Enforcement Directorate took action against Khadse though CD not out by Him | Sarkarnama

ईडीची कारवाई थांबेना तरी खडसेंची सीडी बाहेर निघेना!

ईडीची कारवाई थांबेना तरी खडसेंची सीडी बाहेर निघेना!

कैलास शिंदे
रविवार, 18 जुलै 2021

राजकारणात भूंकप कधी घडणार? 

'त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेल,' असे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मुंबई येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या साक्षीने केलेले वाक्य राज्यभर गाजले. त्यानंतर बऱ्याच कालावधींनी त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. त्यांच्या जावयांनाही ईडीने अटक केली. तरी खडसे यांची सीडी काही बाहेर आली नाही. या सीडीमुळे राजकारणात भूंकप होणार असल्याचा खडसे यांचा दावा होता. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे खडसे यांच्या सीडीची!

भारतीय जनता पक्षात असताना पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला विनाकारण छळ केला, असा आरोप  खडसे यांनी वेळोवेळी केला. या नेत्यांनी आपल्याला पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यामुळे आपण पक्षातून बाहेर पडत आहोत, असेही खडसे यानी सांगितले. मुंबईत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.त्यावेळी  त्यांची ईडी ची चौकशी सुरू नव्हती, परंतु भाजप सोडल्यानंतर भविष्यात त्यांची चौकशी होइल, अशी शक्यता व्यक्त होत होती. तसे घडले आहे.

जावई गिरीश चौधरी यांना अटक

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांना ईडी चे समन्स आले, त्यांची दोनदा चौकशी झाली. जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. त्यांना आता १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर पत्नी मंदाकिनी खडसे यांनीही ई डी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे ईडीने खडसे यांना पूर्णपणे घेरले आहे. विरोधकांच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी खडसे यांची सीडी कधी बाहेर येणार याचीच आता प्रतीक्षा आहे.खडसे यांच्या कडे कोणतीही सीडी नसल्याची चर्चा आहे,तर काही जणांच्या मते खडसे यांचाकडे सीडी असल्याची चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यात सीडी प्रकरणांचा इतिहास!

जळगाव जिल्ह्यात सीडी,च्या राजकारणाचा जुना इतिहास आहे. जळगाव सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आले. त्यावेळी विधिमंडळात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी याची सीडी आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या कडे विधिमंडळात त्यांनी सीडी सुपूर्द केली होती. मात्र त्यात काय होते,हे पुढे कधीच समजले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात  बाहेर आलेल्या भाजपच्या माजी खासदाराच्या सीडीबाबत बराच गाजावाजा झाला,त्यांना अखेर उमेदवारी गमवावी लागली.

त्यामुळे खडसे यांच्याकडे असलेल्या सीडीत नेमके काय आहे, कोणता धमाका होणार याबाबत चर्चा आहे. ही सीडी असलीच तर खडसेंना त्रास देणाऱ्या भाजप नेत्यांची असू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे त्रास देणाऱ्या नेत्यांची आणि खडसे यांची राजकीय जुगलबंदी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर रंगली होती. आपल्या आरोपांना उत्तर देताना खडसे यांनी जिल्ह्यातील एका रेस्टहाऊसचा उल्लेख करत संबंधित नेत्याकडे बोट दाखविले होते. त्यामुळे त्या रेस्टहाऊनमधील काही पराक्रम खडसे बाहेर काढणार का, असा अनेकांना संशय होता.

खडसे यांच्याकडे कोणतीच सीडी नाही, याची खात्री झाल्यानंतरच ईडीची कारवाई सुरू झाल्याचे काही मंडळींचे म्हणणे आहे. खरे तर खडसेंच्या आता गळ्यापर्यंत आले आहे. तरी ते या विषयावर काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ त्यांच्याकडे सीडी नाही, असाही याचा अर्थ घेतला जात आहे. सीडी काढेल, ही खडसे यांची पोकळ धमकी होती, असे त्यांच्या विरोधी गटामार्फत सांगण्यात येत आहे.

एखाद्याच्या राजकीय काटा काढण्यात जळगाव जिल्ह्यात खडसे यांचा कोणी हात धरू शकणार नाही. सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासारखे अनेक दिग्गज विरोधक खडसे यांनी राजकीयदृष्ट्या नामोहरम केले. त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद अशी सारी अस्त्रे वापरली. त्यामुळे सीडीचा अखेरचा डाव खेळून ते विरोधकांना पुन्हा अस्मान दाखवतील, अशी त्यांच्या समर्थकांना आशा असली तरी सध्या तरी खडसे बॅकफूटवर आहेत. प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत ते सध्या दिसत नाहीत. ईडीच्या चौकशींना उत्तर देतानाच त्यांची दमछाक होऊ लागल्याचे चित्र आहे. जावयाला अटक आणि पत्नीचीही चौकशी यामुळे खडसेंच्या विरोधातील कारवाईचा फास कठोर करण्याचा ईडीचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. तरी खडसेंची सीडी ही ईडीला कधी दणका देणार, याची उस्तुकता संपलेली नाही 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

राजकारण, Politics, ईडी, ED, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, मुंबई, Mumbai, शरद पवार, Sharad Pawar, भारत, भाजप, पोलिस, पत्नी, wife, जळगाव, Jangaon, गोपीनाथ मुंडे, लोकसभा, विषय, Topics, जैन