rajasthan political crisis news
rajasthan political crisis newsSarkarnama

काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी गेहलोतांनी मोठे मन करून पायलटांना मिठी मारावी!

मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सचिन पायलटांना माफ करून मोठ्या मनाने कॉंग्रेसमध्ये पुन्हा येण्यासाठी साद घातली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. जर कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी असे मोठे मन केले तर भाजपने कितीही प्रयत्न केला तरी कॉंग्रेस संपणार नाही. फुटणार नाही. कोणतेही कॉंग्रेस सरकार अस्थीर होणार नाही. कोणी काही म्हणो गेहलोत आणि पायलट यांचा "डीएनए' कॉंग्रेसचा आहे.

अशोक गेहलोत हे कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत. सचिन पायलट हे त्यांच्याप्रमाणेच कॉंग्रेसीच आहेत. कोणी काही म्हणो गेहलोत आणि पायलटांचा "डीएनए' हा एकच आहे आणि तो कॉंग्रेसी आहे हे नाकारता येणार नाही. राजस्थानात गेल्या पाच सहा दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहेत. त्या पाहता येथे कॉंग्रेस अडचणीत असल्याचे दिसून येत आहेत. या राज्यातील घडामोडींकडे जर एक दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येते की कॉंग्रेसच्या फुटीचा किंवा बंडखोरीचा भाजप पुरेपार फायदा उठविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

राजस्थानातील घडामोडीवर विशेषत: कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राजस्थान हे भाजपच्या दृष्टिने महत्त्वाचे राज्य आहे. मध्यप्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता आली आहे. तशी राजस्थानातही भाजपला सत्ता हवी आहे. गेल्या एक वर्षापूर्वी राजस्थानात कॉंग्रेसची सत्ता आली. येथे बहुमत मिळाले असले तरी कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे भाजपमध्ये खुशी आहे. गेहलोत आणि पायलट या दोन्ही नेत्यांकडे पाहिले तर असे वाटते की हे दोन्ही नेते काही झाले तरी भाजप किंवा इतर पक्षात कधीच प्रवेश करणार नाहीत असे कोणीही सहजच बोलून जाईल. 

2018 मध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड अणि राजस्थानात कॉंग्रेसची सत्ता आली पण, छत्तीसगड सोडले तर दोन्ही राज्यांना ग्रहन लागले. प्रथम मध्यप्रदेशचे सरकार कोसळळे ते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे. त्यानंतर सचिन पायलट यांच्यामुळे गेहलोत सरकार अडचणीत आले आहे. ते केव्हाही कोसळू शकते. नाही कोसळले तर कॉंग्रेसचे नशीबच समजायचे असे म्हणावे लागेल. 

राजस्थानातील घडामोडी लक्षात घेता अशोक गेहलोतांकडे पाहिले तर असे लक्षात येते की गेहलोत हे तीनवेळा राजस्थानाचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांचे वय सत्तर वर्षाच्या घरात आहे. पण, त्यांना अजूनही सत्तेचा मोह सुटत नाही अशीही चर्चा होती. पण, राजस्थानातील घडामोडीनंतर गेहलोत यांनी माध्यमांशी बोलताना ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरून एक लक्षात येते त्यांची कॉंग्रेस निष्ठा त्यांच्या नसा नसा आहेत. आमचे काय आहे. आम्ही ज्येष्ठ झालो आहोत. भविष्य तुमचेच आहे. तुम्ही तरुण पिढी स्मार्ट आहात. आमच्यापेक्षा नवीन पिढी चांगले काम करते असे त्यांचे म्हणणे आहे. खरे तर सोनिया गांधी यांचे उदाहरण देऊन त्यांनी पायलटांनाही साद घातली होती की पुन्हा परत फिरा. आज पुन्हा त्यांनी तसेच आव्हान केले आहे. 

जर पायलट पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले तर मी त्यांना मिठी मारेन असे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक कॉंग्रेससाठी त्यांनी हा पुढाकार घ्यायला हवा. 
गेहलोतांना कॉंग्रेसने काय द्यायचे बाकी आहे? हा प्रश्न तसा पायलटांनाही लागू होतो. पण, कमलनाथ आणि गेहलोत यांच्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की हे दोन्ही नेते कॉंग्रेसमधील बुजुर्ग नेते आहेत. त्यांनी भरपूूर सत्तेचा उपयोग घेतला आहे. जर या दोन्ही नेत्यांची मुले रागावली तर ते त्यांना घराबाहेर काढणार आहेत का ? हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. गेहलोत काय किंवा कमलनाथ काय ? दोघे नेते कॉंग्रेसचे निष्ठावंत आहेत. त्यांच्यापुढे कॉंग्रेस जीवंत राहणे हे महत्वाचे आहे. जर दोन्ही राज्यात या युवा नेत्यांना या दोन्ही नेत्यांनी संधी देण्यासाठी मोठे मन केले तर कॉंग्रेससाठी हा निर्णय संजीवनी ठरू शकतो. 

गेहलोत यांनी एक पाऊल मागे घेताना पायलट हे जर परत आले तर त्यांना मी मिठी मारीन असे म्हटले आहे. म्हणजेच गेहलोतांना असे वाटते की राजस्थानात कॉंग्रेस कोणत्याही परिस्थितीत जीवंत राहिली पाहिजे असे वाटते. पायलट हे गेहलोत यांच्या मुलासारखेच म्हणजेच वैभव यांच्यासारखेच आहेत. जुन्या जाणत्या नेत्यांनी सत्तेच्या मोहाला बळी न पडता तरूण पिढील संधी दिली तर देशात वेगळा संदेश जाऊ शकतो. कोणतेही राजकारण न करता कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी तरूणांना संधी द्यायला हवी. मोठे मन करावे तर देशात वेगळे चित्र दिसले. असे निर्णय घेताना कॉंग्रेसने भाजपच्या राजकारणाचाही थोडा विचार करायला हवा. भाजपने महाराष्ट्रात जिल्हा अध्यक्षाला वयाची अट 45 केली आहे. आमदार आणि खासदारही तरूण हवे. कार्यक्षम हवेत असे भाजपला वाटते. म्हणजे भाजप दिवसेंदिवस अधिक तरूण करण्याचा प्रयत्न करीत असताना कॉंग्रेस का मागे आहे. 

गेहलोतांनी सचिन पायलटांना माफ करून मोठ्या मनाने कॉंग्रेसमध्ये पुन्हा येण्यासाठी साद घातली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. जर कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी असे मोठे मन केले तर भाजपने कितीही प्रयत्न केला तरी कॉंग्रेस संपणार नाही. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राजीव बजाज यांनी एक विधान केले होते ते कॉंग्रेसच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे. ते म्हणाले होते, की कॉंग्रेस ही स्कुटर झाली आहे. म्हणजेच कॉंग्रेस जुना पक्ष झाला आहे. फोर स्ट्रोक सारख्या गाड्या बाजारात येत आहेत त्याची तुलना त्यांनी भाजपशी केली होती. म्हणूनच म्हणावेसे वाटते राहुल बजाज यांनी काय म्हटले होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ही गेहलोत यांच्या लक्षात आलेले दिसतेय म्हणूनच त्यांनी पायलट जर परत आले तर त्यांना मिठी माण्याची केलेली भाषा खूप म्हणूनच खूप काही सांगून जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com