Know about some famous and infamous Modi of India | Sarkarnama

...आपल्या देशातले आणखी काही 'मोदी'! कोई नांमवाले कोई बदनाम!

...आपल्या देशातले आणखी काही 'मोदी'! कोई नांमवाले कोई बदनाम!

गुरुवार, 4 मार्च 2021

अशाच काही नांमवाल्या आणि काही बदनाम मोदींचा हा परिचय..खास 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात गाजत आहेत ते त्यांच्या विशिष्ट कार्यशैलीमुळे. एकेकाळी दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळवून देणारे मोदी कधी कधी वादग्रस्तही ठरतात. आपल्या देशात आणखीही प्रसिद्ध 'मोदी' होऊन गेले.

त्यापैकी एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतेक जणांनी चांगल्या अर्थाने नांव कमावले. त्यापैकी काही जण राजकारणातही होते. अशाच काही नांमवाल्या आणि काही बदनाम मोदींचा हा परिचय..खास 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी......

पिलू मोदी (जन्म १४ नोव्हेंबर १९२६, मृत्यू २९ जानेवारी १०८३)

पिलू मोदी हे प्रसिद्ध वास्तूरचनाकार होते. त्यांनी स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती आणि चवथ्या आणि पाचव्या लोकसभेचे त्यांनी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. १९७८ पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.

पारशी कुटुंबात जन्मलेल्या पिलू मोदींचे सर होमी मोदी हे वडील.भारतातील क्रेडिट कार्ड व्यवसायाचे जनक कली मोदी व टाटा आयर्न अँड स्टीलचे माजी चेअरमन रुसी मोदी हे पिलू मोदींचे बंधू. पिलू मोदींचे शिक्षण डेहराडूनच्या प्रसिद्ध डून स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी सर जे. जे. काॅलेज आॅफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर बर्कले येथील युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया येथून त्यांनी आर्किटेक्चरचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पाकिस्तानचे दिवंगत पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो हे महाविद्यालयात असताना एकाच खोलीत रहात. हे दोघेही अत्यंत जवळचे मित्र होते. पिलू मोदींनी एका अमेरिकन महिलेशी विवाह केला. 

होमी मोदी

सर होरमसजी फिरोजशहा मोदी (जन्म २३ सप्टेंबर १८८१, मृत्यू ९ मार्च १९६९)
होमी मोदींनी मुंबईत वकिली व्यवसाय केला. १९१३ मध्ये ते मुंबई महापालिकेचे चेअरमन बनले. १९२० मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. टेक्स्टाईल मिल मालक संघटनेचे ते अध्यक्ष होते. १९३३ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली मिल मालकांनी केलेल्या ली-मोदी करारामुळे त्यांनी पंडित नेहरुंची नाराजी ओढवून घेतली होती. त्यानंतर त्यांची १९३९ मध्ये टाटा ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. १९५९ पर्यंत ते टाटा ग्रुपसोबत होते. एसीसी, टाटा हायड्रो, इंडियन हाॅटेल्स अशा कंपन्यांचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

१९६८ मध्ये ते सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे संचालक बनले. इंडियन बँक असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. १९२९ ते १९४३ या काळात ते भारतीय विधीमंडळाचे सदस्य होते. नंतर व्हाईसराॅय यांच्या कार्यमंडळात त्यांना पुरवठा खात्याची जबाबदारी दिली गेली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

रुसी मोदी (जन्म १९१८) 

होमी मोदींचे दुसरे पूत्र रुसी मोदींनी काही काळ भारतात शिक्षण घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. भारतात परतल्यानंतर त्यांनी १९३९ मध्ये टाटा स्टीलमध्ये कार्यालयीन सहाय्यकाची नोकरी स्वीकारली. हळूहळू त्यांची प्रगती होत गेली. १९५३ मध्ये त्यांना कार्मिक विभागाचे संचालक म्हणून बढती मिळाली. १९६५ मध्ये ते टाटा स्टीलचे कच्चा माल विभागाचे संचालक बनले. १९७० मध्ये डायरेक्टर आॅपरेशन्स व १९७२ मध्ये सह व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. मार्च १९९३ मध्ये ते टाटा स्टीलमधून निवृत्त झाले. त्यानंतर तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची त्यांची इंडियन एअरलाईन्सव एअर इंडियाच्या संयुक्त चेअरमनपदाची जबाबदारी सोपवली. 

सोहराब मोदी (जन्म २ नोव्हेंबर, १८९७, मृत्यू २८ जानेवारी १९८४)

सोहराब मोदी हे जुन्या पिढीचे नामवंत अभिनेते खून का कानून, सिकंदर, पुकार, पृथ्वी वल्लभ, झाँसी की रानी, मिर्झा गालिब, जेलर हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. आपल्या प्रत्येक चित्रपटातून ते सामाजिक संदेश देत. मुंबईत जन्मलेलेल्या सोहराब मोदी यांनी शालेय शिक्षण झाल्यानंतर पर्यटन व्यवसायात उडी घेतली. १६ व्या वर्षी ते ग्वाल्हेरच्या टाऊन हाॅलमध्ये चित्रपट प्रोजेक्टर चालवत. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी आर्य सुबोध नाटक कंपनीची स्थापना केली. काही काळ त्यांनी पारसी रंगभूमीवर काम केले. १९३१ मध्ये चित्रपट उद्योगाला चांगले दिवस यायला लागल्यानंतर रंगभूमीवर त्याचा परिणाम झाला. या कलेला जागृत ठेवण्यासाठी सोहराब मोदींनी एका कंपनीची स्थापना केली. त्यांचे पहिले दोन्ही चित्रपट हे नाटकांवर आधारित होते. १९८० मध्ये सोहराब मोदींना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले गेले. 

ललित मोदी (जन्म २९ नोव्हेंबर १९६३) 

ललित कुमार मोदी हे भारतीय उद्योगपती असून क्रिकेटशी संबंधित आहे. इंडियन प्रिमिअर लिगचे ते संस्थापक. आयपीएलचे चेअरमन आणि कमिशनर म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. २००८-२०१० या काळात ते चँपियन्स लिगचेही चेअरमन होते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे ते उपाध्यक्ष होते. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व पंजाब क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश होते. विरोधी पक्ष व माध्यमे त्यांचा "सूपर चीफ मिनिस्टर' असा उल्लेख करत. पुढे त्यांचे काँग्रेसचे मंत्री शशी थरुर यांच्याशी कोची टस्कर्स केरळ आयपीएल फ्रँचायझीवरुन वाद झाला. या फ्रँचायझीमध्ये शशी शरुन यांनी अप्रत्यक्षपणे गुंतवणूक केली असल्याचा ललित मोदींनी आरोप केला. त्यानंतर शशी थरुर यांना राजीनामा द्यावा लागला. कोची फ्रँचायझीनेही मोदी यांच्यावर छळवणूक केल्याचा आरोप केला. 

२०१० ची आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने गैरवर्तणूक, बेशिस्त आणि आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप करत मोदींना निलंबित केले. त्यांच्या विरोधात चौकशी समिती नेमली गेली आणि २०१३ मध्ये ललित मोदींवर आयुष्यभरासाठी बंदी आणली गेली. पुढे सक्तवसुली संचनालयाने (ईडी) ललित मोदींची चौकशी करण्यास सुरुवात केली. पण ललित मोदी त्यापूर्वीच लंडनला निघून गेले. मोदी हे सध्या मोदी एंटरप्राईजेसचे व्यवस्थापकीय संचालक असून ग्राॅडफ्रे फिलिप्स इंडियाचे कार्याकारी संचालक आहेत. 

निरव मोदी (जन्म २७ फेब्रुवारी १९७१)

निरव मोदी हा भारतीय उद्योगपती असून त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी स्वरुपाचा कट करणे, अफरातफर, भ्रष्टाचार असे विविध आरोप आहेत. भारत व इंटरपोलने निरिव मोदीवर हे आरोप ठेवले आहेत. पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या २०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. लाॅस एंजलिस येथील एका उद्योजकाला ४० लाख डाॅलर्सना फसविल्याप्रकरणातही कॅलिफोर्नियामध्ये निरव मोदीवर खटला भरण्यात आला आहे. खऱ्या हिऱ्यांचे अमिष दाखवून बनावट हिरे दिल्याप्रकरणात हा खटला सुरु आहे. निरव मोदी चौकशीचा फेरा लागल्यानंतर भारतातून फरारी झाला असून सध्या तो लंडनमध्ये आहे. लंडनच्या न्यायालयानं नुकतीच त्याच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

भारत, राजकारण, Politics, व्यवसाय, Profession, शिक्षण, Education, मुंबई, Company, ललित मोदी, आयपीएल, क्रिकेट, cricket