Political Journey of Sandipan Bhumre
Political Journey of Sandipan BhumreSarkarnama

तीनशे रुपये महिन्याची 'स्लीपबॉय'ची नोकरी ते कॅबिनेट मंत्री! थक्क करणारा प्रवास....

२९ नोव्हेंबर १९८२ ते १ मार्च १९९३ अशी अकरा वर्ष भुमरे यांनी कारखान्यावर स्लीपबॉय म्हणून नोकरी केली. सुरूवातीला तीनशे रुपये एवढा पगार त्यांना मिळायचा. तेव्हा भुमरे यांच्या ध्यानीमनी कधी आले असेल का? की ज्या कारखान्यात स्लीपबॉय म्हणून तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात शेतातील ऊसाच्या फडावर जाऊन नोंदणी घेणारा मी याच कारखान्याचा चेअरमन म्हणून खुर्चीवर बसेल. तर कदाचित नाही, पण नियतीने हे खरे करून दाखवले. राजकारणातले पहिले पाऊल. पैठणच्या साखर कारखान्यात अकरा वर्ष नोकरी केल्यानंतर भुमरे यांची उठबस आणि संपर्क या क्षेत्रात काम करणाऱ्या पुढाऱ्यांशी येऊ लागला....कसा आहे हा सगळा प्रवास?....वाचा

स्त्यावरील झोपडीत राहणारा मुलगा इंजिनिअर बनतो. आयएएस अधिकारी म्हणून मोठ्या हुद्यावर जातो. खरे तर मोठा संघर्ष त्यासाठी घडलेला असतो. येथे परीक्षेसाठी संघर्ष करणे महत्त्वाचे असते. राजकारण म्हटले तर नेहमीचीच परीक्षा आणि स्पर्धाही अतिशय खडतर. अशाही परिस्थितीत राजकारणात यश मिळविणे, ते टिकविणे हे सोपे नसते. साधा नगरसेवक झाला तरी त्याला अस्मान ठेंगणे होऊन जाते. 

राजकारणात घराणेशाहीचाही बोलबाला सुरू आहे. त्यामुळे सामान्य घरांतील कार्यकर्ते कधी लाल दिव्याच्या गाडीत हिंडणार, असा प्रश्न विचारला जातो. मात्र योग्य संधी मिळाली तर लाल दिवाही दूर नसतो. साधा कामगारही मंत्री म्हणून उच्च स्थानावर जाऊ शकतो. असे उदाहरण राज्याच्या मंत्रिमंडळात आहे.

मागासलेपणाचा शिक्का असलेला मराठवाडा, या भागातील आताच्या सोलापूर-धुळे महामार्गावरील पाचोड नावाचे छोटेशे गांव. दक्षिण काशी असा ज्या शहराचा उल्लेख केला जातो त्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील पाचोड हे गांव. कधी काळी सर्वसामान्य गावांसारखीच ओळख. पाचोड आता राज्याच्या नकाशावर ओळखले जाते ते राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचे मंत्री संदीपान आसाराम भुमरे यांचे गाव म्हणून. गरीब, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसललेल्या शेतीवर उदर्निवाह करणाऱ्या अकराजणांच्या भुमरे कुटुंबातील संदीपान हे चार बहिण भावंडामधील थोरले.

त्यामुळे वडीलांना शेतीच्या कामात हातभार लावण्याची सर्वाधिक जबाबदारी त्यांचीच. शालेश शिक्षण पाचोडच्या शाळेत शेतीकाम करत दहावीपर्यंत झाले. पुढे काय असा प्रश्न पडला तेव्हा नोकरी करण्याच सल्ला दिला गेला. अकरा जणांच्या कुटुंबाचा उदर्रिनावह शेतीवर करणे शक्य नसल्यामुळे वयाच्या वीसाव्या वर्षी संदीपान भुमरे यांनी पैठणच्या संत एकनाथ सहकारी कारख्यान्यात नोकरीला सुरूवात केली. 

११ वर्षे केली स्लीपबाॅयची नोकरी

नोकरीला सुरूवात केली ती शेती विभागात स्लीपबॉय म्हणून. कारखान्याला ऊस घालणाऱ्या सभासदांच्या शेतात जाऊन ऊस तोडणीचे वजन नोंदवायचे आणि त्याच्या पावत्या सभासदासह कारखान्यातील लेखा विभागात जमा करण्याचे हे काम. २९ नोव्हेंबर १९८२ ते १ मार्च १९९३ अशी अकरा वर्ष भुमरे यांनी कारखान्यावर स्लीपबॉय म्हणून नोकरी केली. सुरूवातीला तीनशे रुपये एवढा पगार त्यांना मिळायचा.

जिथे नोकरी केली तिथेच चेअरमन बनले

तेव्हा भुमरे यांच्या ध्यानीमनी कधी आले असेल का? की ज्या कारखान्यात स्लीपबॉय म्हणून तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात शेतातील ऊसाच्या फडावर जाऊन नोंदणी घेणारा मी याच कारखान्याचा चेअरमन म्हणून खुर्चीवर बसेन? तर कदाचित नाही, पण नियतीने हे खरे करून दाखवले. राजकारणातले पहिले पाऊल. पैठणच्या साखर कारखान्यात अकरा वर्ष नोकरी केल्यानंतर भुमरे यांची  उठबस आणि संपर्क या क्षेत्रात काम करणाऱ्या पुढाऱ्यांशी येऊ लागला. 

आपली नोकरी भली आणि काम असं ज्यांना वाटत होतं, त्याच भुमरे यांना राजकारण खुणावू लागले होते. मराठवाड्यात आणि विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य शहरी भागात वाढले होते. महानगरपालिकेत २७ नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर व इतर महत्वाची पदे मिळवत शिवसनेने आपले बस्तान बसवले होते. शहरानंतर ग्रामीण भागात विस्ताराच्या उद्देशाने शिवसेनेने आसपासच्या तालुक्यांमध्ये शिवसेनेच्या शाखा सुरू करत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरू केल्या होत्या. तत्कालीन शिवसेनेचे आमदार बबनराव वाघचौरे तेव्हा संत एकनाथ साखर कारखान्यात संचालक होते. त्यांनी भुमरेंना पाचोडचे शाखाप्रमुख म्हणून काम करायला सांगितले.

कारखान्याची नोकरी सांभाळत भुमरेंची शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण्यांमधील उठबस वाढली आणि पैठण पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. तेव्हाच्या सत्ताधारी, विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणात संदीपान भुमरे यांचे नशीब फळफळले आणि उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. ३० एप्रिल १९९२ ते २१ मार्च १९९५ दरम्यान, भुमरेंनी हे पद भुषवले. कारखान्यावरची स्लीपबॉयची नोकरी सोडून राजकारणात उतरण्याचा भुमरेंच्या निर्णय योग्य ठरला. पण त्यांच्या राजकीय प्रवासाची आता कुठे सुरूवात झाली होती. उपसभापती पदाचा कार्यकाळ संपत नाही तोच, भुमरे यांच्यासाठी विधानसभेची संधी वाट पाहत होती.

अन्..बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवार बदलला.. 

शिवसेनेचे तत्कालीन आमदार बबनराव वाघचौरे यांनी पक्षांतर्गत वादातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, आणि शिवसेनेने नव्या उमेदवाराचा शोध सुरू केला. विद्यमान आमदारानेच पक्ष सोडल्यामुळे पैठणच्या शिवसेनेत खळबळ उडाली होती. मतदारसंघ राखायचा असेल तर तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत शिवसेनेचे नेते होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर औरंगाबाद महापालिकेत महापौर झालेले मोरेश्वर सावे यांना पैठणमधून उमेदवारी जाहीर झाली. पण बाहेरचा उमदेवार म्हणून त्यांच्या नावाला विरोध होऊ लागला. पैठणमधून शिवसैनिकांच्या गाड्या भरून औरंगाबादेत सामना कार्यालयावर धडकल्या आणि उमेदवारी बदलून भुमरेंना देण्यासाठी आंदोलन सुरू झाले. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या कानावर हा प्रकार गेला आणि ते संतापले.

