राज ठाकरेंच्या ताफ्यात नसण्याचे वसंत मोरेंनी सांगितले कारण...
कोरेगाव भीमा (जि. पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाठोपाठ पुण्याचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी वाघोलीत आपण वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत वढूत पोचू शकलो नसल्याचे सांगितले. तसेच, उद्या औरंगाबाद येथील सभेला कार्यकर्त्यांसह जाणार असल्याचे स्पष्ट केले. (Vasant More told reason he was not in Raj Thackeray's convoy...)
वढू बुद्रूक येथून राज ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा पुढे गेल्यानंतर नगरसेवक मोरे वढूत पाेहोचले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी ‘आपण आजही राज ठाकरे यांच्याच सोबत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाबाबत आपणांस शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी फोन केला नसल्याचे सांगितले. वाघोलीत वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे मी राज ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकलो नाही, असे सांगितले. मात्र, मी उद्याच्या औरंगाबाद येथील सभेलाही कार्यकर्त्यांसह जाणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, आपण आजारी असल्याच्या अफवा विरोधक खोडसाळपणे पसरवत आहेत. मी ठणठणीत असून सकाळीच जिममध्ये व्यायाम करून आल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणुकीतही विजयाचा चौकार मारुनच विरोधकांना सडेतोड उत्तर देणार आहोत. तसेच, उलट इतरांनाच आजारी पाडीन, अशी कोपखळीही मोरे यांनी विरोधकांना मारली. या वेळी वसंत मोरे यांचा वढू ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सारिका अंकुश शिवले आणि उपसरपंच हिरालाल तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनसेचे उपाध्यक्ष हेमंत बत्ते, संपत गाडे, वाघोली क्षेत्रीय कार्यालयाचे अधीक्षक संजय शिवले व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, औरंगाबादला रवाना होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी शनिवारी (ता. ३० एप्रिल) सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. समाधिस्थळी पूजा अभिषेक व ध्येयमंत्र झाल्यानंतर ठाकरे यांनी समाधिस्थळी प्रदक्षिणा घालून शंभूराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. पौरोहित्य करणारे वढू बुद्रुक येथील अविनाश मरकळे यांच्याशी संवाद साधत राज ठाकरे यांनी येथील नित्यपूजा व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाची माहिती घेतली. यावेळी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने शंभुभक्त येत असल्याची माहिती घेतल्यानंतर येथील कार्यक्रमाला यायला नक्की आवडेल, असेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.