How did Rohit Pawar win BJPs stronghold Karjat-Jamkhed constituency | Sarkarnama

कर्जत-जामखेड हा भाजपचा बालेकिल्ला रोहित पवारांनी कसा जिंकला? 

कर्जत-जामखेड हा भाजपचा बालेकिल्ला रोहित पवारांनी कसा जिंकला? 

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 29 मे 2020

शरद पवारा यांचा नातू महाराष्ट्रात हरला, ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली. त्याच वेळी शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित हे कर्जत-जामखेडमध्ये प्रयत्न करत होते. एक तर स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या जिल्ह्यात ते देखील विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यात जाऊन लढायचे होते.

देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार होती, हे जवळपास निश्चित ठरले होते. अनेक पंडितांचा तसा होरा होता. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजप आघाडी निवडून येईल, असे चित्र होते. पण महाराष्ट्राचे लक्ष होते ते मावळ लोकसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढवित होते. त्यामुळे येथील निकाल काय लागतो, याबाबत अनेकांची उत्सुकता होती. पण राष्ट्रवादीच्या अनपेक्षित अंदाजानुसार पार्थ यांचा पराभव झाला. तो देखील मोठ्या फरकाने.

शरद पवारांचा नातू महाराष्ट्रात हरला, ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली. त्याच वेळी शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित हे कर्जत-जामखेडमध्ये प्रयत्न करत होते. विरोधक तर आयते सावज मिळाल्याच्या तयारीत होते. मावळापेक्षाही अधिक वाईट पराभव कर्जत-जामखेडमध्ये करू, असे आव्हान विरोधक देत होते. एक तर स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या जिल्ह्यात ते देखील विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यात जाऊन लढायचे होते. तेव्हाचे मंत्री राम शिंदे यांच्या विरोधात जाऊन लढायचे होते. त्यामुळेच अनेकांनी रोहित यांचा पराभव गृहित धरला होता. पण घडले उलटेच....

विधानसभेत तरुण आमदार म्हणून चेहरा

विधानसभेत तरुण आमदार म्हणून चेहरा समोर येतो तो जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा. महाराष्ट्रात वजन असलेल्या पवार कुटुंबियांचे संस्कार त्यांनी शपथविधीच्या दरम्यानच दाखवून दिले होते. नगर जिल्ह्यात भाजपच्या मुरब्बी नेत्याशी सामना करताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाकडे लागले होते. पवार घराण्याच्या प्रतिष्ठेचा तो मतदारसंघ झाला होता. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली प्रचंड अस्था, विरोधी भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी दहा वर्षे सत्ता भोगली व पालकमंत्रीपदी विराजमान होते. अशाही परिस्थितीत रोहित पवार सारखा नवखा उमेदवार देवून राष्ट्रवादी काॅग्रेसने मोठे आव्हान स्वीकारले होते.

भाजपचा बालेकिल्ला फोडला

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार गेल्या 25 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला होता. सदाशिवराव लोखंडे तीन वेळा तेथे आमदार होते. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी 42 हजार 845 मते मिळवून दणदणीत विजय मिळविला होता. या वेळी काॅग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून या मतदारसंघाला नवखा उमेदवार मिळाला होता. 2014 च्या निवडणुकीत प्रा. शिंदे यांनी 84 हजार 58 मते मिळवून पुन्हा विजय मिळविला. शिवसेनेच्या रमेश खाडे यांना त्यांनी पराभूत केले होते. 2019 च्या निवडणुकीत मात्र प्रा. शिंदे यांना 92 हजार 447 मते मिळाली. विरोधी राष्ट्रवादी काॅग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना तब्बल 1 लाख 35 हजार 824 मते मिळून ते विजयी झाले. शिंदे यांचा तब्बल 43 हजार 347 मताधिक्यांनी पराभव झाला. या निवडणुकीत विजयानंतर पवार यांच्या विजयी मिरवणुकीवर जेसीबीच्या साह्याने गुलाबाची उधळण करण्यात आली होती. नागरिकांनी जिल्ह्याला परक्या असलेल्या व नवख्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले, त्यामागे निश्चितच आमदार रोहित पवार यांचे कसब पणाला लागले.

नवखा असलो तरी... पाठीशी होती शिदोरी

मतदारसंघात नवखा असूनही आमदार रोहित पवार विजयी झाले. त्यामागे अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराचा पगडा महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे. दूरदृष्टी, नाविण्याचा शोध, विकासात्मक दृष्टी, सर्व घटकांना सामावून घेण्याची वृत्ती अशा सर्व गोष्टींमुळे सर्वपक्षीय नेत्यांना शरद पवार आपलेशे वाटतात. जामखेड-कर्जत मतदारसंघातही त्यांची छाप वेगळीच आहे. पवार यांचे नातू म्हणून रोहित पवार ज्यावेळी मतदारसंघात आले, त्यावेळी केवळ राष्ट्रवादी काॅग्रेसमधील नेत्यांनीच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पवार यांच्याच विचाराच्या शिदोरीचे गाठोडे घेवून रोहित पवार या मतदारसंघात आले. अशा सर्वसमावेशक विचारातूनच त्यांनी या मतदारसंघात निवडणुकीपुर्वीच अनेक कामे सुरू केली. पाणीप्रश्न, युवकांना रोजगार अशा गोष्टींच्या मर्मावर बोट ठेवून मतदारसंघावर पाडलेला प्रभाव त्यांना विजयाकडे घेवून गेला.

पवार कुटुंबाचा आपलेपणा

रोहित पवार यांना विजयी करण्याचा विडा उचलून संपूर्ण पवार कुटुंबियांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली. खुद्द शरद पवार यांनी विशेष लक्ष घातले. रोहित पवार यांच्या मातुश्री सुनंदाताई यांनी महिलांचे प्रश्न व बालकांचे शिक्षण यांवर विशेष भर दिला. मतदारसंघात आईच्या भुमिकेतून त्यांनी प्रतिमा निर्माण केली. महिला मंडळे, बचत गट आदींना विविध प्रकारे मदत करून आपलेसे केले.

`माधव पॅटर्न`ला तिलांजली...सर्व लोक समान आहेत

माधव पॅटर्न (माळी, धनगर, वंजारी) हा या मतदारसंघात विशेष परिणाम करणारा होता. प्रत्येक निवडणुकीत विजयासाठी या पॅटर्नची मते निर्णायक होत होती. हा पॅटर्न मोडीत काढावा, अशी अपेक्षा मतदारसंघातील विशेषतः मराठा समाजातील लोकांची होती. परंतु परंतु त्याला इतर कोणत्याही नेत्यांना यश येत नव्हते. रोहित पवार यांनी या मतदारसंघात कामे करताना हा पॅटर्नच मोडीत काढला. सर्व लोक समान आहेत. सर्व जातीं-धर्मांना सामावून घेत ते रिंगणात उतरले. त्याचाच परिणाम सर्वच समाजातील लोकांनी त्यांना साथ दिली.

युवकांना रोजगार देण्यासाठी विशेष उपक्रम

कर्जत-जामखेड हा परिसर दुष्काळी आहे. युवकांना रोजगार नसल्याने बेरोजगारीचे मोठे संकट या मतदारसंघावर आहे. रोहित पवार यांनी हे मर्म ओळखले. युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम राबविण्याचे निर्णय घेतले. बारामतीतील विविध संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेले विकासकामे हे युवक पाहतच होते. युवकांना रोजगार उपलब्ध करून देवू, कर्जतमध्ये आैद्योगिक वसाहतीस चालना देवू, आयटी क्षेत्रात युवकांना रोजगार उपलब्ध करून देवू, हे आश्वासन युवकांना भावले..

लोकांची खरी गरज ओळखून दुष्काळात पाणीवाटप

2019 च्या विधानसभा निवडणकीच्या आधी उन्हाळ्यात तसेच त्याच्या आधी एक वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्यात सरकारी टॅंकरचे पाणी पुरत नव्हते. अशा वेळी रोहित पवार धावून आले. बारामतीतील बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलेपमेंट ट्रस्ट व बारामती अॅग्रो या संस्थांच्या माध्यमातून गाव, वाडी तेथे टॅंकर सुरू केले. सकाळी मागणी केली, की संध्याकाळी त्या भागात टॅंकर हजर होत होता. लोकांची खरी गरज ओळखून त्यांनी पाणीवाटप केले. समाजमंदिरांसाठी साह्य केले. केवळ एकदाच सांगितल्यानंतर कामे होत असल्याने प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारला. त्याचाच परिणाम हे कार्यकर्ते रोहित पवार यांचे चाहते झाले. शिवाय प्रत्येकाला अशा पाण्याचा लाभ झाल्यामुळे एेनवेळी त्याचे रुपांतर रोहित पवार यांच्या बाजुने मतात झाले.

स्थानिक की बाहेरचा हा मुद्दा फेल गेला....

कर्जत-जामखेड हा मतदारसंघ दुष्काळी पट्टा असलेला. येथे लोकांना काय पाहिजे, हे रोहित पवार यांनी हेरले. प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या आधी पवार यांनी या मतदारसंघाचा चांगला अभ्यास केलेला होता. काय हवे, ते त्यांनी आधीच लोकांकडून माहिती करून घेतले होते. या निवडणुकीत प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये पवार कायमच भारी भरले. साहजिकच लोकांच्या मनावर ते राज्य करू शकले. कर्जत-जामखेड मतदारसंगातील निवडणुकीत प्रचाराच्या मुद्द्यांचा विचार केला, तर पाच मुद्दे महत्त्वाचे मानले जातात.

काय होते प्रचारातील लोकनांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे 

स्थानिक की बाहेरचा

पहिला मुद्दा म्हणजे स्थानिक उमेदवार की बाहेरचा. मतदारसंघात उमेदवार कोण हवा, याबाबत चर्चा होत होत होती. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दरम्यान उमेदवार स्थानिक हवा की बाहेरचा याबाबतही खलबते झाली. भाजपचे उमेदवार शिंदे हे स्थानिक, तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हे बाहेरचे उमेदवार, अशी प्रतिमा तयार झाली. परंतु बारामतीत जसा विकास झाला, तसाच विकास येथेही होईल, अशी आशा नागरिकांना लागली. साहजिकच रोहित पवार हे बाहेरचे उमेदवार असले, तरी लोकांनी त्यांना साथ दिली. मागील दहा वर्ष भाजपच्या उमेदवारास संधी देवूनही लोकांना ठोस विकास दिसत नव्हता. आता बदलून पाहू, अशा निश्चयानेही काही मतदारांनी रोहित पवार यांना साथ दिलेली दिसून येत आहे.

