पुणेरी पोहे अन्‌ पुरणपोळी... 

ओलं खोबर पेरलेले पोहे अन्‌ साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे दौऱ्यातील आवडता मेनू असायचा. पुण्यात कोठेही उतरले तरी या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते.... सांगत होते पुण्याच्या श्रेयस हाॅटेलचे दत्तात्रेयचितळे. वेगवेगळ्या पदांवर असतानाही वाजपेयी यांच्या वागण्यात साधेपणा होता अन्‌ तो कायम भावला.... असेही त्यांनी नमूद केले.
पुणेरी पोहे अन्‌ पुरणपोळी... 

पुणे : ओलं खोबर पेरलेले पोहे अन्‌ साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे दौऱ्यातील आवडता मेनू असायचा. पुण्यात कोठेही उतरले तरी या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते.... सांगत होते पुण्याच्या श्रेयस हाॅटेलचे दत्तात्रेय चितळे. वेगवेगळ्या पदांवर असतानाही वाजपेयी यांच्या वागण्यात साधेपणा होता अन्‌ तो कायम भावला.... असेही त्यांनी नमूद केले.

अटलबिहारी वाजपेयी पुण्यात आल्यावर बहुतेक वेळा आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयसमध्ये उतरत असत. त्याचे कारण म्हणजे या हॉटेलचे संचालक बाळासाहेब चितळे अन्‌ वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या वर्गात नागपूरमध्ये 1943 मध्ये एकत्र होते. तेव्हापासून त्यांची मैत्री होती. तिचे धागे 1996 पर्यंत टिकले. वाजपेयी 1980 ते 1996 पर्यंत अनेकदा चितळे यांच्या हॉटेलमध्ये उतरले. उतरल्यावर त्यांचा कोणताही बडेजाव नसे. सकाळी सहा वाजता योगासने झाल्यावर सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची न्याहरी होई. त्यात त्यांना पुणेरी पद्धतीचे पोहे जाम आवडत. त्यावर ओलं खोबरे असेल, तर त्यांची मुद्रा अधिक उजळत.

पोह्यांबरोबरच त्यांना पुरणपोळीही आवडत असल्याची आठवण बाळासाहेब चितळे यांचे पुत्र दत्तात्रेय चितळे यांनी सांगितली. पंतप्रधान झाल्यावर ते राजभवन किंवा विरोधी पक्षनेते असताना हॉटेलमध्ये उतरत. परंतु, तेथेही त्यांना पोहे अन्‌ पुरणपोळीची आठवण येत असे. महाराष्ट्रीय चमचमीत खाद्यपदार्थ त्यांना आवडत, असे चितळे यांनी नमूद केले. 

वाजपेयी येणार असल्याचे समजल्यावर त्यांच्यासाठी सर्वोत्तम खोली राखून ठेवली जायची. मराठी चित्रपट, नाटके ते आवडीने पाहत. जनसंघाची स्थापना 1952 मध्ये पुण्यात प्रभात थिएटरमधील सभागृहात झाली. त्यानंतर सायंकाळी खोलीवर परतताना त्यांना टांगा-रिक्षा मिळाली नाही. तेव्हा बाबूराव किवळकर या मित्रासमवेत वाजपेयी चितळे यांच्या घरी पायी गेले व रात्री आवडीने वरण-भात खाल्ला होता, अशीही आठवण त्यांनी सांगितली. एकदा बालगंधर्व रंगमंदीरावरुन जात असताना वाजपेयी यांना तिथे जाऊन नाटक पाहण्याचीही इच्छा झाली होती, अशीही एक आठवण चितळे यांनी सांगितली. 

अडवानींचा वाढदिवस 
भारतीय जनता पक्षाची नोव्हेंबर 1995 मध्ये पुण्यात राष्ट्रीय कार्यकारिणी होती. 8 नोव्हेंबर रोजी लालकृष्ण अडवानी यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी हॉटेलमध्ये वाढदिवस आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात वाजपेयी यांनी उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच तेव्हा नरेंद्र मोदीही उपस्थित होते. वाढदिवसाची धामधूम सुरू असताना, एका कोपऱ्यात बसून मोदी हे विविध प्रांतांमधील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत होते, असे चितळे यांनी सांगितले.

पहा फोटो गॅलरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com