Uddhav Thackeray Various Moods
Uddhav Thackeray Various MoodsSarkarnama

`कच्चा लिंबू` समजले जाणारे उद्धव आता पक्के खेळाडू बनलेत का?

उद्धव ठाकरे यांची अशी विविध रूपं महाराष्ट्र बघत होता. मात्र, एकविसावं शतक उजाडलं आणि मराठी माणसाला शिवसेनेसाठी झडझडून काम करणारा उद्धव दिसू लागला. 1997 पासून झालेल्या मुंबई महापालिकेच्या पाच निवडणुकांत शिवसेनेचं सारं राजकारण उद्धव यांच्या शब्दानुसार चालत होतं आणि या पाचही निवडणुकांत त्यांनी मुंबईवरचं आपलं राज्य शर्थीनं कायम राखलं होतं. राजकारणापेक्षा छायाचित्रणात अधिक रस असलेल्या उद्धव यांचं नवं रूप हे मराठी माणसांच्या एका मोठ्या समूहाला निश्‍चितच मोहिनी घालणारं होतं.

राठी माणसांच्या अस्मितेचं प्रतीक असलेलं हे महाराष्ट्र राज्य आज 60 वर्षांचं झालं आणि या हीरक महोत्सवी वर्षांत राज्याची धुरा अवचितपणे खांद्यावर आलेले उद्धव ठाकरे येत्या जुलैमध्ये साठीत प्रवेश करतील! यास योगायोग म्हणावं की अपघात की चमत्कार? खरं तर निव्वळ राजकीय अपरिहार्यतेपोटी हे घडून आलं होतं किंवा घडवून आणलं होतं, असंही म्हणा पाहिजे तर. मात्र, हे जे काही घडलं त्यानंतर दोन गोष्टी नक्‍कीच घडल्या आणि ती मात्र उद्धव यांनी जाणीवपूर्वक केलेली खेळी होती, यात शंकाच नाही.

शिवसेनेच्या हाती राज्याचं मुख्यमंत्रीपद यापूर्वी एकदा म्हणजे 25 वर्षांपूर्वी आलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं तर "मंत्रालयावर भगवा' फडकल्यानंतर तेथे स्थापन झालेल्या शिवसेनेच्या शाखेचे प्रमुख या नात्यानं त्यांना स्वत:लाच मुख्यमंत्रीपदाची सूत्रं अगदी सहज हाती घेता आली असती. पण बाळासाहेबांनी त्यास नकार दिला आणि "रिमोट कंट्रोल' हातात घेऊन सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग स्वीकारला. 1995 मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवे नेपथ्य उभे करणाऱ्या या साऱ्या वेगवान घडामोडी उद्धव घरातनंच आणि अगदी जवळून पाहत होते. तेव्हा बाळासाहेबांचंच राज्य होतं आणि तरीही अंतिम निर्णय घेताना केवळ उद्धव यांच्याच नव्हे तर राज यांच्या शब्दाला मोठं वजन होतं.

शिवसेनेनं राजकारणाशी घातलेली सांगड ही आमची मोठीच चूक होती आणि त्याचा आम्हाला मोठा फटका बसला.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना. डिसेंबर 2019)

कट टू सन 2012

प्रदीर्घ आजारानंतर बाळासाहेबांचं निधन झालं होतं आणि "कार्यकारी प्रमुख' असं बिरूद त्याआधीची किमान 10 वर्षं मिरवणारे उद्धव यांना शिवसेनेसंबंधात कोणताही निर्णय घेता येणं सहजशक्‍य होऊन गेलं होतं. त्याआधीच प्रथम नारायण राणे आणि नंतरच्या वर्षभरातच राजही शिवसेनेला "अखेरचा जय महाराष्ट्र!' करून संघटनेतून बाहेर पडले होते. अर्थात, तेव्हापासूनच शिवसेनेची सूत्रं हळूहळू उद्धव यांच्या हाती येऊ लागली होती. मात्र, बाळासाहेबांचं निधन झालं आणि नंतरच्या दोन वर्षांतच एक नवाच उद्धव ठाकरे राज्याच्या राजकीय क्षीतिजावर उदयास आल्याचं दिसू लागलं.

खरं तर त्यापूर्वीच महाराष्ट्रानं उद्धव यांची अनेक रूपं बघितली होती. जेजे कला महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर "चौरंग' नावाची जाहिरात एजन्सी काढून "मॅफ्को' वगैरेंच्या जाहिरातींचं काम करणारा उद्धव. 1985 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची पोस्टर्स तयार करणारा उद्धव. वन्य जीवांची विविध रूपं कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी केव्हाही अचानक गायब होणारा उद्धव. ऍड-एजन्सी बंद केल्यावर वेगवेगळ्या जातींची कुत्री जमा करून "डॉग कॅनल' काढण्याच्या प्रयत्नातील उद्धव... आणि हे सारं करत असतानाही 1989 मधील लोकसभा तसंच 1990 मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची पोस्टर्स तसंच वृत्तपत्रांतील जाहिराती यांचं काम करणारा उद्धव.

