Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

फडणवीस बोलतात जोरात... पण नंतर ती आश्वासने ठरतात गाजराची पुंगी!

सत्ता द्या. तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेईन, या फडणवीस यांच्या दाव्याने त्यांच्या जुन्या पण पूर्ण न झालेल्याआश्वासनांची पुन्हा नव्याने आठवण झाली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी आक्रमक आणि अभ्यासू भाषणे करणारे नेते सध्या कमी आहेत. फडणवीस यांची विधीमंडळातील भाषणे असोत की प्रचारसभांतील ते वकिली बाण्याने, घसा ताणून जोरदार फटकेबाजी करतात. त्यांचे भाषण कधीकधी कर्कश्य वाटावे, इतक्या तारस्वरात ते बोलत असतात. आपला आवाज फार उंचावणार नाही, याची काळजी ते सध्या घेतात. तरीही त्यांच्या भाषणाची शैली ही आरडाओरडा केल्यासारखीच अजून वाटते.

त्या शैलीचे त्यांना फायदेही चांगले मिळाले आहेत. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत सफाईदारपणे बोलणारे फार कमी मराठी नेते आहेत. त्यात फडणवीस यांचा क्रमांक पहिला आहे. जोरदार बोलल्याने समोरचाही गार होतो, असा अनुभव त्यांना असावा. त्यामुळे त्यांनाही या शैलीत फारसा बदल करण्याची गरज वाटत नसावी. है झाले शैलीबद्दल, पण त्यांची राजकीय भाषाही समोरच्याला अंगावर घेणारी असते. आर या पार अशा वृत्तीने ते मुद्दे मांडत असतात. या विधानपासून आपल्याला मागे फिरावे लागेल, याची जाणीव त्यांना नसते. त्यामुळे एकदम शेंडी तुटो वा पारंबी, अशा पद्धतीने हे झाले नाही तर मी अमुक करीन, तमुक करीन असे सांगून प्रतिवाद करत ते वेळ मारून नेतात. मात्र त्यांच्या या `आरपार`च्या शैलीचे तेच आता बळी ठरलेले आहेत. सध्याच्या जमान्यात लगेच जुने व्हिडीओ, क्लिप दाखवून फडणवीस यांची अशी विधाने कशी गाजराची पुंगी ठरले आहेत, हे दाखवून देण्यात येते. 

1)स्वतंत्र विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नाही...

तरुणपणात माणसे स्वप्नाळू असतात. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होण्याच्या आधी स्वतंत्र विदर्भाचे खंदे पुरस्कर्ते होते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना त्यांनी तत्कालीन काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रीमंडळावर सदोष मनष्युवधाचा गुन्हा दाखल का करू नये, अशी मागणी केली होती. त्याच फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातही आत्महत्या सुरूच राहिल्या. नागपूरचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी गर्जना केली होती. मात्र ती काही प्रत्यक्षात आली नाही. विदर्भ अजूनही महाराष्ट्रातच आहे आणि फडणवीस यांचे लग्न होऊन त्यांना एक मुलगीदेखील आहे. 

2)जलसंपदा विभागातील गैरव्यवहाराचे बैलगाडीभरून पुरावे

देवेंद्र फडणवीस हे 2013 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्याच वेळी जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याविरोधात राळ उठली होती. सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांनी राज्य दणाणून सोडले होते. या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी मेंडिगिरी समिती नेमण्यात आली होती. या समितीसमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून फडणवीस आणि विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे बैलगाडी भरून पुरावे घेऊन गेले होते. हे पुरावे त्यांनी समितीसमोर सादर केले. औरंगाबादेत हा सारा ड्रामा रंगला होता. फडणवीस सत्तेवर आले तरी या गैरव्यवहार प्रकरणी पाच वर्षे पुढे काहीच झाले नाही. 

3)मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगरांना एसटी आरक्षण

राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मोठा उद्रेक होता. तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. धनगर समाजाचे नेते हे बारामतीत आंदोलनासाठी जमले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी फडणवीस आले आणि त्यांना मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगरांच्या मागणीवर निर्णय होईल, असे लेखी आश्वासन दिले. फडणवीस पाच वर्षे नंतर सत्तेवर होते. मात्र धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य झाले नाही.

4)राष्ट्रवादीशी युती कधीही नाही नाही.. नाही..

राज्यात 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 122 जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेशी युती नसल्याने 145 ची `मॅजिक फिगर` भाजप कशी गाठणार, याची उत्सुकता होती. निकालानंतर एका चॅनेलला फडणवीस यांनी मुलाखत दिली. साहजिकच तुम्ही राष्ट्रवादीशी युती करणार का, असा सवाल विचारण्यात आला. राष्ट्रवादीवर सर्वाधिक टीका करून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे फडणवीस हे काय उत्तर देणार, याची उत्सुकता होती. त्यांनी नाही म्हणून थेट उत्तर दिले. आपद्धर्म म्हणून राष्ट्रवादीशी युती करण्याची वेळ आली तर, असा प्रतिप्रश्न आला. त्यावर फडणवीस म्हणाले,`` आपदधर्म नाही, शाश्वत धर्म नाही. राष्ट्रवादीशी युती नाही.. नाही नाही..`` त्यांच्या तीन वेळाच्या नाही उच्चारणामुळे राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. पण राष्ट्रवादीनेच त्यांना पाठिंबा देऊन फडणवीस यांची वाट मोकळी केली. त्यानंतर 2019 च्या निकालानंतर थेट अजित पवार यांच्याशीच युती करून फडणवीस यांनी सकाळचा शपथविधीही उरकून घेतला होता. 

5)पुण्याचा कचरा प्रश्न सत्तेवर आल्यानंतर तीन महिन्यांत सोडविणार, हे त्यांचे आश्वासन सात वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही. येथे पालिकेत भाजपची सत्ता आहे. तरीही प्रश्न तसाच आहे. साताऱ्याला मेडिकल कॉलेजसाठी लगेच जागा देण्यात येईल, एक महिन्यात हा प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी मुख्यमंत्री असताना सांगितले होते मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आणि उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी एका महिन्यात प्रश्न मार्गी लावून जागा मिळाली, आता मेडिकल कॉलेज या वर्षी प्रथम वर्ष प्रवेश घेण्याची तयारी करत आहे.

6)महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकांच्या प्रचारात संबंधित शहरात मुख्यमंत्री म्हणून प्रचारात गेल्यानंतर फडणवीस यांनी हजारो कोटी रुपयांची पॅकेजेस जाहीर केली. प्रत्यक्षात ते हवेचेच बुडबुडे ठरले.

7)आताही सत्ता द्या, तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले नाही तर राजकीय संन्यास घेतो, अशी घोषणा त्यांनी केली आहे. सध्या तरी ते सत्तेवर येण्यचाी शक्यता कमी आहे. त्यामुळे ही घोषणाही अमलात येण्याचे कारण नाही. फडणविसांच्या अनेक फुसक्या घोषणांपैकी ही एक ठरेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com