Who is going to threaten MLA Dilip Mohite? : Suresh Gore | Sarkarnama

आमदार दिलीप मोहिते यांना कोण धमकी देणार आहे? 

राजेंद्र सांडभोर 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांच्या वादात आता शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी उडी घेतली आहे. यात त्यांनी विरोधक असलेल्या मोहिते यांना लक्ष्य केले आहे. 

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे काम चांगले आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी अधिकाऱ्यांना अडथळे आणायचे काम करू नये. तालुक्‍यात कोरोना विषाणूच्या साथीची गंभीर परिस्थिती आहे. असे असताना सर्व प्रशासनाला आमदारांनी विश्वासात घेऊन कामाला लावले पाहिजे, त्याऐवजी मोहिते त्यांच्या बदल्या करण्याच्या मागे लागले आहेत. सध्या परिस्थिती काय आणि आमदारांचे चाललंय काय? तुमच्या मर्जीतील अधिकारी येथे आणून तुम्हाला चुकीची कामे करायची आहेत का? असा सवाल माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांच्या वादात आता शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी उडी घेतली आहे. यात त्यांनी विरोधक असलेल्या मोहिते यांना लक्ष्य केले आहे. 

खेडचे आमदार मोहिते यांनी तहसीलदार आमले यांच्या पतीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील शिवसेना शाखेत पत्रकारांशी गोरे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे रामदास धनवटे, विजया शिंदे, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते. 

माजी आमदार गोरे म्हणाले की,"आमदार दिलीप मोहिते यांना कोरोनाच्या संकटाची गंभीर परिस्थिती हाताळता आली नाही. त्यामुळे स्वतःच्या कर्तव्यापासून पळून मोहिते हे अधिकाऱ्यांच्या डोक्‍यावर खापर फोडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. संकटाशी मुकाबला करण्यासाठी त्यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवायला हवी. सध्याच्या परिस्थितीत जनतेला आधार देण्याची गरज असताना आमदार मोहिते मात्र भलतेच करीत आहेत आणि मोहिते यांना कोण धमकी देणार आहे? त्यांना कोणी धमकी देईल, असे मला वाटत नाही.' 

तहसीलदार आमले यांनी कोरोनाची परिस्थितीही अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. काही त्रुटी आहेत, त्या आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. याशिवाय गेल्या दीड वर्षात त्यांनी समाधानकारक काम केलेले आहे. 

अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय प्रशासकीय असून त्यांचा कार्यकाल संपल्यावर आपोआप त्यांची बदली होईल. तुम्ही अशी काय कामे सांगता की ज्याला तहसीलदार नकार देतात? आघाडीचे सरकार आहे. पूर्वी चालत होते, तसे आता चालणार नाही. सगळे तुम्ही ठरवाल, तसे होणार नाही. इथे कोणावर अन्याय होणार नाही, असेही सुरेश गोरे यांनी सुनावले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख