'भाजप सगळ्यात मोठा पक्ष; तरी बारामतीमध्ये खासदार नाही? कार्यकर्त्यांनी विचार करावा!'

Baramit News : भारतीय जनता पक्ष हा जगांमध्ये दखल घेतलेला पक्ष असल्याचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी म्हटले आहे
Pralhad Singh Patel
Pralhad Singh PatelSarkarnama

भिगवण : भारतीय जनता पक्ष हा जगांमध्ये दखल घेतलेला पक्ष, देशातील सर्वात प्रबळ पक्ष, पक्षाचे देशामध्ये सर्वाधिक खासदार, सर्वाधिक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असे असताना बारामती (Baramati) लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचा (BJP) खासदार नाही, याचा कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सध्या हवा बदलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी योजनांमुळे व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार हा भाजपचा असेल, असा विश्वास केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला.

येथील तारादेवी लॉन्स येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. भाजपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार राम शिंदे (Ram Shinde), माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य मारुतराव वणवे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, जालिंदर कामठे, धर्मेंद्र खांडरे, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक एम. पी. धुमाळ तसेच स्वच्छता कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Pralhad Singh Patel
किर्तीकरांच्या माध्यमातून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न; लोकाधिकार समिती अन् कार्यकारिणीवर डोळा

प्रल्हादसिंग पटेल पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकारण करणारा पक्ष नाही तर समाजकारण ही पक्षाची विचारधारा आहे. भाजप शासित गोवा, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये शंभर टक्के लोकांना नळाद्वारे पाणी दिले जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये प्रत्येक घरांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी का नाही? असा सवाल उपस्थित करत अनेक वर्षे सत्तेत असलेल्या येथील राजकारण्यांनी यासाठी जनतेची माफी मागितली पाहिजे, असा घाणाघात त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयुष्यमान भारत, मोफत कोराना लसीकरण, कोरोना काळात अन्न धान्य पुरवठा, गरिबांना घरे, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. इतर पक्ष हे राजकारण करणारे पक्ष आहेत तर भाजप हा राष्ट्र निर्माण करणारा पक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, माजी खासदार शंकरराव पाटील यांनी बारामती लोकसभा व इंदापुर विधानसभा मतदार संघाची बांधणी केली आहे. सध्या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये परिवर्तनाची लाट आहे. बारामती लोकसभा तसेच इंदापुर व कर्जत विधान सभा मतदार संघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बारामती लोकसभा मतदार संघातील परिवर्तनांमध्ये इंदापुर तालुका महत्वपूर्ण भूमिका निभावेल. यावळी हर्षवर्धन पाटील यांनी उजनी धरण प्रदुषण, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न, तसेच मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्याची विनंती केली.

Pralhad Singh Patel
Bharat Jodo Yatra ..तुमचाच आवाज त्याच्या तोंडून निघायचा : राहुल गांधी सातवांच्या आठवणीत भावूक!

या वेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले, प्रल्हादसिंग पटेल यांनी विविध राज्याचे प्रभारी म्हणुन काम करत असताना त्यांनी राज्यांमध्ये परिवर्तन घडवुन आणले आहे. प्रल्हादसिंग पटेल आणि परिवर्तन हे समीकरण आहे. २०१९ मध्ये अमेठीमध्ये परिवर्तन झाले २०२४ बारामतीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रास्ताविक इंदापुर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले व रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर आभार माजी उपसरपंच जयदीप जाधव मानले. मेळाव्यासाठी इंदापुर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com