
Pimpri Chinchwad : आंतरवाली सराटीत (ता.अंबड) फौजफाटा घुसवून जालियानवाला बाग घडविण्याचे फर्मान फोनवरुन कोणी सोडले, तेथे लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? अशी विचारणा करत त्याचा शोध लागलाच पाहिजे, अशी मागणी `सामना`च्या अग्रलेखातून सोमवारी करण्यात आली. त्यांचा रोख हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने होता. त्याचा समाचार भाजपच्या आक्रमक नेत्या व महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लगेचच घेतला.
भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी ट्विट करत उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ह्या 'सामना'वीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या,या शब्दांत वाघांनी हल्लाबोल चढविला. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल,असे त्या म्हणाल्या. पण,देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सरकारने दिलेले आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा 'जनरल डायर' हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते,असा घणाघात त्यांनी केला.
तुम्ही भगोडे आणि कायर आहात...
त्यांच्या नाकर्त्या धोरणाची परिणती सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण धारातीर्थी पडण्यात झाली. आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर आहात, असा हल्लाबोल त्यांनी ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही टॅग केलेल्या ट्विटमधून वाघांनी केला.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीच्या तोंडावर वाघांनी आघाडीतील पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यास सुरवात केली आहे.त्यातही त्यांचे खरे लक्ष्य हे ठाकरे शिवसेना आणि उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) हेच आहेत.
आजही त्यांनी ठाकरे यांनाच थेट जनरल डायरची उपमा दिली आणि 'सामना'तून फडणवीसांचे नाव न घेता त्यांनाच जनरले डायर संबोधलेल्याची लगेच सव्याज परतफेड केली. त्यावर उद्या राऊत वा ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.