उमेदवारी बदलण्याची बहुदा पहिलीच वेळ

भुमरेंना फोन करत त्यांनी आधी `सामना`समोरील आंदोलन बंद करण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी मुंबईला बोलावून घेत भुमरेंच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावला आणि सावेंची उमदेवारी बदलून ती भुमरेंना दिली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`मध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती बदलण्याची ही बहुदा पहिलीच वेळ होती. दरम्यान, भुमरेंच्या बाबतीत आणखी एक चमत्कार घडला आणि तो म्हणजे ज्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात भुमरेंनी स्लीपबॉय म्हणून काम केले, त्याच कारखान्यात संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. २७ एप्रिल १९९३ ते १० नोव्हेंबर ९५ पर्यंत भुमरेंनी संचालक म्हणून कारखान्यात महत्चावाची भूमिका बजावली. १९९५ मध्ये पैठण विधानसभा मतदारसंघातून पंचायत समितीमध्ये उपसभापती राहिलेल्या भुमरे यांचा सामना कॉंग्रेसचे  तत्कालीन पंचायत समिती सभापती ॲड. कांतराव औटे यांच्याशी झाला. 

पहिल्याच निवडणुकीत भुमरे यांनी औटेंचा १८२३३ इतक्या मताधिक्याने पराभव केला. विधानसभेत पोहचल्यानंतर भुमरे यांनी सहकार क्षेत्रातही आपला जम बसवायला सुरूवात केली. संत एकनाथ सहकारी साखर कारख्यानाशी जणू भूमरेंचे भावनिक नातेच निर्माण झाले होते. संचालक मंडळाच्या निवडणुकीत भुमरेंनी आपले पॅनल उभे केले आणि दणदणीत विजय मिळवत थेट चेअरमनपदच मिळवले. पंचायत समिती उपसभापती पदावरून भुमरे यांनी साखर कारखन्याचे संचालक आणि त्यानंतर थेट विधानसभा गाठली. १९९५ च्या पहिल्या विजयानंतर सलग १९९९ आणि २००४ च्या

विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवत त्यांनी हॅट्रीक साधली. भुमरेंना राजकारणात दोन्ही हातांनी भरभरून मिळत होते.

पराभवानेही शिकवले...

पैठणच्या राजकीय इतिहासात सलग तीनवेळी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम संदीपान भुमरे यांच्या नावावर होता. मोकळा ढाकळा स्वभाव, पदाचा गर्व नाही आणि समोरच्या व्यक्तीच्या कामाचा जागेवर निकाल लावण्याची कार्यपध्दती, यामुळे भुमरे यांनी मतदारसंघातील जनतेला आपलेसे करून घेतले होते. भुमरे सातत्याने विजय मिळवत मतदारसंघावर भगवा कायम राखण्यात यशस्वी ठरत असल्याने पक्षनेतृत्वानेही दुसऱ्या नावाचा कधी विचार केला नव्हता, किंवा त्यांना डावलून मला उमेदवारी द्या, अशी मागणी करायला कुणी मातोश्रीवर गेले नाही हे खरे तर भुमरेंचे राजकीय यशच म्हणावे लागेल.

पण २००९ मध्ये भुमरे यांना यशाने हुलकावणी दिली. शिवसेने चौथ्यांदा संदीपान भुमरे यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखववला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तरुण संजय वाघचौरे यांना मैदानात उतरवले. पैठण विधानसभा मतदारसंघतील जनतेसाठी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना ही अत्यंत महत्वकांक्षी अशी योजना होती. ही योजना पुर्ण झाल्यास तालुक्यातील ५५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न सुटणार होता. पण १९९५ ते ९९ ची युतीची सत्ता वगळता राज्यात कॉंग्रेस-आघाडीचे सरकारचेच वर्चस्वर राहिले. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदाराच्या तालुक्यातील या योजनेला फारशी गती मिळाली नाही.

भुमरे विरोधकांनी ब्रम्हगव्हाण योजनेचा मुद्दा पुढे करत शिवसेनेची कोंडी केली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्हाला संधी द्या, पाच वर्षात ब्रम्हगव्हाणचे काम पुर्ण करतो असा शब्द पैठणच्या जनतेला दिला. काही प्रमाणात लोकांमध्ये असलेला रोष मतपेटीतून व्यक्त झाला आणि सलग तीन निवडणुका जिंकणाऱ्या भुमरेंचा अश्वमेध राष्ट्रवादी कॉंग्रेसने रोखला. साडेतेरा हजार मतांनी भुमरेंचा पराभव झाला आणि शिवसेनेचे गडही कोसळला. पाच वर्ष आमदारकी नसतांना भुमरेंनी जनतेशी असलेली संपर्काची नाळ तुटू दिली नाही, झालेल्या चुका मान्य करत त्या सुधारण्याची तयारी दाखवली. ज्या ब्रम्हगव्हाणसाठी पैठणच्या लोकांनी भाकरी फिरवली होती, ती योजनाही जैसे थेच होती.

