mumbai police encounter specialist list
mumbai police encounter specialist listSarkarnama

वादात सापडलेले मुंबईचे एन्काउंटर स्पेशालिस्ट!

आजवर मुंबई पोलिसांनी केलेले तपास गाजले आहेत. मुंबई पोलिस ९० च्या दशकात गाजले ते एन्काउंटर्समुळे.

मुंबई पोलिसांचा जगभरात लौकिक आहे. आजवर मुंबई पोलिसांनी केलेले तपास गाजले आहेत. मुंबई पोलिस ९० च्या दशकात गाजले ते एन्काउंटर्समुळे.

त्याच काळातले अनेक अधिकारी अशाच एन्काउंटर्समुळे अर्थाने गाजले. त्यातले काही वादग्रस्तही ठरले अशा अधिकाऱ्यांचा हा आढावा

असाच एक एन्काउंटर स्पेशालिस्ट सध्या अंबानी बाँब प्रकरणातल्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याला अटकही झाली आहे. सचिन वाझे हे त्याचं नांव.

रविंद्रनाथ आंग्रे

महाराष्ट्र पोलिस दलातले हे माजी अधिकारी. त्यांनी ५४ गुन्हेगारांना एन्काउंटरमध्ये संपवलं. १९८३च्या बॅचचे हे अधिकारी. हीच तिच बॅच जी दिवंगत पोलिस महासंचालक अरविंद इनामदार नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून काम पहात असताना तयार झालेली.

बीए चे शिक्षण संपवून आंग्रे पोलिस खात्यात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. (स्व.) विजय साळस्कर, प्रदीप शर्मा, प्रफुल भोसले, विनायक सावदे हे त्यांचे बॅचमेट्स. आंग्रेंनी मुंबईत ३३ गुन्हेगारांना ठाण्यात २१ गुन्हेगारांना कंठस्नान घातले.

अमर नाईकचा साथिदार असलेल्या सुरेश मंचेकरचा एन्काउंटरही आंग्रेंनीच केला. महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात शस्त्रांचा सर्वात मोठा साठा पकडण्याचं श्रेय आंग्रेंचंच. १९९८ मध्ये झालेल्या या कारवाईत आग्रेंनी ११ एके ५६ रायफल्स, २००० गोळ्या आणि २०० हँडग्रेनेड्स जप्त केले होते. 

२००८ मध्ये ठाण्याच्या एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली. त्यांना निलंबित करण्यात आलं आणि अटकही झाली. पुढे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांना पुन्हा खात्यात सामावून घेण्यात आलं. त्यांची नेमणूक गडचिरोलीला झाली होती. मात्र, त्यांनी रुजू व्हायला नकार दिला. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
 

प्रदीप शर्मा

हे देखिल १९८३ च्या बॅचचे अधिकारी ३१२ गुन्हेगारांच्या एन्काउंटरमध्ये प्रदीप शर्मा सहभागी होते. शर्मा यांचे कुटुंब मुळचे आग्र्याचे. नंतर ते धुळ्यात स्थायिक झाले. त्यांचे वडील धुळ्यात एका महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. प्रदीप शर्मांचे शिक्षण धुळ्यातच झालं. १९८३ मध्ये ते पोलिस दलात दाखल झाले.

माहिम पोलिस ठाणे हे त्यांचे पहिले पोस्टिंग. मुंबईत विविध ठिकाणी नोकरी केल्यानंतर त्यांना वरिष्ठ पोलिस निरिक्षक म्हणून बढती मिळाली. आपल्या २५ वर्षांच्या सेवेत त्यांनी काही अतिरेक्यांसह ३१२ गुन्हेगारांना चकमकीत ठार केलं. 

२००८ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा व गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क असल्याचा आरोप ठेऊन बडतर्फ करण्यात आलं. अंधेरी येथे लखन भैय्या या गुन्हेगाराचा एन्काउंटर झाला होता. त्या प्रकरणात शर्मा यांना अटक झाली. त्यांच्या बरोबर असलेले १२ अधिकारी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मात्र, शर्मा या प्रकरणातून सुटले.

२०१७ मध्ये त्यांना खात्यात पुन्हा सामावून घेण्यात आलं. त्यावेळी त्यांनी दावूद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करण्याची कामगिरी केली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी पोलिस खात्याचा राजीनामा दिला व शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपार येथून निवडणूक लढवली. मात्र, त्यात ते पराभूत झाले.

दया नायक

एका हाॅटेलमधील पोऱ्या ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असा या अधिकाऱ्याचा प्रवास. दया नायक यांनी आपल्या कारकिर्दीत ८३ गँगस्टर्सना संपवलं आहे. २००३ मध्ये पत्रकार केतन तिरोडकर यांनी दया नाय यांच्यावर मुंबई अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला. दया नायक यांनी गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांचं संपत्ती गोळा केल्याचाही त्यांचा आरोप होता. त्यानंतर नायक यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत चौकशी करण्यात आली.

