`तुम्ही आमदार व्हा, तुम्हाला कोथरूडमध्ये बंगला घेऊन देऊ` - you become MLA I will give you a bungalow in Kothrud promises Bapat | Politics Marathi News - Sarkarnama

`तुम्ही आमदार व्हा, तुम्हाला कोथरूडमध्ये बंगला घेऊन देऊ`

उमेश शेळके
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

चंद्रकांतदादा आणि खासदार गिरीश बापट यांच्या टोलेबाजीने रंगत...

पुणे  : पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात आजपासून खऱ्या अर्थाने झाली. भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत यासाठीच्या सूचना दिल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालेला हा मेळावा दोघांच्या खुसखुशीत भाषणामुळे रंगला. 

"पुण्याची गोडी एवढी आहे की चंद्रकांतदादा कोल्हापूरसोडून आता पुण्यातच राहायला आले आहेत' अशी खासदार गिरीश बापट यांनी केलेली टोलेबाजी.. तर "विरोधी पक्षातील नाराज उमेदवारांना कसे जवळ करायाचे आणि त्यांना फूटाणे खाऊन घालून काम करून घ्यायचे, हे बापट यांना चांगले जमते,,' अशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी केलेली कोटी. भाऊ आणि दादा यांची टोलेबाजी आणि कोटीमुळे एकाच हशा उसळला.

 बापट हे चौफेर टोलेबाजी करत म्हणाले की  कोल्हापूरची चप्पल, सोलापूरची चादर, सांगलीचे भडंग, सातारचे कंदी पेढे प्रसिद्ध आहेत, पुण्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. "पुणेकर मुळातच तयारीचे आहेत. पार्सल कोल्हापूरवरून आले काय, की सांगलीवरून, ते व्हाया पुणेच दिल्लीला जाते,'' असा टोला त्यांनी लगावला. पुण्याची गोडी अधिक असल्याने चंद्रकांतदादा पुण्यात आले. त्यांनी महात्मा सोसायटीत जसा बंगला घेतला, तसा तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्हालाही कोथरूड परिसरात बंगला पाहून देऊ, असे संग्राम देशमुखांकडे पाहत बापट म्हणताच हसा उसळला.

त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेले चंद्रकांत पाटील यांनी बापट यांना चिमटा काढला. " या निवडणुकीत विरोधी पक्षाला कालपर्यंत उमेदवार सापडत नव्हता. त्यांच्यात एकाला उमेदवारी मिळाली तर बाकीचे नाराज होतात. त्याचा फायदा कसा उचलयाचा हे बापटांना चांगला माहित आहे. नाराजांना जवळ घ्यायचे आणि त्यांना फूटाणे खाऊ घालून काम करून घ्यायचे,' असे ते म्हणताच हास्याची कारंजी फुलली.  "आपल्याकडे मात्र असे चालत नाही,' यांची आठवणही पाटील यांनी करून दिली. 

बोगस रोखण्यासाठी टगे ठेवा 
मतदानाचा टक्का वाढवणे आणि बोगस मतदान रोखणे हे महत्वाचे आहे. बोगस मतदार रोखण्यासाठी आतापासूनच वेळ प्रसंगी संघर्ष करावा लागणार आहे. तेव्हा प्रत्येक बुथवर चांगले टगे "पोलिंग एजंट' नेमा. बोगस मतदान रोखण्यासाठी सुरूवातीलाच दोघा-चौघांना बाहेर काढल्यास बोगस मतदारांमध्ये भीती बसेल, असा सल्ला पाटील यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख