sanjay Gaykwad ff
sanjay Gaykwad ffSarkarnama

विधानसभेच्या 288 सदस्यांत सर्वात वादग्रस्त ठरलेले हेच ते आमदार!

विधानसभेतील 288 आमदारांपैकी पहिल्याच टर्ममध्ये गायकवाड हे आपल्या शैलीने परिचित झाले आहेत. राजकारणात संयम महत्वाचा असतो तसेच बोलणेही शांत आणि आदबशीर असावे, असा संकेत आहे. पण गायकवाड साऱ्या संकेतांना झुगारून अनेकांशी पंगा घेत आहेत.

एखादा नेता पहिल्यांदाच आमदार होतो आणि तो लगेच राज्यात प्रसिद्धिस पावतो, अशी कमी उदाहरणे आहेत. राजकीय वारसा असलेले नेते लवकर राज्यभर माहिती होतात. पुणे आणि मुंबईबाहेरचा नेता असेल तर त्याला आपले नाव राज्यात पोहोचण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. या नावाला मात्र शिवसेनेचे बुलडाण्याचे (Buldana) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaykwad) अपवाद ठरले आहेत. मूळचे शिवसेनेचे असलेले आणि अनेक राजकीय पक्ष फिरलेल्या गायकवाड यांनी आपल्या आक्रमकपणातून बरेच वाद ओढून घेतले आहेत. विधानसभेतील 288 आमदारांपैकी पहिल्याच टर्ममध्ये गायकवाड हे आपल्या शैलीने परिचित झाले आहेत. राजकारणात संयम महत्वाचा असतो तसेच बोलणेही शांत आणि आदबशीर असावे, असा संकेत आहे. पण गायकवाड साऱ्या संकेतांना झुगारून अनेकांशी पंगा घेत आहेत. त्यांचे हे वागणे त्यांना राजकारणात दूरपर्यंत टिकाव धरून देणार की नाही, हे येणारा काळच सांगेल. पण गायकवाडांनी सध्या तरी अधुनमधून बातम्यांत झळकण्याची किमया साधलेली दिसते.  नववी पास गायकवाड यांचे शालेय शिक्षण लौकिकार्थाने कमी आहे. पण वाद घालायला तेवढे त्यांना पुरेसे असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही विषयावर रोखठोक बोलून ते संघर्षाची ठिणगी पेटवतात आणि आणि ती वाढवतात. विधानसभेच्या 288 आमदारांत सर्वात वादग्रस्त ठरलेल्या आमदारांत गायकवाड सर्वात वरचा नंबर आहे. विधान परिषदेतील आमदारांत हा क्रमांक गोपीचंद पडळकर यांच्याकडे जातो.  

गायकवाड यांचा राजकीय प्रवास... 

गायकवाड यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला असला तरी नंतर ते छावा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि त्यानंतर पुन्हा शिवसेना असा प्रवास आहे. ते सुरुवातीला बुलडाणा नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले होते. १५ वर्षांपासून त्यांची पत्नी आणि ते दोघेहे नगरसेवक होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या. गायकवाड हे कट्टर शिवसेनेचे कार्यकर्ते होते. मात्र, त्यांचा तेथील सेनेचे नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याशी वाद झाला होता. कालांतराने ते दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. त्यानंतर त्यांनी २००९ ची विधानसभा निवडणुक छावा संघटनेकडून लढवली होती. तर २०१४ ची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यामुळे ते शिवसेनेत आले. शिवसेनेकडून त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणुक लढवली व मोठ्या मताधिक्याने जिंकली. गायकवाड यांना तिकिट मिळावे, यासाठी जाधव यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गायकवाड यांना तिकिट देण्याची मागणी केली होती. गायकवाड यांना तिकिट मिळण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे असत्र उगारले होते. त्यामुळे गायकवाड यांना तिकिट मिळाले आणि ते 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.

शाकाहार सोडा, हा सल्ला देऊन वारकऱ्यांना घेतले अंगावर

त्यांचा कोरोना काळात वारकऱ्यांसोबतचा वादही चांगलाच चर्चेत आला होता. ``कोरोना काळात उपास-तापास करू नका. आता तुमच्या कामात देवही येणार नाही. कारण की देवाने आपला दरवाजा बंद केलेला आहे. म्हणून मांसाहार करा,` असे आवाहन त्यांनी जाहीरपणे केले होते. त्यावरुन वादंग पेटला होता. या विधानावर ठाम राहत गायकवाड यांनी स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी व उकडलेल्या अंड्यांच्या आहाराचे वाटप केले होते. कोरोनाच्या महामारीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवसाआड अंडे, मटण ,चिकन हे आपल्या आहारात घ्यावे आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन करत आग्रहाने या पदार्थांचे वाटप केले होते.

या त्यांच्या वकत्व्यावर त्यांना जाब विचारण्यासाठी वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांनी फोन केले होते. पण तेथे माघार घेतील ते गायकवाड कसले? या वक्तव्यावर त्यांना जाब विचारणाऱ्या गजानन महाराज दहिकर, अच्युत महाराज बोराडे, प्रकाश महाराज पांडे आणि इतरही बऱ्याच महाराज मंडळींनांच त्यांनी सुनावले.  मी देवधर्म काही मानत नाही. देवाचा चमत्कार असता तर कोरोना आलाच नसता, असेही विधान केले.  वारकऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागायची विनंती केली असता, माझे काही चुकले नाही, मी माफी मागणार नाही, असे विधान संजय गायकवाड यांनी केले होते. राजकारणात कोणी एवढी ताठर भूमिका ठेवण्याचे धाडस करत नाही. पण गायकवाडांना त्याची पर्वा नाही.

गायकवाड यांचा वारकऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर खासदार जाधव यांनी गायकवाड यांनी वारकऱ्यांसोबत असे बोलणे योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये संतपरंपरा आहे आणि सर्व राजकीय मंडळी आम्ही महाराष्ट्रातील संतांचा आदर करतो, असे जाधव यांना जाहीर करावे लागले. त्यांनी गायकवाड यांना माफी मागण्यास सांगितले होते. तरीही गायकवाड यांनी त्यांचे ऐकले नाही.

अॅट्रॉसिटी काद्यबद्दल वादग्रस्त विधान... 

गायकवाड यांनी नुकतेच खामगाव तालुक्यातील एका गावात बोलताना अॅट्रॉसिटी काद्यबद्दल वादग्रस्त विधान केले. यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले होते की या गावामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशला लाजवेल अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. मला `मातोश्री`वरून फोन आला की गावामध्ये जा आणि तेथील लोकांना धीर द्या. म्हणून मी इथे आलो आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेही नाव त्यांनी घेतले. ऍट्रॉसिटी हा कायदा रक्षणासाठी आहे. मात्र, अनेक ठिकाणी पैसे वसुल करण्यासाठी आणि धमकी देण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांना असा समाज अपेक्षित नव्हता.  जर विनाकारण कोणी वाद निर्माण करत असेल तर मी १० हजारांची फौज घेऊन येतो आणि सगळ्यांना सरळ करतो. मला सांगा मी सगळीच ताकद द्यायला तयार आहे. माझ्याकडे अस्त्र-शस्त्रांची ताकद आहे. सगळ्यांनी व्यवस्थित रहा, कोणावर अन्याय करुन नका पण, अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या, असे गायकवाड म्हणाले होते. एखाद्या आमदाराने असे बोलणे आक्षेपार्ह होते. त्यांच्या या वक्तव्याकडे सरकारने आणि शिवसेनेनेही दुर्लक्ष केले. 

फडणवीस यांच्यावर टीका...  

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलतानाही गायकवाड यांच्यावर खालच्या भाषेत टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. फडणवीस यांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशारा देताना मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते, असे विधान करून त्यांनी पातळी सोडली होती. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असे सांगताना त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली. कोणताही सभ्य राजकारणी अशा एकेरी भाषेवर शक्यतो येत नाही. पण गायकवाड यांनी हे सारे संकेत धुडकावून लावले. या साऱ्या प्रकारावरून बुलडाणा जिल्ह्यात राजकारण पेटले. भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार संजय कुटे यांनी गायकवाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बुलडाण्यात एकत्र आले होते. त्याला तसेच आक्रमक उत्तर देत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपणही त्यांच्यासारखेच असल्याचे दाखवून दिले.

गायकवाड यांचे म्हणणे काय?

माझा मूळचा स्वभावच आक्रमक आहे, त्याला काय करणार, असे गायकवाड सांगतात. मी कमी शिकलेला असलो तरी जीवन हीच माझी शाळा आहे. माझे वडिल हे संत गाडगेबाबा यांच्या सहवासात होते. त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत. मी कधी कोणाच्या वाटेल जात नाही. पण खरे तर बोलले पाहिजे, असा त्यांचा दावा आहे. मी कोरोना काळात मांसाहार करू नका, असे बोललो तर काय चुकिचे बोललो? माझ्या जिल्ह्यातील एकाही वारकऱ्याने त्याला आक्षेप घेतला नाही. इतर जिल्ह्यांतीलच महाराज चुकीचे वक्तव्य माझ्याविषयी करू लागले. मग मला त्यांना उत्तर द्यावे लागले. अॅट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर करणारी काही मंडळी आहेत, हे काय चुकीचे आहे? विशिष्ट मंडळीच त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे मी ते स्पष्टपणे सांगितले. फडणवीस यांच्याबद्दल जे विधान केले ते पण उद्वेगातून झाल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. हे विधान करण्याच्या आधी माझ्या मतदारसंघातील तीन तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मी उद्वीग्न झालो होतो. मला त्या रात्री झोपही आली नव्हती. लोकांना बेड, औषधे मिळत नसताना विरोधी नेते राजकारण करत असल्याने दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना मग भाजप कसे यात राजकारण करत आहे, हे स्पष्टपणे सांगितले आणि फडणवीस यांच्याविषयी ते विधान बोललो.

या स्वभावाचा फटका बसता नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की उलट खरे बोलणे लोकांना आवडते. त्यामुळे फटका बसण्याचे कारण नाही. पक्षातील वरिष्ठ नेते यावर बोलत नाही का, यावर गायकवाड म्हणाले की उद्धव साहेबांनी मला सबुरीचा सल्ला दिला होता. आमचे खासदारही मला तसेच सांगत असतात. मी पण त्यांना आता पुढे असे होणार नाही, असे सांगतो. पण मूळचा स्वभाव कधीकधी उफाळून येतो, अशी कबुली गायकवाड यांनी दिली. फडणविसांवर केलेल्या टिकेनंतर त्यांची कधी भेट झाली का, या प्रश्नावर ते म्हणाले की आम्ही नुसता नमस्कार केला. बोलणे झाले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com