मात्र, त्या चौकशीतून ते सुटले. २००६ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यानंतर त्यांना अटकही झाली. त्यांना खात्यातून निलंबित करण्यात आलं. २०१२ मध्ये त्यांना पुन्हा खात्यात घेण्यात आलं. त्यांना नागपूरमध्ये ड्युटी देण्यात आली. पण कुटुंबाच्या सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांनी हे पोस्टिंग नाकारल्यानं पुन्हा त्यांना निलंबित करण्यात आलं. २०१५ मध्ये बदलीची आॅर्डर रद्द करण्यात आली आणि जानेवारी २०१६ मध्ये नायक पुन्हा मुंबई पोलिस दलात रुजू झाले. 

नायक यांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच कर्नाटकातील येन्नेहोळ येथे आपली आई राधा नायक यांच्या नांवे एक शाळा सुरु केली. त्यासाठी त्यांनी बाॅलीवूडमधून देणग्या घेतल्या. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला चित्रकार एम. एफ. हुसेन, अभिनेते सुनील शेट्टी, अफताब शिवदासानी उपस्थित होते. नंतर ही शाळा कर्नाटक सरकारच्या ताब्यात देण्यात आली.

विजय साळसकर

हा डॅशिंग अधिकारी १९८३ मध्ये पोलिस दलात दाखल झाला. हा देखिल अरविंद इनामदारांचा विद्यार्थी. त्यांनी आपल्या २४ वर्षांच्या सेवेत सुमारे ६१ गुन्हेगारांना ठार केले. त्यातील बहुसंख्य गँगस्टर हे अरुण गवळी टोळीचे होते. साळसकर यांनी केलेली अनेक एन्काउंटर खोटी असल्याच्या तक्रारी झाल्या. पण साळसकरांवरचे हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. मुंबईत् २००७ मध्ये इम्रान शेख हा १८ वर्षांचा तरुण साळसकरांच्या हातून ठार झाला. त्यावेळी काही काळ त्यांच्याबाबत वादळ उठलं होतं.

मुंबईतल्या कुप्रसिद्ध माकडवाला बंधूंचं एन्काऊंटरही साळसकर यांच्याच हातून झालं. एकदा साळसकर अरुण गवळीच्याही मागावर गेले होते. पण गवळी पळून गेल्यानं वाचला. पण सदामामा पावले आणि विजय तांडेल हे गुंड मात्र साळसकराच्या हातून वाचले नाहीत. गवळीने साळसकर यांची धास्ती घेतली होती.

२००५ च्या विधानसभा निवडणुकीला गवळी उभा राहिला होता. त्यावेळी साळसकर आपल्याला एन्काउंटरमध्ये संपवतील, अशी तक्रार त्यानं सरकारकडं केली होती. गवळी आमदार असला तरी माझ्या दृष्टीनं तो एक गुन्हेगार आहे, असं वक्तव्य त्यावेळी साळसकर यांनी केलं होतं.  गवळी साळसकरांना एवढा घाबरायचा की दगडी चाळीत असताना तो सतत महिलांच्या गराड्यात रहायचा.

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत अतिरेकी हल्ला झाला. त्यावेळी दुर्दैवाने कसाब व त्याचा साथीदार ईस्माईलनं केलेल्या गोळीबारात साळसकर हे अशोक कामठे व हेमंत करकरे या दोन अधिकाऱ्यांच्या बरोबर शहिद झाले. साळसकर यांना मरणोत्तर अशोक चक्र देण्यात आलं. 

प्रफुल्ल भोसले

या अधिकाऱ्यानं आपल्या कारकिर्दीत ७७ गुन्हेगारांना यमसदनाला पाठवलं. विक्रोळी पोलिस स्टेशन हे त्यांचा पहिलं पोस्टिंग या पहिल्या पोस्टिंगमध्येच प्रफुल भोसले यांनी चिंट्या उर्फ चिंतामणी शिवशंकर या गँगस्टरला ठार केलं.

अत्यंत शांत व सभ्य असलेले प्रफुल भोसले हे एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत, हे सांगावं लागतं. ते देखिल त्याच १९८३ च्या बॅचचे अरविंद इनामदारांचे विद्यार्थी. घाटकोपर बाँबस्फोट प्रकरणातला आरोपी ख्वाजा युनूस याच्या मृत्यूप्रकरणात प्रफुल्ल भोसले यांना अटक झाली होती. मात्र, २०१० मध्ये त्यांना क्लिन चीट मिळाली. त्यानंतर पुन्हा त्यांना खात्यात रुजू करुन घेण्यात आलं. भोसले सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com