जामखेड व कर्जतचा पाणीप्रश्न

प्रचारातील मुद्द्यामध्ये दुसरा मुद्दा होता तो जामखेड व कर्जतचा पाणीप्रश्न. या मतदारसंघात शेतीचे पाणी मिळावे, अशी गेल्या अऩेक वर्षांपासूनची मागणी. शेतीचे सोडाच परंतु पिण्यासही पाणी मिळत नसल्याने जनता लोकप्रतिनिधींवर नाराज असे. या मतदारसंघातील मागणीला पवार यांनी साथ दिली. या भागातील शेतीला कोणत्याही परिस्थितीत कुकडीचे पाणी चांगल्या पद्धतीने मिळेल. त्यासाठी बारामती सहकार्य करेल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. कर्जत-जामखेडची बारामती करू, अशी हाक लोकांमध्ये दिली. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बांधावर जावून भेटी घेतल्या. प्रत्यक्ष शेतीची पाहणी करीत त्यांना कुकडीच्या पाण्याबाबत सांगितले. साहजिकच यापूर्वी मतदारसंघातील लोकप्रतिनीधी मंत्री होऊनही त्यांना हा प्रश्न प्रभावीपणे मांडता आला नाही, ते रोहित पवार यांनी मांडला. त्यामुळे पवार यांच्यावर विश्वास ठेवत लोकांनी त्यांना साथ दिली.

दुष्काळी हा शिक्का पुसून काढणे

प्रचाराच्या दरम्यान तिसरा मुद्दा म्हणजे दुष्काळी हा शिक्का पुसून काढणे. शेतीला पाणी, पिण्यास पाणी ही या दोन्ही तालुक्यांचा प्रधान्यक्रम होता. वर्षानुवर्षे दुष्काळाने पिचलेल्या या तालुक्याला ठोस आश्वासन कोणीच नेते देऊ शकत नव्हते. भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी मागील पाच वर्षांत पाणलोटाची कामे केल्याचा मुद्दा पटवून दिला असला, तरी त्याचा परिणाम दिसून येत नव्हता. शिवाय अनेक ठिकाणी कामाची मागणी प्रलंबित होती. त्यामुळे हा दुष्काळ भाजपच्या उमेदवाराला हटणार नाही, असे लोकांना वाटले. याउलट रोहित पवार यांनी मात्र निवडणुकीच्या आधी सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर पाठवून मी आमदार झाल्यावर अशी वेळ येणार नाही, हे ठासून सांगितले. त्यामुळे लोकांना ऐन अडचणीच्या काळात मोफत पाणी मिळाले. त्यामुळे लोकही खाल्ल्या मिठाला जागले. रोहित पवार यांच्या मागे उभे राहिले. हे दोन्ही तालुके कायमचे दुष्काळमुक्त करण्याचा आराखडाच रोहित पवार यांनी लोकांसमोर मांडला. साहजिकच प्रचारात हा मुद्दा लोकांना भावला.

तरुणांना रोजगार

चाैथा मुद्दा म्हणजे तरुणांना रोजगार. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. या निवडणुकीत युवकांना रोजगार देऊ, असे दोन्ही उमेदवारांनी ठासून सांगितले. परंतु राम शिंदे यांना यापूर्वी असा रोजगार उपलब्ध करता आला नाही. मोठी आैद्योगिक वसाहत आणून विकास साधता आला नाही. युवकांच्या हाताला काम नाही, याचाच फायदा पवार यांना झाला. बारामती येथे झालेला विकास हे माॅडेल म्हणून समोर ठेवत पवार यांनी युवकांना आपलेशे केले. थेट रोजगार कशा पद्धतीने मिळेल, हे स्पष्ट केले. युवा नेत्याचे विचार युवकांना पटले. आणि युवकांनी पवार यांनाच साथ दिली.

भयमुक्ती

पाचवा मुद्दा म्हणजे भयमुक्ती. विशेषतः कर्जत तालुक्यात वाळुतस्करी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी या मतदारसंघातील सर्वसामान्य लोक चांगल्या लोकप्रतिनीधीच्या शोधात होते. यापूर्वी भाजपच्या उमेदवाराने पाच वर्षात भयमुक्तीसाठी खास प्रयत्न झाले नसल्याचे लोकांना दिसून आले. त्यामुळे पवार तरी काहीतरी करतील, या वाळुचोरांच्या मुसक्या आवळतील, अशी भावना लोकांमध्ये झाली. यापुढे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवू, असे ठोस आश्वासन पवार यांनी प्रचाराच्या दरम्यान दिले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी पवार यांचाच हात धरला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

महाराष्ट्र, Maharashtra