आता हद्द झाली.... रेमडिसिव्हरच्या रिकाम्या बाटल्यांत पॅरासिटाॅमाल भरून चढ्या दराने विक्री - this too much now as cheater selling paracetomol instead of Redimisiver | Politics Marathi News - Sarkarnama

आता हद्द झाली.... रेमडिसिव्हरच्या रिकाम्या बाटल्यांत पॅरासिटाॅमाल भरून चढ्या दराने विक्री

मिलिंद संगई
शनिवार, 17 एप्रिल 2021

सरकार कधी तुटवडा संपवणार?

बारामती : राज्यात रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झालेले असताना दुसरीकडे त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याची वृत्तीही बळावली आहे. चढ्या दराने या इंजेक्शनची विक्री करणे, मुदत संपलेल्या औषधांना नव्या तारखेचे स्टिकर लावून ग्राहकांच्या गळ्यात मारणे असे प्रकार आतापर्यंत निदर्शनास आले होते. आता मात्र रेमडेसिव्हर इंजेक्शनमध्ये पॅरासिटीमॉल मिसळून इंजेक्शन म्हणून देणा-या चौघांना बारामती तालुका पोलिसांनी काल रात्री पकडले. 

1300 रुपयांचे रेमेडसिव्हर इंजेक्शन 35 हजाराला विक्री करणा-या एका युवकाला जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून ही माहिती उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. ही इंजेक्शन घेतल्याने काही रुग्णांचा मृत्यूही झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून या बाबत पोलिस सखोल तपास करणार आहेत. 

बारामती शहरातील फलटण चौकात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी संबंधित युवकाने बोलाविल्यानंतर सापळा लावून तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एक इंजेक्शन 35 हजार या प्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार  रुपये घेतले गेले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या झालेल्या रेमेडसिवीरच्या मोकळया बाटल्या आणून त्यात सिरींजने पॅरासिटीमॉल मिसळून पुन्हा फेव्हिक्विकच्या मदतीने या बाटल्या बंद करुन पुन्हा त्या बाजारात नव्या म्हणून काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरु होता.  या बाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले असून आता लवकरच या बाबत फिर्याद दिली जाणार आहे. 

पुण्याला 4313 रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध

पुण्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनची टंचाई संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही आज केवळ 4313 रेमडिसिव्हर इंजेक्शन्स उपलब्ध झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या ग्राणीण भागातील रुग्णालयांना ती थेट दिली जाणार आहेत. कोरोनाचे 7137 गंभीर रुग्ण पुण्यात आहेत. 

ऑक्सिजन बेड आणि व्हेंटीलेटर याप्रमाणात शहरातील रुग्णालयांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय
जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात
तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ सुरू आहे. संपूर्ण पुण्यात फिरूनही रुग्णाचे प्राण वाचविण्यसाठी एकही इंजेक्शन मिळत नाही, या संतापाचा उद्रेक गुरुवारी झाला. रुग्णांच्या संतप्त नातेवाइकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याची गंभीर्याने दखल जिल्ह्याधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी घेतली.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वितरणाची सद्यःस्थिती काय आहे, याची माहिती हे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयांमधील एकूण किती खाटा आहेत? त्यापैकी किती ऑक्सिजन आणि किती व्हेंटीलटेर्स आहेत त्याची सविस्तर माहिती घेऊन त्या प्रमाणात रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रांत अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत चार हजार ३११ रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाली. हे सर्व इंजेक्शन तीनशे रुणालयांमध्ये ऑक्सिजन खाटा आणि व्हेटीलेटर्स या निकषांवर वितरित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

राज्यातही या इंजेक्शनची टंचाई असून अन्न व औषध प्रशासनमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत आज आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की हे इंजेक्शन आज मागणीपेक्षा १२ हजार ते १५ हजार ने कमी मिळाले आहेत. त्यामुळे हा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्राला रोजी 55 हजार इंजेक्शन पुरविण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली होती. प्रत्यक्षात  तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी ते पुरवले आहे. येत्या २० एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन कंपन्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

निर्यातबंदीमुळे रेमडेसिव्हरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात या कंपन्यांना त्यांचा माल इथं विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांशी देखील बोलणं झालं आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचं काम आमच्या विभागाकडून सुरू आहे.” अशी माहिती यावेळी शिंगणे यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख