
पुणे : राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, शासनाने दिलेल्या पत्रांच्या संदर्भानुसार शहरात १६६ नगरसेवक असणार हे निश्चित आहे. मात्र यासाठी प्रभाग तीनचा असणार की चारचा? याबाबत प्रशासनच गोंधळात पडले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुढील स्पष्टीकरणाची वाट पाहिली जाणार आहे. (PMC Election Latest News)
गेल्या दीड वर्षापासून महापालिकेच्या प्रभाग रचनेचा गोंधळ सुरू आहे. सुरूवातीला राज्य सरकारने पुण्यात एकच सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर महाविकास आघाडीतील मतभिन्नतेमुळे शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी यातून मार्ग काढत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार पुणे महापालिकेने (PMC ) ५७ प्रभाग तीन सदस्यांचे तर एक प्रभाग दोन सदस्यांचा करण्यात आला.
दरम्यान, ही प्रभाग रचना आणि आरक्षित जागा अंतिम झाली. त्यामुळे निवडणूक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्यात सत्तापरिवर्तन होताच शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकेच्या निवडणूका २०१७ प्रमाणे होतील, असे जाहीर केले.
महापालिकांमध्ये नगरसेवकांची वाढविलेली संख्या कमी केल्याने त्यानुसार पुणे पालिकेत १७३ ऐवजी १६६ नगरसेवकच आता असणार आहेत. मात्र यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांमुळे पुढे काहीही झाले नाही. आता २८ नोव्हेंबर रोजी याच विषयावर सुनावणी होणार असताना राज्य सरकारने पुन्हा नव्याने प्रभाग रचना करा असे आदेश दिले.
शिंदे-फडणवीस सरकारने २०१७ प्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्याने चारचा प्रभाग होणार, असे सांगितले गेले. मात्र तसा आदेश अद्याप महापालिकांना दिला गेला नाही.तर दुसरीकडे १७ जानेवारी २०२२ रोजीच्या राजपत्रात '‘प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तिथपर्यंत तीन पालिका सदस्य मात्र,दोनपेक्षा कमी नाही व चारपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील’’ असे नमूद केले आहे. या राजपत्रानुसार तीन सदस्यांच्या प्रभागांची संख्या जास्त असावी असे सूचीत केले आहे. तर हे राजपत्र अद्यापही रद्द केलेले नसल्याने नवी प्रभाग रचना कशी करावी याचा संभ्रम आहे.
दरम्यान, ‘‘महापालिकेला पत्र नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करावी ,असे पत्र पाठवले आहे. पण किती सदस्यांचा प्रभाग असावा हे निश्चीत नाही. त्यामुळे पुढील आदेशानंतर कार्यवाही सुरू होईल.", असे निवडणूक शाखा उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले. तर ‘‘महापालिका निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगासोबत ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे.या बैठकीमध्ये प्रभाग रचनेबाबत काय करायचे आहे याबाबत स्पष्टता आणली जाईल.’’, असे मत आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
प्रगाग रचनेची संभाव्य आकडेमोड
राज्य सरकारने १७३ ऐवजी १६६ नगरसेवक संख्या निश्चीत केली आहे. तीन सदस्यांचे प्रभाग झाल्यास तीन प्रभाग कमी होणार आहेत. यामध्ये ५५ प्रभाग तीन सदस्यांचे आणि १ प्रभाग चार सदस्यांचा असू शकतो. तर चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास ४ सदस्यांचे ४१ प्रभाग आणि एक प्रभाग २ सदस्यांचा होऊ शकतो. किंवा ४ सदस्यांचे ४० प्रभाग आणि दोन प्रभाग तीन सदस्यांचे होऊ शकतात.
महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचे आकडे
- निवडणूक २०११च्या जनगणनेनुसार होणार
- ३५.५६ लाख इतकी लोकसंख्या आधार मानून प्रभाग रचना होणार
- अनुसूचित जातीची लोकसंख्या ४.८० लाख असणार
- अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४१, ५६१ असणार
- चार सदस्यसाठी प्रभागाची सरासरी लोकसंख्या ८५७०८ असेल
- तीन सदस्य प्रभागासाठी सरासरी लोकसंख्या ६४,२८१ असेल
- ही संख्या १० टक्के कमी जास्त हो शकते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.