पुण्यातील बेपत्ता तरुण माओवादी संघटनेच्या एका विभागाचा डेप्युटी कमांडर - Pune's Absconding Youth Became Deputy Commancder of Maoist Organization | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातील बेपत्ता तरुण माओवादी संघटनेच्या एका विभागाचा डेप्युटी कमांडर

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 9 जुलै 2019

मुंबईमध्ये चित्रकला प्रदर्शनासाठीचे काम मिळाले, असे सांगून कासेवाडीतुन नऊ वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झालेला तरुण सध्या छत्तीसगढमध्ये माओवादी संघटनेच्या एका विभागाचा डेप्युटी कमांडर झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. हा तरुण कबीर कला मंचाशी संबंध होता, त्याच्यासह पुण्यातील आणखी एक तरूण माओवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

पुणे : मुंबईमध्ये चित्रकला प्रदर्शनासाठीचे काम मिळाले, असे सांगून कासेवाडीतुन नऊ वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झालेला तरुण सध्या छत्तीसगढमध्ये माओवादी संघटनेच्या एका विभागाचा डेप्युटी कमांडर झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. हा तरुण कबीर कला मंचाशी संबंध होता, त्याच्यासह पुण्यातील आणखी एक तरूण माओवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

शनिवारवाड्यावरील एल्गार परिषदेप्रकरणातुन मागील एक ते दिड वर्ष पुणे पोलिसांकडून माओवादी संघटनांशी संबंधीत असल्याच्या कारणांवरुन अनेक बुद्धीवंतांना ताब्यात घेण्यात आले. त्याबाबतचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाच छत्तीसगढ पोलिसांनी रांजनांदगावमध्ये होणाऱ्या माओवादी कारवायांबाबतची एक महत्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 'विश्‍वा वय 28, राहणार पुणे, महाराष्ट्र' अशा नावाच्या तरुणाची नोंद केलेली आहे. छत्तीसगढ पोलिसांच्या यादीमध्ये 14 नावांचा समावेश आहे. त्यामध्ये 'विश्‍वा' हे नाव आहे. 

कोण आहे हा विश्‍वा?
छत्तीसगढ पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये उल्लेख असलेला माओवादी कमांडर विश्‍वा म्हणजेच, पुण्यातील कासेवाडी भागात राहणारा व नऊ वर्षांपुर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2010 अचानक बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार हाच माओवादी संघटनेच्या रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा विभाग समितीचा तो डेप्युटी कमांडर झाला आहे, असा उल्लेख छत्तीसगढ पोलिसांनी केला आहे. 

त्याने शंभर रुपये घेऊन सोडले घर!
कासेवाडीतील लक्ष्मी माता मंदिराजवळ राहणाऱ्या वसंत शेलार यांचा लहान मुलगा संतोष शेलार हा सात नोव्हेंबर 2010 रोजी सकाळी घरातुन निघून गेला. त्याने नववीपयर्यंत शिक्षण घेतले होते, तसेच त्याची चित्रकलाही चांगली होती. गहुवर्णीय व अंगाने सडपातळ असलेल्या संतोषने तेव्हा निळ्या रंगाचा शर्ट, काळी पॅंट, पायात पांढरे स्पोर्टस्‌ शुज असा पोषाख परिधान करुन स्वतःसमवेत शंभर रुपये, चित्रकलेची पुस्तके व लाल रंगाची बॅग घेतली. 'मला मुंबईमध्ये दोन वर्षांसाठी चित्रकलेचे काम मिळाले आहे' असे आईला सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आला नाही. कुटुंबीयांनी अनेक दिवस शोध घेऊनही तपास लागला नाही. त्यामुळे अखेर तीन महिन्यांनी म्हणजेच, 10 जानेवारी 2011 रोजी म्हणून त्याच्या मोठ्या भावाने याप्रकरणी कासेवाडी पोलिस चौकीमध्ये लहान भाऊ हरवल्याची तक्रार दाखल केली. 

कबीर कला मंचच्या संपर्कात होता संतोष शेलार
संतोष बेपत्ता होण्यापुर्वी कबीर कला मंच या संघटनेच्या संपर्कात होता. 2011 मध्ये पोलिसांनी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना संशयाच्या कारणावरुन अटक केली. त्यावेळी संतोष शेलार हा कबीर कला मंचच्या संपर्कात होता, मात्र तो 2009 पासून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांमध्येही संतोष शेलारच्या नावाचा उल्लेख आहे. दरम्यान, तो बेपत्ता झाल्यानंतर प्रारंभी गडचिरोली येथे गेला, त्यानंतर तेथून तो छत्तीसगडमधील माओवादी संघटनांच्या संपर्कात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

आणखी एक तरुण माओवाद्यांच्या संपर्कात
संतोष शेलार याच्याप्रमाणेच पुण्यातुन काही वर्षांपुर्वी प्रशांत कांबळे नावाचा तरुणही बेपत्ता झाला होता. त्याचाही पुण्यातील एका सांस्कृतिक कार्यक्रम घेणाऱ्या संघटनेशी जवळचा संपर्क होता. प्रशांत कांबळे हा देखील माओवाद्यांच्या एका संघटनेत सध्या सक्रीय असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संतोष शेलार हा बेपत्ता झाला, त्यानंतर तो गडचिरोलीतुन छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या संपर्कात आला. याबाबत पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती, त्यावेळी संतोष हा कबीर कला मंचच्या संपर्कात होता, हे देखील कागदोपत्री नमूद आहे - डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख