Know more about Politician Jayant Patil political cunning | Sarkarnama

जयंत पाटलांनी धूर्तपणे केलेले "करेक्ट कार्यक्रम"

जयंत पाटलांनी धूर्तपणे केलेले "करेक्ट कार्यक्रम"

शेखर जोशी
मंगळवार, 2 मार्च 2021

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे धोरणी, धूर्त आणि चलाख राजकारणी म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राजकीय नेत्यात थोड्याफार प्रमाणात हे गुण असतातच. पण पाटील यांच्याकडे वेगळेच कौशल्य आहे. या कौशल्याचा परिचय पुन्हा सांगलीकरांना आला. बहुमत असलेली भाजपची सत्ता त्यांनी घालवली आणि राष्ट्रवादीचा महापौर केला. जयंतरावांनी आतापर्यंत असे कोणाचे असे करेक्ट कार्यक्रम केले, याची ही कहाणी. 

जयंत पाटील हे तुम्हाला अजित पवारांसारखे चिडून बोलताना सापडणार नाहीत किंवा आर. आर. पाटील यांच्यासारखी फार सलगीपण दाखवणार नाहीत. एक सुरक्षित अंतर ठेवून ते संवाद साधतात. समोरच्याला खोचकपणे बोलण्यात त्यांचा कोणी हात धरणार नाही. त्यांचा चेहरा बहुतांश वेळा गंभीर असतो आणि ते राजकारणही तितक्याच गंभीरपणे करतात. राष्ट्रवादी काॅंग्रेस जेव्हा 2014-19 या कालावधीत विरोधी पक्षात होता तेव्हा जयंतरावांच्या खोचक आणि नर्मविनोदी शैलीची जाणीव महाराष्ट्राला झाली. त्यांचे राजकारणही असे कमी वेगाचे असले तरी लांबच्या पल्ल्याचे असते, हे अनेकदा दिसून आले आहे.   

जयंत पाटील यांनी भाजपची सत्ता काढून घेवून चंद्रकांतदादा पाटील यांचा जो सांगली महापालिकेतील `कार्यक्रम` केला तो काही पहिलाच नाही. जयंतरावांनी यापूर्वी आपल्या अनेक राजकीय स्पर्धकांचे आणि आपल्या विरोधात जाणाऱ्या स्वकीयांचेही `कार्यक्रम` केले आहेत. एखाद्याचा `कार्यक्रम` करणे म्हणजे त्याला राजकीय धडा शिकविणे, असा घ्यायचा. जयंतरावांनी या कार्यक्रमाला एक विशेषण जोडले. ते म्हणजे `करेक्ट कार्यक्रम`.

अभियंत्या नेत्यांची बांधणी आणि मांडणी

मुळात जयंतराव अभियंते आहेत. त्यांना चित्रपट पाहणे आणि वाचन करणे याचेही छंद आहेत. अर्थात अभियंते असले तरी कधी कधी राजकीय गणिते चुकतातही पण ती चुकली तरी ते पुढे त्याचा वचपा काढण्यासाठी खूप मेहनात घेतात. राजकारण ही पॅशन म्हणून जगणारा हा नेता 24 तास शह-प्रतिशहांच्या खेळ्यातच मग्न असतो. 
"एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करणे' हा मराठीतील नवा वाक्प्रचार त्यांनीच रुढ केला. इस्लामपूरच्या राजकारणातून "करेक्ट कार्यक्रम' हा शब्द जयंतराव विरोधकांसाठी वापरत असत. हळू हळू माध्यमांनी पराभवासाठी हा शब्द वापरण्यास सुरूवात केली. जयंतरावांमुळे आजकाल हा शब्द राज्यभरात वापरला जावू लागला आहे.

दोन पिढ्यांचा संघर्ष

जयंत पाटील यांचा सांगलीच्या राजकारणातील सर्वांत मोठा संघर्ष माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याशीच राहिला आहे. अर्थात त्यांच्या राजकीय वादाला मोठा इतिहास आहे. दिवंगत नेते वसंतदादा आणि जयंतराव यांचे वडिल राजारामबापू पाटील यांच्यातील संघर्ष हा 1980 च्या दशकात राज्यभरात गाजला होता. अर्थात वसंतदादांनीही बापूंच्या निधनानंतर हे वैर बाजूला ठेवून जयंत पाटील यांना राजकीय मदत केली होती. जयंतरावांचा कॉंग्रेसमधील प्रवेश वसंतदादांमुळेच सुकर झाला होता. मात्र वसंतदादा यांच्या नंतरच्या राजकारणात जयंतरावांनी "दादा' घराण्याचा कार्यक्रम करण्यासाठी विरोधक संभाजी पवारांना सतत बळ दिले. पवारांशी असलेला त्यांचा स्नेह जाहीरपणे डिजिटलमधूनही झळकायचा. संभाजी पवारांच्या माध्यमातूनच वसंतदादांच्या वारसांना शह देण्याची खेळी जिल्ह्यातील दादा विरोधकांनी खेळली होती. हा संघर्ष आजतागाय सुप्त तर कधी उघडपणे सुरूच आहे.

