‘एफआरपी’ बुडवणारा आमदार चालतो हेच पंढरपुरातील मतदारांनी सिद्ध केले : रविकांत तुपकर - Voters in Pandharpur have proved that MLA who sinks 'FRP' is working :Ravikant Tupkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

‘एफआरपी’ बुडवणारा आमदार चालतो हेच पंढरपुरातील मतदारांनी सिद्ध केले : रविकांत तुपकर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

.ही निवडणूक धनदांडग्यांची होती. दोन्हीही उमेदवार शेतकऱ्यांचे पैसे बुडविणारेच होते,

पुणे : पंढरपूर विधानसभा मतदारसंघतील पोटनिवडणुकीत धनशक्ती जिंकली असून ‘एफआरपी’चे पैसे बुडवणारा उमेदवार आमदार म्हणून आम्हाला चालतो हेच या मतदारसंघातील मतदारांनी सिद्ध केले आहे, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.ही निवडणूक धनदांडग्यांची होती. दोन्हीही उमेदवार शेतकऱ्यांचे पैसे बुडविणारेच होते, असे तुपकर यांनी म्हटले आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सचिन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना फक्त एक हजार २७ मते मिळाली.या पाश्‍र्वभूमीवर तुपकर ‘सरकारनामा’शी बोलत होते. तुपकर म्हणाले, ‘‘ या निवडणुकीत पैशाचा अक्षरश: पाऊस पडला.ज्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे चाळीस कोटी रूपये थकविले त्यांनाच मतदारांनी निवडून दिले. आंदोलन, मोर्चे काढण्यासाठी शेतकऱ्यांना स्वाभीमानी शेतकरी संघटना हवी असते. मात्र, मतदान करताना शेतकऱ्यांना बुडविण्याऱ्यांकडेच हे शेतकरी मतदार म्हणून जातात याचे वाईट वाटते. आमचा उमेदवार उभा करताना काहीसा उशीर झाला तरी आम्ही निकराने लढत होतो. मात्र, आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करून लाठ्या काठ्या खाणारे तसेच पोलीसांकडून गुन्हे दाखल झाले तरी मागे-पुढे न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा विसर निवडणुकीत मतदारांना पडतो याचे दु:ख आहे.’’

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे चिरंजीव भगीरथ यांना पक्षाने उमेदवारी दिली. भालके यांच्या निधनामुळे भगीरथ यांना सहानुभूती मिळेल असे वाटत होते. मात्र, महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्र असतानादेखील भगीरथ यांना पराभव पत्करावा लागला. वास्तविक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद भगीरथ यांच्यामागे उभी केली होती.करमाळ्याचे आमदार आणि अजित पवार यांच्ये विश्‍वासू संजय शिंदे यांच्याकडे या मतदारसंघाची पूर्ण जबाबदारी पवार यांनी दिली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक होती. तीन्ही पक्षांची एकत्रित ताकद पाहता भाजपाचा टिकाव लागणे अवघड दिसत होते. मात्र, प्रत्यक्षात महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष कमी पडल्याने अवताडे यांचा अवघड असलेला विजय सोपा झाला.अवताडे यांच्या जवळचे सिद्धेश्‍वर अवताडे यांनी बंडखोरी केली. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी माघार घेऊ नये यासाठीदेखील प्रयत्न झाले. प्रत्यक्षात सिद्धेश्‍वर अवताडे यांना फारसा प्रभाव दाखवता आला नाही.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख