गायकवाडच्या घरातून नोटा मोजण्याच्या दोन मशिन,  ७० लोकांचे विनासह्यांचे खरेदीखत जप्त
Gaykwad pitaputra

गायकवाडच्या घरातून नोटा मोजण्याच्या दोन मशिन, ७० लोकांचे विनासह्यांचे खरेदीखत जप्त

अनेक कागदपत्रे नष्ट केल्याचा आरोप...

पुणे : नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश (Nanasaheb Gaykwad and Ganesh Gaykwad) यांच्या अडचणी वाढतच असून त्यांच्याविरोधात नवीन पुरावे पोलिसांना सापडत आहेत. ईएसए मॉडेल २०० एअर रायफल, ३१ जीवंत काडतुसे असलेले ३२ कॅलीबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशिन आणि नानासाहेब गायकवाड, संजीव मोरे व इतर ७० लोकांकडून घेतलेले विना सह्यांचे खरेदीखत औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घरात मिळून आले आहे. तसेच पोलिसांना दोन पानी कागद मिळाला असून त्यावर १४ लोकांची नावे आहेत. नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहिण्यात आली आहे.

खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घराची पोलिसांनी नुकतीच घरझडती घेतली. त्यात हा सर्वे मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे. पोलिसांना या प्रकरणी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर इलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाइल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची एक मशिन मिळून आली आहे, अशी माहिती सरकारी वकील विजय फरगडे यांनी शुक्रवारी (ता. २७) न्यायालयास दिली.

मूळ फिर्यादीतर्फे  पुष्कर दुर्गे, सचिन झालटे, ऋषिकेश धुमाळ कामकाज पाहत आहे. सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिस तपासातील मुद्दे :
- नंदा गायकवाड हिने साथीदारांच्या मदतीने गुन्ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र व पुरावे इतर ठिकाणी हलविले
- वडगाव बुद्रूक येथील फ्लॅटमध्ये मिळालेल्या डाय-यांमधील पाने नंदा यांनी फाडली
- नानासाहेब गायकवाड हे नेहमी रिव्हॉल्वर सोबत ठेवत
- गणेश गायकवाड हा तो वापरत असलेले मोबारईल मुंबई येथे विसरला असल्याचे सांगत आहे
- साक्षीदाराचे लॉकर उघडून त्यांची चावी आरोपींनी स्वतःकडे ठेवली आहे.

Related Stories

No stories found.