
पिंपरी : संपूर्ण जगाचा जीव गेल्या दोन वर्षात कंठास आणलेल्या `कोरोना` चा पूर्ण बिमोड झाले नाही,तोच गोवर ही दुसरी संसर्गजन्य साथ उद्योगनगरीत आली आहे. त्यामुळे रुग्ण बालकांच्या पालकांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) प्रशासनही धास्तावले आहे. त्यांनी ही साथ पसरू नये म्हणून लसीकरणासारखी प्रतिबंधक उपाययोजना सुरु केली आहे. (PCMC Latest News)
राज्याची राजधानी मुंबईत गोवरने धुमाकूळ घालीत अनेक बालकांचे बळी घेतले आहेत. त्यानंतर या आजाराने आपला मोर्चा आता पिंपरीकडे वळवला आहे. शहरात या साथीचे पाच रुग्ण आढळले असून सात संशयित आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे शहराची भंगाराची बाजारपेठ असलेल्या कुदळवाडी भागातच हे रुग्ण आणि संशयित आढळले आहेत.
पाच रुग्णांत चार मुली आणि एक मुलगा आहे. त्यात एक ते चार वर्षे वयोगटातील दोन, तर पाच ते नऊ वयातील तीन बालके आहेत. हे रुग्ण आढळलेल्या कुदळवाडीवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे असल्याचे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी सांगितले. गोवर लसीकरण न झालेल्या आपल्या बालकांचे ते करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.पालिकेच्या रुग्णालयांत तीस आयसीयू बेड गोवर रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान,गोवरने एंट्री करताच प्रशासनाने संपूर्ण शहरात त्याचा सर्वे सुरु केला आहे. कालपर्यंत ९८ हजार ७४३ घरांचा तो करण्यात आला. त्यात दहा हजार ८२२ बालकांना ए व्हिटामीनची मात्रा देण्यात आली. दर, एक हजार ८९३ बालकांना रुबेला गोवर पहिला व दुसरा डोस देण्यात आला असल्याचे पिंपरी पालिकेचे वैद्यकीय संचालक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात शहरात एकही गोवरचा रुग्ण आढळून आला नव्हता,अशी माहिती त्यांनी दिली.
दुसरीकडे शहरातून कोरोना अद्याप गेलेला नाही. कालही नव्या सात रुग्णांची भर पडली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ३९ झाली.त्यातील एक रुग्णालयात उपचार घेत असून बाकीचे सर्व होम आयसोलेशनमध्ये आहेत. हिवाळ्यात दरवर्षीच डोके वर काढणाऱ्या डेंगीनेही यावर्षी शहरात आतापासूनच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे.त्याने दोघांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचा संशय आहे. काल आणखी दोघांना हा आजार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ही रुग्णसंख्या ३१७ वर गेल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी 'सरकारनामा'ला दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.