
Pune News: पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार आता राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. मात्र, गेल्या अडीच वर्षापासून पुणे महापालिकेला पूर्ण वेळ नगरसचिव मिळालेला नाही.
गेल्या अडीच वर्षापासून नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार महापालिकेतील दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात येत आहे. आता तर पुणे महापालिकेच्याच राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार असणारे मुख्य कामगार अधिकारी तथा सह आयुक्त शिवाजी दौंडकर हे 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगिता भोसले यांच्याकडे हा नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
सुनील पारखी हे गेले अनेक वर्ष 'नगरसचिव' होते. ते आॅगस्ट 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून शिवाजी दौंडकर यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार होता. आता ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जबाबदारी कुणाला मिळणार, अशी चर्चा सुरू होती. त्यामध्ये आयुक्तांनी ही जबाबदारी योगिता भोसले यांच्याकडे सोपविली आहे.
महापालिकेची मुख्यसभा, स्थायी समितीसह इतर सर्व समित्यांचे काम कायद्यानुसार चालविण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार नगरसचिवांना असतात. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखणे, कोणाच्या दबावापेक्षा कायद्याला धरून निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे नगरसचिवाची जबाबदारी मोठी असते.
एकही अधिकारी पात्र नाही
दरम्यान, सुनील पारखी सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी भरती प्रक्रिया राबविली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असता 25 जणांनी अर्ज केले. पण आयुक्तांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या पदासाठी सक्षम उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे ही जागा रिक्तच राहिली.
त्यानंतर दौंडकर यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता तो कार्यभार भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेने पुन्हा पदभरती सुरू केली असल्याने त्यामध्ये आता नगरसचिव पदासाठी पुन्हा एकदा जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे.
Edited by : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.