IPS krishna prakash
IPS krishna prakash

बंदोबस्तावर असताना IPS कृष्ण प्रकाश यांनी फेटा बांधणे नियमात बसते का?

पोलिस अधिकाऱ्यांच्या ड्रेसकोडचे उल्लंघन झाल्याचा ठपका...

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीसाठी निघणाऱ्या पालख्यांचा प्रस्थान सोहळाही भक्तिभावाने नटलेला असतो. लाखो वारकरी शिस्तीने, परंपरेने या सोहळ्यात सहभागी होतात. वारीसाठी पोलिस बंदोबस्ताची गरज नावालाच असते. ही पोलिसांची उपस्थिती वारकऱ्यांना शिस्त लावण्यासाठी नसते तर बाहेरून येणाऱ्या गर्दीला आवरण्यासाठी असते. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे पालखी सोहळा नेहमीप्रमाणे लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जाऊ शकला नाही. मानाच्या मानल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळाही त्यामुळे साधेपणाने यंदा झाला.

देहू आणि आळंदी ही दोन्ही पोलिस ठाणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येतात. या ठिकाणी कृष्णप्रकाश हे पोलिस आयुक्त आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध पोलिस अधिकाऱ्यांत कृष्णप्रकाश यांचा समावेश होतो. आळंदी येथे 19 जुलै 2021 रोजी पालखी प्रस्थान सोहळा सुरू असताना कृष्ण प्रकाश हे तेथे उपस्थित होते. साहजिकच काही उत्साही वारकऱ्यांनी त्यांना फेटा बांधला. पालखी सोहळ्यात ते नाचले. टाळ वाजवत ते सहभागी झाले. त्याचा व्हिडीओ आणि त्याचे फोटो सोशल मिडियात व्हारयल झाले.

त्यांचे हे कृत्य आणि त्यांनी बांधलेला फेटा यावर काहींनी आक्षेप घेतला. पोलिस अधिकाऱ्यांचा ड्रेसकोड हा कायद्याने ठरवून दिला आहे. त्यात परस्पर त्यांना बदल करता येत नाही. बंदोबस्तावरील अधिकारी जर असे सहभागी होऊ लागले तर ते विचारधारेने कोणत्या तरी बाजून झुकलेले तर नाहीत ना, अशीही शंका येऊ शकते. त्यामुळे काहींनी त्यावर मत व्यक्त केले.

गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

किशोर मांदळे यांनी यावर थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की पोलिसांचा कर्तव्यावर हजर असताना सार्वजनिक जीवनातील वावर हा धर्मनिरपेक्ष, समता व लोकशाहीवादी असला पाहिजे. वारीत फुगड्या खेळणे, गंध टिळा लावणे, फेटा बांधून घेणे. सार्वजनिक गणेशोत्सवात आरती करणे किंवा विविध जातीधर्माच्या उत्सवात कधी भगवा, कधी नीळा, कधी पिवळा असे फेटे बांधून घेणे निक्षून टाळावे‌. मध्यंतरी महिला पोलिस वर्दीत असताना वटपौर्णिमेला वडाला दोरे गुंडाळत फेरे मारत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. आषाढी वारीचा टिळा भाळी लावून उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा फोटो देखील समाज माध्यमातून कालच दिसला आहे.

मांदळे पुढे म्हणतात, ``एकदा निधर्मी भूमिकेशी तडजोड केली की कुठल्या धर्माला नकार देणार ? उद्या कुणी इफ्तार पार्टीत पोलीस अधिकाऱ्याला जाळीदार टोपी घालायची गळ घालील. ख्रिस्ती धर्माचे लोक मग का मागे राहतील ? तेही क्रॉस गळ्यात मारतील. शीख, जैन, लिंगायत, महानुभाव आहेत, बौद्ध आहेत. कुणाला नकार देणार ? तेव्हा काळ सोकावण्याआधी आपण त्वरित लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत. महाराष्ट्र राज्याची प्रागतिक प्रतिमा जपावी.``

निवृत्त अधिकारी खोपडे यांचे वेगळे मत

यावर निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. खोपडे यांच्या म्हणण्यानुसार शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार पोलिस गणवेश बदलत. त्यात अधिकाऱ्यांना बदल करता येत नाही हे खरे. वरवर पाहता त्यांचे कृत्य आक्षेपार्ह वाटते. तरी पण युनिफॉर्म मध्ये आम्ही देवळात गेलो तर शाल खांद्यावर घ्यावी लागते. कपाळावर गंध, शेंदूर, बुक्का लावला जातो. दर्ग्यात, गुरुद्वारात, बुद्ध विहारात विशिष्ट वस्त्र अंगावर घ्यावं लागतं. कार्यक्रम,लग्न समारंभात कोल्हापुरी फेटा, ब्राह्मणी, फुले पगडी परिधान करावी लागते. त्यात घालणारा आणि घालून घेणारा या दोघांनाही वावगं वाटत नाही. मी सेेवेत असताना अनेकदा तसं केलं आहे. बहुविध समाज व्यवस्थेत ते गरजेचे आहे, असे माझे मत आहे.

इथला समाज हा वरच्या रंगावर भुलतो, त्यामुळे धूर्त सनातनी ब्राह्मणी विचारांच्या सनदी अधिकाऱ्यांनी या पोलिस दलाचे प्रचंड नुकसान केले. बाहेरून शिस्त प्रिय, नियम पाळणारे व आतून ब्राह्मणी वर्चस्व कायम ठेवून समाज व कनिष्ठ अधिकारी,कर्मचाऱ्यांना दुबळे ठेवण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. आजही करतात. काही परिस्थितीनुसार रंग बदलतात. भगवा शर्ट घालून गणपतीची आरती करताना नांगरे पाटील दिसले होते. माझ्यासह युक्रांदचे कार्यकर्ते हे एकदा पुण्याचे पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांच्या कार्यालयातील भिंतीवर एकच कॅलेंडर होते. सनातन धर्माचे. कालांतराने त्यांच्याच हद्दीत डॉ. दाभोलकरांचा खून झाल्याचे समजले होते. एस. एस. जोग, सोमण,अरविंद इनामदार, वसंत सराफ या माजी पोलिस महासंचालकांनी असेच वर्तन करत आतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला  मोठं करायचं काम केलं, असा ठपका खोपडे यांनी ठेवला आहे.

हे मी आता नाही तर नोकरीत असताना `नवी दिशा` व `मुंबई जळाली, भिवंडी का नाही` या पुस्तकात लिहिले होते .त्या पैकी एकानेही माझ्यावर बदनामीचा खटला करण्याचे धाडस केले नाही, असाही दावाही त्यांनी केला. मी हिंदू आहे व त्यातील वारकरी परंपरा मानतो कारण वारीत कुणी जात विचारत नाहीत.बंगल्यात राहतो का झोपडीत ते विचारत नाहीत. कुणीही कुणाच्या येथे पाया पडतो, असेही खोपडे यांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com