मदन पाटलांना मोठा शह

जयंतरावांनी दिवंगत नेते व माजी मंत्री मदन पाटील यांची महापालिकेतील पोलादी सत्ताही सर्व विरोधकांना एकत्र करून महाआघाडीच्या माध्यमातून खालसा केली होती. यावेळी त्यांनी संभाजी पवार, दिनकर पाटील सध्याचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यासह सर्व गटतट एकत्र केले आणि मदन पाटील यांचे उजवे हात समजले जाणारे माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह सध्याचे कारभारी व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांना फोडून राष्ट्रवादीत घेतले होते. महाआघाडीच्या प्रयोगाने पहिल्यांदा सांगलीत मोठे सत्तांतर झाले होते. हा जयंत पाटील यांनी मदन पाटील यांचा केलेला "करेक्ट कार्यक्रम' म्हणून राज्यभरात चर्चिला गेला होता. कारण तोपर्यंत विरोधकांना नगरपालिका किंवा महापालिकेत मदन पाटील यांना शह देणे कधीच जमले नव्हते. अर्थात महाआघाडीची पाच वर्षातच्या काळात बिघाडी देखील झाली होती. 
पण पुढे टप्यात आल्यानंतर मदन पाटील यांना विधानसभेलाही पराभूत करण्यामागे जयंत पाटील यांचाच हाच होता. 2014 च्या मोदी लाटेत मदन पाटील हरले पण त्यांना हरवणारे उमेदवार म्हणजे सध्याचे आमदार सुधीर गाडगीळ आहेत. ते त्यावेळी नवखे होते. साधी पालिकेचीही निवडणूक कधी न लढलेल्या गाडगीळ यांचा चेहरा संघाचे कार्यकर्ते आणि एक उद्योजक एवढाच होता. पण त्यांच्याकडून मदन पाटील यांचा पराभवाची स्क्रिप्ट जयंतरावांची होती, अशी चर्चा त्याकाळात झाली होती. या पराभवानंतर मदन पाटील खचले ते पुन्हा राजकारणात कधी उठलेच नाहीत. मदन पाटील यांच्या शेवटच्या काळात जयंतरावांनी पुन्हा दोस्ती केली. हे खरे असले तरी या दोस्तीतून त्यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन होऊ शकले नाही.

संभाजी पवारांशी सामना

मदन पाटील यांना शह देण्यासाठी जयंत पाटील यांनी संभाजी पवारांना अंतर्गंत रसद पुरवली, अशी चर्चा कायम होत राहिली. पण याच संभाजी पवारांशी त्यांचे सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकीवरून फाटले. संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की आणि शरद पाटील ही सांगलीतील कॉंग्रेस विरोधी त्रिमुर्ती. या त्रिमुर्तीने मोठ्या कष्टातून सर्वोदय कारखाना उभा केला. पण या कारखान्याच्या संघर्षांतून पुढे जयंत पाटील यांनी त्यांचे अगदी निकटवर्तीय असेलेल्या संभाजी पवारांचाही "कार्यक्रम' झाला. संभाजी पवारदेखील कसलेले मल्ल होते त्यांनीही जयंत पाटील यांची महाआघाडी मोडीत काढत पुढील महापालिका निवडणुकीत भाजपचे स्वतंत्र पॅनेल लावले स्वत:ची सत्ता आली नसली तरी त्यांनी जयंतरावांना पराभूत करून मदन पाटील यांच्या हाती पुन्हा सत्ता मिळवून देत त्यांनी केलेल्या कार्यक्रमाची पुन्हा परतफेड केली. पण यात पवारांकडून सर्वोदय कारखाना गेलाच! सर्वोदयसाठीचा संघर्ष आता पवारांचे सुपूत्र गौतम आणि पृथ्वीराज पवार यांच्याशी सुरुच आहे.

प्रत्येक खेळीत त्यांच्याच नावाची चर्चा

महाआघाडीतील आणखी एक नेते म्हणजे माजी आमदार दिनकर पाटील त्यांनाही जयंत पाटील यांनी बेदखल केल्याने त्यांनी त्यांची संगत सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. पवार व पाटील यांच्या जाण्याचा जयंतरावांना मोठा फटका बसला. पण अशा फटक्याची पर्वा न करता पुढे सावज टप्यात येण्याची वाट पहात पुन्हा ते आपले कार्यक्रम चालूच ठेवतात. हा आजवरचा येथील राजकीय अनुभव आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत विद्यमान खासदार संजय पाटील यांना भाजपमध्ये घेण्यावरून संभाजी पवारांनी मोठे बंड केले त्यामुळे विधानसभेला त्यांचे तिकीट हुकलेच. या कार्यक्रमामागेही जयंत पाटीलच होते अशी चर्चा त्यावेळी झालीच!

`वाळव्याचा वाघ विरुद्ध शिराळ्याचा नाग`

वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यातील संघर्षही मोठा आहे. शिराळ्याचे शिवाजीराव नाईक आणि जयंत पाटील यांच्यातून विस्तवही जात नव्हता एवढा टोकाचा संघर्ष. शिवाजीराव नाईकांचाही जयंतरावांनी दोनदा कार्यक्रम केलाच. पण शिवाजीराव नाईकांनी जयंत पाटील यांना तोडीस तोड राजकारण करून आपले अस्तित्व कायम ठेवले होते. कधी अपक्ष बंडखोर म्हणून तर 2015 मध्ये थेट भाजपमध्ये जावून त्यांनी शिराळ्याची आमदारकी मिळवली. अर्थात भाजपने त्यांचे योग्य पुनर्वसन केले नाही. त्यामुळे ते गेल्यावेळी पराभूत झाले. पण या दोघांतील संघर्षही `वाळव्याचा वाघ विरुद्ध शिराळ्याचा नाग` अशा वर्णनाने लोकांनी अनुभवला आहे. आज शिवाजीराव नाईक मात्र राजकारणातून बाजूला फेकले गेले आहेत.

खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर हे देखील राष्ट्रवादीतच होते. पण जयंतराव आणि त्यांचे कधीच जमले नाही. बाबर हे आर. आर. आबा गटाचे म्हणून ओळखले जायचे. त्यांनी देखील आबा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी सोडून शिवसेना गाठली. खरे तर शिवसेनेचे ते येथील एकमेव आमदार आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटले होते. पण त्यांची संधी कोणामुळे हुकली याची त्यावेळी खूप चर्चा झाली. 
जयंतरावांनी आपल्या इस्लामपूर मतदारसंघात विरोधक कधीच सक्षमपणे उभे होऊ दिले नाहीत. मुंडे-महाजनांना भाजपमध्ये वरीष्ठ असलेल्या अण्णासाहेब डांगे देखील जयंतरावांचे विरोधकच पण भाजपमधून संन्यास घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत आश्रय घेतला आणि जयंतरावांबरोबरचा संघर्ष कायमचा संपवून टाकला.

जयंतरावांनाही फटका बसला होता...

या साऱ्या राजकीय घडामोडींना अर्थात अपवाद एकच म्हणजे राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपने नगराध्यक्षाची थेट निवडणूक केली. यामध्ये इस्लामपुरात नवा इतिहास घडला आणि पहिल्यांदा जयंत पाटील यांचा उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाला. सध्याचे येथील नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी हा इतिहास घडविला. अर्थात यासाठी तत्कालिन राज्याची ताकद त्यांच्यामागे उभी राहिली आणि इस्लामपूरमधील अखंड तीस वर्ष अनिभिषक्त असलेली जयंतरावांच्या कार्यकर्त्यांची सत्ता उलथून टाकली गेली. पण आता जयंत पाटील पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी त्यांच्या विरोधातील आघाडीत फूट पाडून येथील विरोधकांचा "कार्यक्रमही' हाती घेतला आहेच.

शेट्टींनी मैत्री केली पण....

जयंत पाटील यांच्यात आणि राजू शेट्टी यांच्या विस्तव जात नव्हता राष्ट्रवादीच्या निविदिता माने यांना राजू शेट्टी यांनी पराभूत करून राष्ट्रवादीला घायाळ केले होते. पण राजू शेट्टीनी भाजपची संगत सोडली आणि ते आघाडीकडे आले. अगदी जयंतराव आणि शेट्टी एवढे मित्र झाले की मतदारसंघात डबलशीट सायकलनेही फिरले. पण लोकांनी यांची मैत्री स्वीकारली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांना निविदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला.

सदाभाऊंनाही विरोध भोवला...

सदाभाऊ खोत देखील जयंतरावांचे कट्टर विरोधक. भाजपने त्यांना मंत्री करून जयंतरावांना शह दिला. पण जयंत पाटील यांनी त्यांना कधीच स्वस्थ बसू दिले नाही. खोत आणि निशिकांत पाटील यांची मैत्री तुटली. जयंतराव यांच्याविरोधात येथील विरोधकांची जी मोट बांधली गेली ती पुन्हा विस्कटली आहे. यामागे जयंतरावांचा "कार्यक्रम' आहे. सदाभाऊ मंत्री असताना त्यांच्या विरोधात काही "नाजूक' कार्यक्रमही झाले. कडकनाथ प्रकरणही सदाभाऊंना चांगले भोवले. येथे मात्र राजू शेट्टींनी त्यांचा कार्यक्रम करण्यासाठी मोठा हातभार लावला होता. पण एकंदरीतच जे जे जयंतरावांच्या विरोधात गेले त्यांचा संधी मिळेल तेव्हा जयंतरावांनी "कार्यक्रम' केला आहे. ती त्यांची राजकीय शैली आहे.

इस्लामपूरातील आणखी मोठे प्रस्थ म्हणजे दिवंगत नेते नानासाहेब महाडिक यांची जयंतरावांशी दुष्मनी खूप चर्चेत राहिली. पण त्यांनाही त्यांनी जिल्हा परिषद मतदारसंघाबाहेर येवू दिले नाही. आज त्यांची मुले राहुल आणि सम्राटही भाजपमध्ये गेलेत पण आता थेट जयंतरावाविरोधातील संघर्ष टाळत त्यांनी शिराळा मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहे.

प्रबळ विरोधक उरला नाही....

सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम, आर आर पाटील, मदन पाटील, प्रकाशबापू पाटील असे अनेक दिग्गज राजकारणी त्यांचे समकालीन राहिले. आज हे सर्व हयात नाहीत. त्यामुळे जयंतरावांना प्रबळ असा विरोधक आज येथे उरलेलाच नाही. जयंतराव मध्यंतरी थोडे खचले ती इस्लामपूरातील पराभवामुळे आणि हातात पाच वर्षे सत्ता नसल्याने ते थोडे बॅकफुटवर गेले. पण 2019 मध्ये नव्याने आलेल्या सत्तेनंतर भाजपशी त्यांची सलगी असली तरी त्यांचाही त्यांनी कार्यक्रम करत सर्वच विरोधकांना पुन्हा आव्हान दिले आहे. पूर्वी ते भाजपला सोबत घेत कॉंग्रेसचा कार्यक्रम करायचे. आता त्यांनी महापालिकेत कॉंग्रेसला सोबत घेत भाजपचा कार्यक्रम केला आहे. जिल्हा परिषदेसह अनेक संस्थांतील कॉंग्रेसची सत्ता जयंतरावांनी संपुष्टात आणून एका काळ जिल्हा राष्ट्रवादीमय केला होता. पण पुढे मोदी लाटेत विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्रअण्णा देशमुख, संजय पाटील, अजितराव घोरपडे असे मोठे राष्ट्रवादीचे शिलेदार त्यांना सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यातील संजय पाटील आता पुन्हा त्यांच्याशी जमवून घेताना दिसत आहेत.

भाजपपुढे संकट

राज्यातील सत्तेच्या जोरावर जयंत पाटील यांचे अनेक कार्यक्रमांची मालिका पुढे सुरू राहिल असे सध्याचे चित्र आहे. अर्थात विरोधक गाफिल राहिले नाहीत आणि भाजपने ज्यांना आयात केले आहे त्यांना आधार दिला नाही तर जयंतराव भाजपची अवस्था येथे `ढुंढते रह जाओ गे` अशी करू शकतात. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी भाजपमध्ये भरती केली पण आता ओहोटी लागली आहे. ती थांबविण्यासाठी काहीच केले नाही तर जिल्हा परिषदेतही लवकरच "कार्यक्रम' होऊ शकतो आणि पुढे येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजप अनेक ठिकाणाहून खालसा होऊ शकतो. अर्थात या सर्व कार्यक्रमासाठी कॉंग्रेसची सोबत लागेल. ती किती मिळते यावर त्यांच्या "कार्यक्रमा'चे यश असेल. कारण कॉंग्रेसला अस्तित्व जपण्यासाठी सावध राहावेच लागणार आहेच! एवढी धास्ती जयंतरावांच्या "कार्यक्रमाची' आहे!
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

जयंत पाटील, Jayant Patil, राजकारण, Politics, Maharashtra, सांगली, Sangli