`भाजपमध्ये काम महत्त्वाचे असल्याने विधान परिषदेची उमेदवारी मलाच` - As work is important in BJP I am the candidate for the Legislative Council | Politics Marathi News - Sarkarnama

`भाजपमध्ये काम महत्त्वाचे असल्याने विधान परिषदेची उमेदवारी मलाच`

उमेश घोंगडे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

वारकरी संप्रदायाचा पाठिंबा मिळाल्याचा मुंदडा यांचा दावा

पुणे : राजकारणात येण्याआधी मी गेल्या वीस वर्षापासून समाजकारणात आहे. `आर्ट ऑफ लिव्हिंग`चे प्रणेते रवीशंकर यांच्या मार्गदर्शनातून मी राजकारणात आलोय. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने माझ्यावर पक्षाच्या सेवा प्रकोषाचा प्रमुख म्हणून निवड केली. मी माझ्या कामातून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपची उमेदवारीची संधी मला नक्की मिळेल, असा विश्‍वास शेखर मुंदडा यांनी व्यक्त केला.

येत्या चार दिवसात भाजपाच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा होईल. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुंदडा यांनी "सरकारनामा'ला विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, " समाजकारणात विविध पातळ्यांवर मी गेल्या वीस वर्षापासून काम सुरू आहे.विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे "महाएनजीओ' या नावाने एक फेडरेशन स्थापन केले आहे. माझे सामाजिक काम पाहून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर सेवा प्रकोष या विशेष विभागाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सोपविली आहे. त्यांनी दाखविलेला विश्‍वास मी निश्‍चितपणे सार्थ ठरवणार आहे. विधान परिषदेसाठीदेखील पक्षाने मला संधी दिल्यास मी निश्‍चितपणे निवडून येईन. त्यासाठीची आवश्‍यक तयारी मी केली आहे. वारकरी संप्रदायाचा मोठा पाठिंबा मला मिळालेला आहे.'

निवडणुकीत जात ही एखाद्या विषाप्रमाणे पसरली असली तरी भारतीय जनता पार्टीत काम करताना जात कधीच आडवी येत नाही. जातकरणापलिकडे जाऊन पक्षासाठी आणि समाजासाठी केलेले काम या पक्षात पाहिजे जाते, असे मुंदडा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "" समाजासाठी काम करण्याची शिकवण मला माझे गुरू रवीशंकर यांनी दिली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कामात महाराष्ट्र पातळीवर सेवेची जबाबदारी मी पार पाडत आहे. चांगल्या लोकांनी राजकारणात गेले पाहिजे या माझ्या गुरूंच्या आदेशाने मी राजकारणात आलो असून त्यासाठी भारतीय जनता पार्टीसारखा दुसरा योग्य पक्ष नाही, असे मला वाटते.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख