पक्षश्रेष्ठींची नाराजी जुन्नरच्या नगराध्यक्षांना भोवली! शिवसेना नेत्यांनी फिरवली पाठ

शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींना विश्‍वासात न घेता कार्यक्रम केल्याची नाराजी भोवली आहे.
Shivsena
Shivsena Sarkarnama

पुणे : जुन्नर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेनेच्या (Shivsena) विविध मंत्र्यांनी आणि उपनेते, जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींना विश्‍वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला बळी पडत कार्यक्रम केल्याची नाराजी भोवल्याची चर्चा सध्या शहर आणि तालुक्यात आहे.

शाम पांडे हे शिवसेनेचे जुन्नरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने शहरातील प्रमुख पाचरस्ता चौकात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना देण्यासाठी नगराध्यक्ष पांडे हे पक्षाच्या नेत्यांना विश्‍वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्या समवेत परस्पर गेल्याने पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली होती. पांडे यांच्या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळीकीमुळे पांडे हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चाही सुरू आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता.२२) छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र शिवसेनेच्या या प्रमुख मंत्र्यांनी कार्यक्रमाला येण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनचे स्थानिक नेते देखील कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यामध्ये उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार शरद सोनवणे यांचा समावेश होता.

तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व्यासपीठाच्या खाली

शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांच्यासह विविध पदाधिकारी व्यासपीठाच्या नागरिकांमध्ये एका कोपऱ्यात बसणे पसंत केले. तसेच तालुका प्रमुख खंडागळे यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर जाणे टाळले.

Shivsena
झुकेगा नही! 92 वर्षांच्या आजीचा राणा दांपत्याला 'पुष्पा'स्टाईल इशारा अन् लगेचच ठाकरेंचा फोन

नगराध्यक्षांबद्दल शिवसेनेत नाराजी

नगराध्यक्ष शाम पांडे यांच्याबाबत शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या नाराजी बाबत शिवसेनेचे माजी गटनेते आणि उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी यांनी उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे सातत्याने तक्रारी करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आढळराव यांनी पांडे यांना सातत्याने पाठीशी घातले. मात्र याच पांडे यांनी आढळराव यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले नसल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.

Shivsena
राजकारणाची घसरती पातळी चिंताजनक! आव्हाडांनी दाखवला आरसा

शिवसेना पदाधिकारी, मंत्र्यांना विश्‍वासात घेतले नाही

शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष शाम पांडे आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही. मंत्र्यांनाही व्यवस्थित निमंत्रणे दिली गेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला हा कार्यक्रम स्वतःच्या पक्षाचा करायचा होता. त्यांना शिवसेनेचा प्रभाव नको होता. नगराध्यक्ष पांडे यांच्याबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे, अशी माहिती शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in