Does BJP have another option to come to power without ShivSena in Maharashtra Politics | Sarkarnama

सत्तेवर येण्यासाठी शिवसेना सोडून भाजपकडे दुसरा पर्याय आहे का?

सत्तेवर येण्यासाठी शिवसेना सोडून भाजपकडे दुसरा पर्याय आहे का?

प्रकाश पाटील
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

शिवसेनेने भाजपला बोट धरून राज्यात घराघरात पोचविले. त्याच भाजपने शिवसेनेला संपविण्याचे जे कटकारस्थान केले ते शिवसेनेने डोक्यात ठेवले. हे उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात अनेकदा बोलूनही दाखविले. भाजपने जर प्रामाणिकपणे (2014 मध्ये) मैत्री जपली असती. परममित्रावर विश्वास ठेवला असता तर आज भाजपला सत्तेबाहेर राहावेच लागले नसते. भाजपला पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर शिवसेनेशिवाय पर्यायच नाही हे सर्वात अधिक चंद्रकांतदादा पाटील यांनाच कळते. दुसऱ्या कोणाला नाही.

चंद्रकांत पाटील हे प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. तसेच ते मोदी-शहा-गडकरी यांच्याही विश्वासातील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर ते उजवा हात समजले जातात. दादा हे संघाच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व. त्यांना एकवेळ भाजपवर केलेली टीका सहन होईल पण, संघाविरोधात कोणी "ब्र' काढलेलाही खपत नाही. त्यामुळेच की काय दादांच्या संघ, भाजपच्या निेष्ठेविषयी कोणी स्वप्नातही शंका घेऊ नये.

विधानसभेत एकदा प्रश्नोउत्तरोच्या तासादरम्यान संघाला लक्ष्य करणाऱ्या आमदार कपिल पाटील यांच्याविरोधात दादा कसे भडकले होते. हे उदाहरण आहे. फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांच्यामध्येही विष कालविण्याचा प्रयत्न भाजप आणि विरोधकांनी केला मात्र, त्याचा या दोघांच्या मैत्रीवर काही फरक पडल नाही. हा झाला दादांच्या भाजप आणि संघ निष्ठेचा अध्याय! म्हणून दादा इतर पक्षांना प्रिय असण्याचे कारणही नाही. भाजपसाठी जे जे फायद्याचे होईल. तो निर्णय घेण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात.

भाजपचे ते स्वप्न अपुरे राहणार

याचा अर्थ असा नाही की ते विरोधी विचारांच्या लोकांशी अर्थात शिवसेनेबरोबर तशी सकारात्मक भाषा करतात. मुळात फडणवीस यांच्याप्रमाणे त्यांना सत्ता गेल्याचे दु:ख आहे. हे दु:ख त्यांनी कधी लपविले नाही. त्यांना आणि फडणवीस यांना आजही वाटते की जुना मित्र आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना एक ना एक दिवस आपल्या बरोबर येईल म्हणून ! ते जे स्वप्न पाहत आहेत. ते पूर्ण होण्याची शक्यता खूपच धूसर आहे. कारण शिवसेना भाजपपासून दूर गेलीय. शिवसेना आणि भाजप हे समीकरण आता लवकर जुळणे खूपच कठीण दिसते.

शिवसेना आणि भाजपची मैत्री पंचवीस तीस वर्षाहून अधिक घट्ट होती. "एनडीए'त जे पक्ष आहेत. त्यापैकी शिवसेनेचा वेगळा विचार करावा लागेल. शिवसेना आणि भाजपची जी युती होती हिंदुत्वाच्या मुद्यावर घट्ट होती. याच मुद्यावर दोन्ही पक्षांनी हातात हात घालून अनेक निवडणुका लढल्या. यशस्वी झाले. परंतु शिवसेनेची भिती भाजपला का वाटली हे कळत नाही. अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात शिवसेना संपेल आणि भाजपला पूर्ण बहुमत मिळेल हा गोड गैरसमज भाजपचा होता अशी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असते.

