Vidhan Sabha
Vidhan SabhaSarkarnama

आघाडी सरकारला पहिला धक्का देण्याची भाजपची अशी आहे तयारी..

महाविकास आघाडीचे सरकार आज जाणार, उद्या जाणार, असे भाजपचे नेते सांगत असतात. गेली दीड वर्षे हीच बतावणी सुरू आहे. आता मात्र महाविकास आघाडी सरकारला पहिला धक्का देण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यासाठी अशी आहे तयारी...

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा फेब्रुवारी 2020 मध्ये दिला आणि ते काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीच मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाहिले. नाना पटोले यांनी राजीनामा देऊ नये, अशीच इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आघाडीतील इतर नेत्यांची होती. त्याला कारणही तसेच होते. कारण विधानसभा अध्यक्षपदाची निवड करणे हे राजकीयदृष्ट्या कसोटीचे असू शकते. महाविकास आघाडी सरकार कुठे स्थिरस्थावर होत असताना अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पुन्हा धोका घ्यायचा का, असा या नेत्यांचा सवाल होता.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काही बाबी आधीपासूनच स्पष्ट आहेत. ही निवडणूक जुलैमध्ये घेण्याची काॅंग्रेसची मागणी आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ती घ्यावी, असे काॅंग्रेसचे म्हणणे आहे.

अशी होते अध्यक्षाची निवड!

ही निवड कशी होणार, याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. या निवडणुकीत धोका देण्यासाठी भाजपला आयती संधी मिळू शकते. त्यासाठी विधानसभा निवडणूक कशी होते, हे विधीमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्याकडून जाणून घेतले. ते म्हणतात, या निवडणुकीमध्ये हात उंचावून किंवा आवाजी पद्धतीने मतदान होत नाही. तर गोपनीय मतदान पद्धती वापरली जाते. मतपेटी ठेवून मतपत्रिकेवर मतदान घेतले जाते. पसंतीक्रमानुसार मतदान केले जाते आणि मतमोजणीही तशीच केली जाते. समजा विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार उभे राहिले. तर मतपत्रिकेवर तीन उमेदवारांची नावे राहतील. मतदारांना पसंतीक्रमानुसार मते द्यावी लागतील. समजा तीन उमेदवारांपैकी तिसऱ्याला कमी मते मिळाली, तर त्या उमेदवाराला एलेमिनेट केले जाईल आणि मग पुढची प्रक्रिया सुरू होईल. पुन्हा मतदान झाल्यानंतर पहिल्या पसंतीची मते ज्या उमेदवाराला जास्त मिळतील, त्या उमेदवाराची निवड होते. या निवडणुकीसाठी अधिकृत व्हिप काढता येत नाही. पण तरीही पक्षप्रमुख परस्पर आपल्या स्तरावर व्हिप काढतात. त्याला वैधानिक महत्व नसते.``

आमदार मिळविण्याची भाजपला संधी

कळसे यांनी दिलेल्या माहितीचे विश्लेषण केले तर महाविकास आघाडी सरकारची कसोटी लागू शकते. व्हीप लागू होत नसल्याने आमदाराला अपात्र ठरण्याची भीती राहणार नाही. तसेच गुप्त मतदान असल्याने ते कोणाला दाखवयाची गरजही राहणार नाही. यात भाजप संधी साधू शकते. याचा अर्थ ही निवडणूक झाली तर बिनविरोधच करावी, असा आतापर्यंतचा संकेत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात तरी मतदान झालेले नाही. विरोधी पक्ष आपला उमेदवार देतात. पण तो नंतर माघार घेतो. त्यामुळे या साऱ्या परिस्थितीत भाजप कशी पावले टाकणार, याची उत्सुकता राहणार आहे.

भाजपमधील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडीला सोपी होणार नाही, यासाठी भाजपकडून पावले टाकण्यात येत आहेत. महाविकास आघाडी सरकारने आपल्या पहिला विश्वासदर्शक ठरावात डिसेंबर 2019 मध्ये 160 हून अधिक मते मिळवून आपले आसन भक्कम असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे भाजपला हाच चोळण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आता काठावरील काही आमदारांना, शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतील असंतृष्टांना हाताशी धरण्याचे काम सुरू झाले आहे.

अध्यक्ष निवडीत पराभव म्हणजे सरकारवर अविश्वास का?
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणजे त्या सरकारचाही पराभव असतो का, या प्रश्नावर कळसे यांनी नकारार्थी उत्तर दिले. सरकारवर अविश्वास ठराव आणून त्यात त्यांचा पराभव झाला तर कायदेशीरदृष्ट्या सरकारने बहुमत गमावले, असा होता. मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव हा कायदेशीर पराभव नसला तरी नैतिकदृष्ट्या तो सरकारचा पराभव असतो. त्यामुळे सरकारला राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. मात्र तरीही सरकार गेले नाही तर विरोधकांकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारे ते अविश्वास ठराव आणून सरकार घालवू शकतात. मात्र आतापर्यंत एकाही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारचा पराभव झाला, अशी घटना अद्याप घडली नसल्याचे कळसे यांनी स्पष्ट केले. 

पंढरपूर-मंगळेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होऊन तेथे भाजपचे समाधान अवताडे हे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या 105 वरून 106 झाली आहे. देगलूर येथील एक जागा रिक्त आहे. त्यामुळे काॅंग्रेसची एक जागा कमी झाले आहे. पक्षीय बलाबलात या व्यतिरिक्त फारसा फरक पडलेला नाही. विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांचे बलाबल पुढीलप्रमाणे आहे.

  • शिवसेना- 56
  • राष्ट्रवादी काॅंग्रेस- 53
  • काॅंग्रेस- 43
  • भाजप-106
  • बहुजन विकास आघाडी-3
  • समाजवादी पक्ष-2
  • एमआयएम-2
  • प्रहार जनशक्ती-2
  • मनसे-1
  • सीपीएम-1
  • शेकाप-1
  • स्वाभिमानी -1
  • रासप-1
  • जनसुराज्य-1
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष-1
  • अपक्ष-13
  • रिक्त 1
  • (विधीमंडळाच्या वेबसाईटवरून)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com