राष्ट्रवादी महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार का?

2014 ते 2019 हा पाच वर्षांचा अपवाद वगळता जन्मल्यापासून आतापर्यंत कायम सत्तेत राहणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ओळख झाली आहे. राष्ट्रवादीने सोलापूरच्या ग्रामीण भागाला भरभरून दिले असले तरीही सोलापूर शहराने राष्ट्रवादीला मात्र सत्तेच्या वाट्यापासून अद्यापही वंचितच ठेवले आहे.
NCP
NCP

नागपूर : महापालिकेचे उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष एवढ्याच स्थानिक पदांवर सोलापूर शहरातील अनेक दिग्गज नेत्यांना आतापर्यंत थांबावे लागले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरला राज्याच्या सत्तेत आजपर्यंत वाटा दिलेला नाही. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सोलापूर शहरासाठी महेश कोठे यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कामगिरी चांगली होणार, अशी अपेक्षा आहे. पण राष्ट्रवादी महेश कोठेंचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 1999 पूर्वी माजी आमदार युन्नुसभाई शेख यांच्या आमदारकीपर्यंतच सोलापूर शहरातील नेत्याला ताकद दिली. या घटनेलाही आता 20 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मात्र तशी संधी सोलापुरातील एकाही नेतृत्वाला मिळू शकली नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यात राष्ट्रवादीला सत्तेची अनपेक्षितपणे संधी मिळाली. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सोलापूर शहरासाठी महेश कोठे यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनाही राष्ट्रवादीने जवळ घेतले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

सोलापुरात राष्ट्रवादीची ताकद वाढत नाही म्हणून सत्तेचा वाटा नाही आणि सत्तेची ताकद सोलापूर शहर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मिळत नाही म्हणून पक्ष वाढीला मर्यादा येतात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. विधानपरिषद, राज्यसभा, महामंडळ, राज्यस्तरीय समित्या अशा कोणत्याही माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापर्यंत सोलापूर शहरातील एकाही नेत्याला काम करण्याची संधी दिलेली नाही. तब्बल 16 वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने याबाबतीत सोलापूर शहराकडे का दुर्लक्ष केले? याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेचे उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष एवढ्याच स्थानिक पदांवर सोलापूर शहरातील अनेक दिग्गज नेत्यांना थांबावे लागले आहे. या तिन्ही पदांवर काम केलेल्या जवळपास आठ ते दहा नेते सोलापूर शहरात आहेत. समान पदांवर काम करणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी असल्याने सोलापूर शहर राष्ट्रवादीचा नेता कोण? हा प्रश्न कधीच सुटू शकलेला नाही. त्यामुळे लहान पक्षात मोठी गटबाजी वारंवार बघायला मिळालेली आहे. शहरातील एखाद्या व्यक्तीला महामंडळ, राज्यसभा, विधान परिषद या माध्यमातून सत्तेचा वाटा दिला असता, तर सोलापूर शहरात राष्ट्रवादीचा नेता निश्‍चित झाला असता.

संधी कोणाला? नव्यांना की जुन्यांना...
सोलापूर महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे माजी महापौर महेश कोठे यांनी भूषविली आहेत. महेश कोठे यांचे आमदार होण्याचे स्वप्न मात्र अद्यापही कायम आहे. कोठे आता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीच्या सत्तेचा वाटा सोलापूर शहरासाठी द्यायचा झाल्यास तो वाटा कोणाला मिळणार? नव्याने पक्षात आलेल्या व्यक्तींना की जुन्या व्यक्तींना? याची कुजबुज पक्षात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राज्याच्या राजकारणात जन्म झाला आणि जन्मल्यापासून 1999 ते 2014 पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत राहिली. 2014 ते 2019 हा पाच वर्षांचा अपवाद वगळता जन्मल्यापासून आतापर्यंत कायम सत्तेत राहणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ओळख झाली आहे. राष्ट्रवादीने सोलापूरच्या ग्रामीण भागाला भरभरून दिले असले तरीही सोलापूर शहराने राष्ट्रवादीला मात्र सत्तेच्या वाट्यापासून अद्यापही वंचितच ठेवले आहे.
- प्रमोद बोडके

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com