मोदी लाट सेनेने रोखली

2014 मध्ये देशात मोदी लाट आली. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी भाजपने शिवसेनेला वाऱ्यावर सोडले. जर त्यावेळी युती झाली असती तर परममैत्रीला भाजप जागला असे म्हणता आले असते. तसे झाले नाही. त्यावेळी एकतर्फी शिवसेनेची युती तोडलीत आणि राष्ट्रवादीनेही कॉंग्रेसशी आघाडी तोडली याचा काय अर्थ काढायचा चंद्रकांतदादा? उद्धव यांनी भाजपची 2014 मधील म्हणजे मोदी लाट महाराष्ट्रात थोपवली असे म्हणावे लागेल. कारण आपली आमदारांची संख्या वाढविण्यात 2104 मध्ये सेनेलाही यश मिळाले होते. दुसरा मुद्दा असा आहे की 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचीच भाजपला गरज होती. ते एकत्र लढले. शिवसेनेच्या जागा भाजपपेक्षा खूपच कमी झाल्या. जो भाजप लहान भाऊ होता. तो मोठा भाऊ झाला. शिवसेनेला वाटत होते, की मोदी लाटेत आपल्याही जागा वाढतील. तसे काही झाले नाही. शेवटी मोदी लाटेचा फायदा भाजपनेच उठविण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने नव्हे.

शिवसेनेला जर मोदी लाटेचा फायदा झाला असता तर भाजपपेक्षा अधिक जागा शिवसेनेच्या निवडून आल्या असत्या. त्या का आल्या नाहीत ? याचा शिवसेनेने विचार केला असावा. म्हणूनच शिवसेनेने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला. तेही खुद्द उद्वव ठाकरे. जर मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला असता तर त्यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या हातात हात का घातला असता याचे उत्तर चंद्रकांतदादांनी द्यायला हवे.

शिवसेनेचे मन ओळखता आले नाही

2014 ते 2019 पर्यंत राज्यात आणि केंद्रात शिवसेना भाजपच्या मंत्रिमंडळात होती. गेल्या सात वर्षातील या दोन्ही पक्षाचे जे नाते होते. त्याला तडा गेलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असताना दोन्ही पक्षात जे नाते होते. प्रेम, जिव्हाळा होता. तो आज राहिला नाही. या दोघांचाही एकमेकांवर विश्वासच राहिला नाही. जो भाजप देशातून आणि प्रत्येक राज्यातून कॉंग्रेसला उखडून फेकण्याची भाषा करीत होता. ते त्यांना आजही जमलेले नाही. कॉंग्रेसविषयी त्यांना जे वाटत होते. तेच शिवसेनेविषयी त्यांच्या मनात होते. मात्र बोलत नव्हते. शिवसेनेविरोधात छुपा अजंडा सुरू होता. शिवसेनेविषयी जेव्हा पटक देंगेची भाषा केली तेव्हा शिवसेना खऱ्या अर्थाने खडबडून जागी झाली. आपण भाजपबरोबर असेच फरपटत राहिलो तर आपले काही खरे नाही हे उद्धव ठाकरेंनी ओळखले होते. त्यामुळेच ते शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे. शिवसेनाप्रमुखांचे ते स्वप्न होते असे सांगू लागले.

शिवसेना संपेल तितका भाजपला फायदा

बाळासाहेबानंतर या पक्षाचे काही नाही. भाजप ही पोकळी भरून काढेल. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व शिवसेनेला तारणार नाही असे भाजपला वाटत होते. एकीकडे युती करायची आणि दुसरीकडे शिवसेनेच्या जागा कशा कमी होतील याची पद्धतशीरपणे कशी काळजी घेतली असा आरोप शिवसेनेची मंडळी नेहमची करतात. त्यामुळेच शिवसेनेनेही भाजपला खिंडीत गाटण्याची व्यूहरचना आखली होती. त्याची कुणकुण भाजपला लागू दिली नाही. भाजपला वाटत होते शिवसेनेला आपल्याशिवाय पर्यायच नाही पण, तसे काही नव्हते. शिवसेनेकडे ऑपशन होता. तो पुढे आलाच. उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री बनले. भाजपला खऱ्या अर्थाने कात्रजचा घाट दाखविला.

भाजपला वाढविताना शिवसेनेला मित्राची भीती वाटली नाही. आज आणि उद्याही जर शिवसेना बरोबर नसेल तर भाजप विधानसभेत बहुमत मिळविल का ? 122 जागा मोदी लाटेत मिळाल्या होत्या त्या 150 पर्यंत जातील का ? याचे उत्तर काळच देईल. काहीही असो शिवसेना बरोबर नसल्याचे दु:ख देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांना का वाटते ? काही झाले तरी राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना या तीन पक्षांना किमान 150 जागा तरी मिळतातच. जर या तिघांपैकी एकच पक्ष असा आहे की त्याचे जितके खच्चीकरण होईल तितका भाजपला फायदा होईल तो पक्ष म्हणजे शिवसेना. भाजपला जे वाटते ते शिवसेनेबाबत होणार नाही. ठाकरेंची तिसरी पिढीही तयार आहे. भाजपला पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर शिवसेनेशिवाय पर्यायच नाही असे म्हणावे लागेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

भाजप, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil