Ganpati Driniking Milk Rumour Twenty Five Years Back | Sarkarnama

२५ वर्षांपूर्वी याच दिवशी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे लोक दूध घेऊन धावत होते!

२५ वर्षांपूर्वी याच दिवशी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे लोक दूध घेऊन धावत होते!

अमित गोळवलकर 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

२१ सप्टेंबर १९९५. दिवस उजाडला तोच एका अफवेला जन्म देत. ट्वीटर, फेसबूक सारखी माध्यमे त्यावेळी नव्हती. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा उदय हळूहळू होत होता. पण तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत ती अफवा झपाट्याने पसरली आणि काही वेळातच जवळपास संपूर्ण देशभरात दुधाची टंचाई निर्माण झाली...केवळ भारतातच नव्हे तर परदेशांतही हे लोण पसरले. ही अफवा पुढची कित्येक वर्षे चर्चेचा विषय बनून राहिली.....

१ सप्टेंबर, १९९५ चा तो दिवस उजाडला तोच एका अफवेला जन्म देत. अफवाही अशी जी देव मानणाऱ्यांच्या काळजाला हात घालणारी. पुढचा दिवसभर या अफवेचा धुमाकूळ केवळ देशातच नव्हे तर परदेशातही सुरु राहीला. त्या दिवशी सकाळी सकाळीच अफवा पसरली की गणपती दूध पितोय.....याला सुरुवात झाली पंजाबमधील लुधियाणा शहरातून. असे सांगतात की एका व्यक्तीच्या स्वप्नात श्री गणेश आले आणि त्यांनी दूध पिण्याची इच्छा व्यक्त केली. सकाळी उठल्यावर ही व्यक्ती जवळच्या मंदीरात गेली आणि तिने पुजाऱ्याला आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. पुजाऱ्याने मंदीर उघडून दिले. या व्यक्तीने बरोबर नेलेले दूध गणेशाच्या मूर्तीला पाजण्यास सुरुवात केली. याचे एका सामुहिक अफवेत रुपांतर झाले आणि मग काय पूर्ण देशभर उडाला धुमाकूळ!

देशात विविध ठिकाणी लोक दुकानातून रांगा लावून दूध खरेदी करत होते आणि वाट्या, भांडी, चमचे घेऊन मंदिरांच्या दिशेने धावत होते. मंदीरांबाहेर गणपतीला दूध पाजण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. देशभरातल्या वृत्तपत्रांनी ही बातमी दुसऱ्या दिवशी मोठमोठ्या हेडलाईन्स देऊन प्रसिद्ध केली. सीएनएन, बीबीसी, वाॅशिंगटन पोस्ट, द न्यूयाॅर्क टाइम्स, गार्जियन और डेली एक्सप्रेस अशा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रेही या घटनेच्या बातम्या देण्यात मागे नव्हती.

राजकीय नेतेही मागे नव्हते 

त्यावेळी केंद्रात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. खुद्द वाजपेयी गणपतीला दूध पाजत असल्याची छायाचित्रे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली होती. महाराष्ट्रातही काही वेगळे चित्र नव्हते. युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी गणपतीला दूध पाजतानाची छायाचित्रे माध्यमांतून दाखवली गेली आणि दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाली. 

असे म्हणतात की महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी पुण्यात राहणाऱ्या कन्येला फोन करुन ही घटना कळवली होती. तिनेही पुण्याच्या सारसबाग मंदीरात जाऊन तिथल्या गणेशाच्या मूर्तीला दूध पाजण्याचा प्रयत्न केला. पण का कोण जाणे तिच्या हातून मात्र गणपती दूध प्यायला नाही. दिल्लीत अशोक पथ येथील भाजप मुख्यालयात असलेल्या गणपतीच्या छोटेखानी मंदीरातही गणपतीला दूध पाजण्याचा प्रयत्न सुरु होता. लालकृष्ण अडवानी आणि प्रमोद महाजन हे नेते कुतुहलाने तिथे गेले. कायकर्त्यांनी त्यांच्याही हातात दूधाच्या वाट्या देऊन गणपतीला दूध पाजायला लावले. 