झडझडून काम करणारे उद्धव

उद्धव ठाकरे यांची अशी विविध रूपं महाराष्ट्र बघत होता. मात्र, एकविसावं शतक उजाडलं आणि मराठी माणसाला शिवसेनेसाठी झडझडून काम करणारा उद्धव दिसू लागला. 1997 पासून झालेल्या मुंबई महापालिकेच्या पाच निवडणुकांत शिवसेनेचं सारं राजकारण उद्धव यांच्या शब्दानुसार चालत होतं आणि या पाचही निवडणुकांत त्यांनी मुंबईवरचं आपलं राज्य शर्थीनं कायम राखलं होतं. राजकारणापेक्षा छायाचित्रणात अधिक रस असलेल्या उद्धव यांचं नवं रूप हे मराठी माणसांच्या एका मोठ्या समूहाला निश्‍चितच मोहिनी घालणारं होतं. त्यामुळेच 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर भारतीय जनता पक्षानं शिवसेनेशी असलेली "युती', त्या दोस्तान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षांतच तोडली, तरी त्यामुळे ते नाऊमेद झाले नाहीत.

उलट ते अधिक जोमानं, ईर्षेनं मैदानात उतरले आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जन्माला आलेला नवा भाजप तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राज यांची "महाराष्ट्र नवनिर्माण सेना' यांच्याशी एकहाती लढत देत, त्यांनी विधानसभेच्या थोड्या-थोडक्‍या नव्हे तर चक्‍क 63 जागा जिंकल्या होत्या. इथं "एकहाती' असा उल्लेख अपरिहार्य आहे; कारण बाळासाहेबांच्या सभोवताली अगदी सुरुवातीपासून हेमचंद्र गुप्ते, मनोहर आणि सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, छगन भुजबळ, दत्ता नलावडे, सुभाष देसाई अशा नेत्यांची फौज होती. शिवाय, दादा कोंडके यांच्यासारखा हरहुन्नरी कलावंतही गर्दी खेचण्यासाठी सोबत होता.

पहिल्यांदाच एकाकी लढत...

उद्धव यांनी 2014 मध्ये भाजपसह सर्वांना अंगावर घेतलं, तेव्हा असं नाव असलेला एकही नेता त्यांच्यासोबत नव्हता. होती फक्‍त ती त्यांनीच गेल्या एक-दीड दशकांत नीटसपणे बांधलेली संघटना आणि बाळासाहेबांचा अद्‌भूत "करिष्मा'. त्या जोरावरच त्यांनी हे यश मिळवलं आणि पुढची पाच वर्षं म्हणजे 2014 ते 19 या काळात सरकारात राहूनही अवघा विरोधी अवकाश व्यापून टाकला. अर्थात, त्यास त्या काळातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या अधिकृत विरोधी पक्षांची निष्क्रियताही तितकीच कारणीभूत होती.

त्यामुळेच 2019 मधील लोकसभा निवडणुका सामोऱ्या आल्या तेव्हा ही एकदा तुटलेली आणि पुढे रडत-खडत सुरू राहिलेली "युती' कायम राहावी म्हणून अमित शहा यांना "मातोश्री'वर पायधूळ झाडणं भाग पडलं होतं. त्यानंतरही दगाफटका झाला आणि विधानसभा निवडणुकीनंतर कबूल केलेलं मुख्यमंत्रीपद मिळत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी पूर्णपणे आपल्या तोपावेतोच्या राजकीय प्रकृतीशी "पंगा' घेऊन, महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुनश्‍च एकवार नव्या नेपथ्याची उभारणी केली.

ठाकरे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात

खरं तर उद्धव यांनी घेतलेल्या या निर्णयास प्रदीर्घ अशी पार्श्‍वभूमी आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्यला मैदानात उतरवून, त्या बदलत्या शिवसेनेची चुणूक उद्धव यांनी दाखवून दिलीच होती. हा एक मोठाच निर्णय होता. पाच दशकांहून अधिक काळ या संघटनेची सूत्रं एकाच कुटुंबाच्या हाती असूनही त्या कुटुंबातील कोणीही कधीही कोणतीही निवडणूक लढवण्याचा साधा विचारही मनात आणला नव्हता. बाळासाहेबांनी मनात आणलं असतं, तर ते मुख्यमंत्री, महापौर यापैकी कोणत्याही पदावर कधीही विराजमान होऊ शकले असते. मात्र, त्यांनी ते करण्याचं सातत्यानं टाळलं. खरं तर अशा प्रकारच्या संसदीय लोकशाहीची खिल्ली उडवण्यातच त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं होतं.

शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या पहिल्या-वाहिल्या जाहीर मेळाव्यातच 30 ऑक्‍टोबर 1966 रोजी त्यांनी "राजकारण हे गजकरण आहे!' अशी अगदीच सामान्य कोटी करून, आपले इरादे जाहीर केले होते. त्यानंतर पाच दशकांनी ठाकरे घराण्यातील एक युवक थेट निवडणूक लढवत होता. या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणं आणि पुढे त्यानंतर राज्याच्या राजकीय रंगमंचावर आलेल्या वादळानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्रीपदच स्वीकारणं, हे या पक्षाच्या आजवरच्या वाटचालीतील सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणावे लागतील. राज्यशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर आजवर टाळलेल्या "पोलिटिकल अकांउटीबिलीटी'ला सामोरं जाण्याचाच हा शिवसेनेसाठी एक धाडसी निर्णय होता. शिवसेनेचं रूपडं आरपार बदलून टाकण्याचं धाडस उद्धव यांनी या दोन निर्णयांतून महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं.

बाळासाहेबांच्या भूमिकेशी `पंगा`

उद्धव मुख्यमंत्री झाले तेव्हा हा गडी म्हणजे "कच्चं लिंबू' आहे, असं भलेभले समजत होते. आजवर उद्धव यांनी ज्या काही खेळ्या केल्या होत्या, त्या एकतर "मातोश्री'वरील खलबतखान्यातून वा शिवाजी पार्कवरील जाहीर सभांमधून. तेथे बॅट त्यांची, बॉल त्यांचा, स्टंप त्यांचे आणि मुख्य म्हणजे अम्पायरही तेच, अशी परिस्थिती होती. आता हे चित्र बदललं होतं. कधीही साधा नगरसेवक वा आमदार-खासदार न झालेला हा नेता आता थेट मुख्यमंत्री झाला होता. आजवर त्यानं विधिमंडळाचं कामकाजही क्‍वचितच बघितलं होतं आणि तेही गॅलरीतून!

त्यामुळे उद्धव हे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होणार नाहीत, अशीच खूणगाठ अनेकांनी आपल्या मनाशी बाळगली होती. मात्र, त्यांनी अगदी अल्पावधीतच मुख्यमंत्रीपदावर कब्जा केला आणि गेला दीड महिना अवघा देश कोरोना विषाणूच्या फैलावाशी लढत असताना, आपणही त्या लढाईत मागे नाही, हे सातत्यानं दाखवून दिलं. या एका मोठ्या संकटाशी देश सामना देत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार टीव्हीच्या छोट्या पडद्याच्या माध्यमातून जनतेला "भी नकोस; मी तुझ्या पाठीशी आहे!' छापाची भाषणं देत असताना, उद्धव यांनी मात्र जनतेशी संवाद साधण्याचं धोरण अवलंबिलं आणि त्यांची देहबोली, समजदारी आणि परिपक्‍वता यामुळे शिवसेनेचे पारंपरिक विरोधकही त्यांच्या प्रेमात केव्हा पडले, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही!

केवळ ठाकरे कुटुंबांनीच थेट सत्ता स्वीकारून बदलाचं वारं महाराष्ट्रात आणलंय हे दाखवून देण्यापुरता उद्धव यांचा हा निर्णय मर्यादित नव्हता. तर शिवसेनाच बदलत चाललीय, हे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर महिनाभरात नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दाखवून दिलं. "शिवसेनेनं राजकारणाशी घातलेली सांगड ही आमची मोठीच चूक होती आणि त्याचा आम्हाला मोठा फटका बसला,' हे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना, त्यांनी काढलेले उद्‌गारच याची साक्ष आहे.

एका अर्थानं हा थेट बाळासाहेबांच्या भूमिकेशी घेतलेला "पंगा'च आहे. बाळासाहेबांच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं बहर आला होता, तो 1987 मध्ये विलेपार्ले मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी खांद्यावर भगवी शाल घेतल्यानंतरच. त्यांनंतरच "हिंदूहृदयसम्राट' असं बिरूद त्यांना कायमचं चिकटलं. उद्धव यांनी थेट विधानसभेत काढलेले "धर्माशी राजकारणाशी घातलेली सांगड ही आमची चूक होती,' हे उद्‌गारच बदलती शिवसेना आणि बदललेले उद्धव यांची प्रचीती आणून देत आहेत. त्यावर त्यांच्या गेल्या पाच महिन्यांतील कार्यपद्धतीनं शिक्‍कामोर्तबच केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com