
Pune News: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर गुरुवारी(दि.११) निकाल दिला. यात उध्दव ठाकरेंना दिलासा मिळाला असला तरी शिंदे सरकार तरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राजकीय नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँगेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोठं विधान केलं आहे.
अजित पवारi(Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरही बोट ठेवलं आहे.
पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा शिंदे फडणवीस सरकारला काही परिणाम होणार नव्हता हे आधीच मी स्पष्ट केलं आहे. कारण १६ आमदार जरी अपात्र ठरले असते तरी त्यांच्याकडं बहुमत होतं. त्यामुळे हे सरकार टिकणारच होतं हे मी आधीच स्पष्ट केलं होतं.
मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला...
आमच्या त्यावेळच्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोलें(Nana Patole) नी राजीनामा दिला. एकतर तो द्यायलाच नको होता आणि दिला तर तो पण मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला. राजीनामा दिल्यावरच ते सांगितलं गेलं. बरं दिला तर लगेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावून तो विषय संपवायला पाहिजे होता.
पण दुर्दैवानं तसं झालं नाही. याला मी अजिबात कोणा एकाला दोषी धरणार नाही. पण महाविकास आघाडीकडूनच जर तो विषय त्याचवेळेस धसास लागला असता आणि नवीन अध्यक्षाची निवड झाली असती तर हा प्रश्नच उद्भवला नसता. पण तो वेळीच मार्गी न लागल्यामुळे अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्षच सभागृहाचे काम पाहत होते असंही पवार यावेळी म्हणाले.
मात्र, हे सगळं घडल्यानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी लगेच विधानसभा अध्यक्षाचं पद भरलं. पण हेच जर अगोदर ती जागा भरलेली असती तर त्या अध्यक्षांनी १६ बंडखोर आमदारांना अपात्र केलं असतं असं मतही पवार यांनी व्यक्त आहे.
अरुण गुजराथी हे विधानसभेचे अध्यक्ष असताना सहा आमदारांनी बंड केलं होतं आणि वेगळी राजकीय भूमिका घेत पुढं जाण्याचा निर्णय घेतला होता. अशावेळी विधानसभा अध्यक्ष या नात्यानं गुजराथी यांनी त्या सहा आमदारांना अपात्र केलं आणि ते सरकार तरलं असा दाखला पवार यांनी केला आहे.
(Edited By- Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.