पुणे पदवीधर : भाजपचा उमेदवार कोणीही असला तरी जबाबदारी चंद्रकांतदादांची! - who may be the BJP candidate but the responsibility lies with Chandrakantdada | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधर : भाजपचा उमेदवार कोणीही असला तरी जबाबदारी चंद्रकांतदादांची!

उमेश घोंगडे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

चंद्रकांतदादांच्या निवडणूक व्यवस्थापनाची कसोटी

पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीच्या तारखा झाल्याने आता उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा हा मूळचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथे भाजप कोणाला संधी देणार, याकडे अनेकांची लक्ष आहे.

राज्याचे माजी महसूल मंत्री व भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुका जिंकल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवून ते विधानसभेत प्रथमच निवडून गेले आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या जागी भाजपा कुणाला संधी देणार याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे, शेखर चरेगावकर, सुहास पटवर्धन, सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, रवींद्र भेगडे, शेखर मुंदडा अशी भाजपाच्या इच्छकांची मोठी यादी आहे.

गेल्यावेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्या अरूण लाड यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून यावेळी नक्की  मानली जात आहे. लाड यांनी त्या दृष्टीने तयारीदेखील केली आहे. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिंरंजीव सारंग पाटील यांनी गेल्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी चांगली लढत दिली होती. यावेळी सारंग पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने लाड यांची वाट मोकळी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी सारंग पाटील यांच्या विरोधात लाड यांनी बंडखोरी करीत जवळपास 30 हजार मते मिळविली होती. गेल्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने ही जागा राखण्यात भाजपाला यश मिळाले होते. मात्र, यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित होणारे प्रयत्न तसेच लाड यांनी केलेली पदवीधर मतदार नोंदणी यामुळे भाजपासाठी यावेळची निवडणूक कठीण आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यात व्यापक प्रतिमा असलेला उमेदवार नाही ही भाजपाची प्रमुख अडचण आहे. संघटनेच्या माध्यमातून भाजपाने मतदार नोंदणीत आघाडी घेतली आहे. रविवारी एका दिवशी पुण्यात 25 हजार पदवीधरांची नोंदणी करण्याचा विक्रम पक्षाने केला आहे. तरीही पक्षाला ही निवडणूक अवघड जाण्याची शक्‍यता असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सामाजिक समीकरणात बसणारा उमेदवार दिला तरच भाजपाला निवडणूक जिंकता येईल, असे जाणकारांचे मत आहे. निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने आता साऱ्याच इच्छुकांची धावपळ वाढणार हे निश्‍चित.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख