्वारंटाईन करण्याची मागणी केली होती.

संवाद तुटला; जिव्हाळा कायम

हा बंगला पाच-सहा गुंठ्यात असून 25 खोल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाचे `कुक` वेगळे आहे. किचन आणि डायनिंग मात्र एकच आहे. या घरात हे एकमेकांच्या विरोधातील नेते एकत्र राहत असले तरी त्यांचा संवाद होतो का, असा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जातो. पहिल्याप्रमाणे खुला संवाद राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. सणसमारंभ आधी एकत्रित साजरे केले जात होते. आता तशी परिस्थिती नाही. पण कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे. संदीप यांचा मुलगा जयदत्त यांच्या खांद्यावर दिसला तर आश्चर्य नको.

राज्यातील कोणत्याही राजकीय कुटुंबात वाद होतातच. काका-पुतण्या हा वाद तर अनेक कुटुंबात आहे. तरीही एकाच घरात नांदणारे राजकीय विरोधक मात्र बीडच्या `बंगल्या`तच पाहायला मिळतात. राजकीय मतभेद टोकाचे बनल्यानंतर सगळे एकाच बंगल्यात कसे राहातात याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com