अन्य देवताही अफवेच्या घेऱ्यात

हा प्रकार त्या दिवशभरात एवढा वाढला की मग गणपतीच काय अन्य देव-देवताही दूध प्यायला लागले. श्री शंकराच्या मंदिरासमोर असलेल्या नंदीलाही लोकांनी सोडले नाही. परिणाम काय तर देशात एक दिवसासाठी निर्माण झाली दुधाची टंचाई! त्या दिवशी दुधाचे भावही गगनाला जाऊन भिडले होते. नेहमीपेक्षा जास्त पैसे देऊन दूध विकत घेण्याची वेळ या अफवेने गणेशभक्तांसमोर आणली होती. 

चक्क दूरदर्शननेही या बातमीची दखल त्यावेळी घेतली होती. ही बातमी दूरदर्शनवरुन दाखवल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दिवंगत डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी याला जाहीरपणे आक्षेप घेतला होता व या प्रकाराला चॅलेंज देत पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अनेक मंदीरात गणपती दूध पित नाही, असे दिसल्यावर लोकांनी पुजाऱ्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केल्यावर 'या चमत्काराची वेळ दुपारी १२ पर्यंतच होती' अशी प्रकारची सारवासारव  पुजाऱ्यांना करावी लागली. 

महाराष्ट्रातही पोलिस यंत्रणेवर या साऱ्या प्रकाराचा प्रचंड ताण पडला होता. त्यावेळचे उपमुख्यमंत्री (कै.) गोपीनाथ मुंडे यांना दुपारनंतर पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार ही अफवा असल्याचे जाहीर करावे लागले. पण तोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गणपतीला दूध पाजून मोकळे झाले होते. हे सगळे सुरु असताना विज्ञानवादी पुढे आले असते तरच नवल. मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विज्ञान सांगायला सुरुवात केली. काहींनी 'दृष्टीभ्रम' म्हणून हा विषय उडवून लावला. अनेकांनी विज्ञानाच्या पद्धतीने मूर्तीसमोर दुधाचा चमचा धरत त्यामागचे शास्त्र समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण या झाल्या नंतरच्या गोष्टी.

अफवा पसरवण्यासाठी 'एसटीडी'चा वापर

त्या दिवशी वृत्तपत्रांना मोठे मथळे मिळाले. अनेकांची करमणूक झाली. आजही तो दिवस अनुभवलेले मोठ्या उत्साहाने या प्रकाराची चर्चा करताना दिसतात. हा प्रकार नक्की कसा सुरु झाला, बातमी पसरली कशी याबाबतही उलटसुलट मतप्रवाह आहेत. पूर्वीच्या काळी एका गावाहून दुसऱ्या गावी फोन करायचा तर ट्रंककाॅल करावा लागे. ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया होती. पण नंतर काँग्रेस सरकारने दूरसंचार क्षेत्रात सुधारणा केल्या. त्यामुळे 'एसटीडी' सुविधा लोकांच्या हाती आली. या सुविधेचा 'पुरेपूर वापर' ही अफवा पसरवण्यासाठी झाला यावर मात्र अनेकांचे एकमत झाले. 

अफवा पसरवणे हे वाईटच. त्यातून अनर्थ घडतात. ही अफवा तशी निरुपद्रवी होती. त्यातून काही अनवस्था प्रसंग निश्चित ओढवले नाहीत. राजकीय पक्षांना एकमेकांची खिल्ली उडवायला एक चांगला विषय सापडला एवढे मात्र नक्की. जे त्यावेळी खूप लहान होते किंवा या जगात ज्यांचा प्रवेश व्हायचा होता त्यांनी जर आजूबाजूला चौकशी केली तर '२१ सप्टेंबरच्या सकाळी आपण गणपतीला दूध पाजले' हे मोठ्या छातीठोकपणे सांगणारे अनेक जण सापडतील!
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

दिल्ली, गणपती, दूध, स्वप्न, सीएनएन, काँग्रेस, Indian National Congress, सरकार, Government, अटलबिहारी वाजपेयी, Atal Bihari Vajpayee, महाराष्ट्र, Maharashtra, मुख्यमंत्री, फोन, भाजप, लालकृष्ण अडवानी, LK Advani, प्रमोद महाजन, नरेंद्र दाभोलकर, पोलिस, गोपीनाथ मुंडे, पत्रकार