युती तुटली तरी भुमरेंचा विजय...

पैठणमधील २००९च्या पराभवानंतर शिवसेनेने भुमरेंना 2014 मध्ये चौथ्यांदा उमेदवारी दिली खरी, पण युती तुटल्यामुळे नवे संकट उभे ठाकले होते. भाजपने तगडा उमेदवार दिल्यामुळे आधी पराभव स्वीकारावा लागलेल्या राष्ट्रवादीच्या संजय वाघचौरे यांच्यासोबतच भाजप विरोधात लढावे लागणार म्हणून भुमरेंच्या अडचणी वाढल्या होत्या. पण एकादृष्टीने युती तुटणे भुमरेंच्या पथ्यावरच पडले हे निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. २५०३९ मताधिक्य मिळवत भुमरेंनी चौथा विजय मिळवत गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.

ज्या ब्रम्हगव्हाण योजनेच्या रखडलेल्या कामाने भुमरेंना पाच वर्ष घरी बसवले ती योजना धसास लावण्यासाठी भुमरेंनी ताकद लावली. स्वंतत्र निवडणुका लढल्यानंतर राज्यातील सत्तेसाठी शिवसेना-भाजप एकत्र आले आणि त्याचा लाभ या योजनेला गती मिळण्यात झाला. दरम्यानच्या काळात भुमरे यांनी तालुक्यातील विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत तो ताब्यात घेतला.

उध्दव ठाकरेंकडून कौतुक..

शरद कारखान्याच्‍या पहिल्या गळीत हंगामासाठी संदीपान भुमरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बोलावले होते. यावेळी केलेल्या भाषणात ठाकरे यांनी भुमरेंचे तोंडभरून कौतुक केले होते. कारखानदारीशी शिवसेनेचा फारसा संबंध नाही, पण भुमरे तुम्ही यात देखील शिरलात. विशेष म्हणजे तुम्ही शरद कारखाना चालवायला घेतला, त्यामुळे तुमच्या धाडसाला दादच द्यावी लागेल. कुठलीही मदत लागली तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द उद्धव ठाकरेंनी तेव्हा दिला होता. २०१९ मध्ये भुमरेंची उमेदवारी बदलणार या चर्चेला ठाकरेंनी या भाषणातून एकप्रकारे पूर्णविरामच दिल्याची चर्चा त्यावेळी मतदारसंघात रंगली होती. पुढे ते खरेही ठरले.

महाविकास आघाडीत न्याय मिळाला...

संदीपान भुमरे यांनी विधानसभेच्या सहा पैकी पाच निवडणुका जिंकल्या. दरम्यान राज्यात १९९५ आणि २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले, पण मंत्रीपदाची संधी भुमरेंना मिळाली नव्हती. भुमरे यांनी देखील तशी अपेक्षा कधी व्यक्त केली नाही. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भुमरेंना उमेदवारीही मिळाली आणि अनपेक्षितपणे थेट कॅबिनेटमत्रीपदही.

शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढल्यानंतरही राज्यात अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की, जे महाराष्टाच्या राजकारणात कधी घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते ते तीन पक्ष एकत्रित आले. शिवसेना-राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाले आणि उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मंत्रीमंडळ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. औरंगाबाद जिल्ह्याने शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आल्यामुळे मंत्रीपदावर दावा केला गेला. जिल्ह्यातून संजय शिरसाट, कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांच्यासह भुमरे यांनी देखील प्रयत्न सुरू केले.

अन् डोळ्यात अश्रू आले...

विजयातील सातत्य आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ म्हणून आपल्याला राज्यमंत्रीपद मिळावे यासाठी भुमरे प्रयत्न करत होते. मुंबईत मंत्री कुणाला करायचे याची जेव्हा मातोश्रीवर चर्चा सुरू होती, तेव्हा भुमरे, मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करतोय, असे ठाकरेंनी सांगितले आणि भुमरेंच्या डोळ्यात अश्रू आले. ध्यानी मनी नसतांना भुमरेंना महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्याचा योग आला. रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री म्हणून

भुमरे यांनी शपथ घेतली आणि पैठणने पुन्हा मंत्रीपद अनुभवले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com