दहावी ‘सीबीएसई’चा निकाल २० जूनपूर्वी: ‘एसएससी’ बोर्डाचा निर्णय कधी होणार ? - Tenth CBSE result before June 20: When will the SSC board decide? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

दहावी ‘सीबीएसई’चा निकाल २० जूनपूर्वी: ‘एसएससी’ बोर्डाचा निर्णय कधी होणार ?

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

राज्य मंडळाच्या एसएससी बोर्डाचे निकाल कधी लागणार याची चिंता विद्यार्थी-पालकांना लागून राहिली आहे.

पुणे : कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सीबीएसई परीक्षा मंडळाने अंतर्गत मूल्यांकनाआधारे २० जूनपूर्वी निकाल जाहीर करण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र,कोणत्या निकषांच्या आधारे मूल्यांकन करायचे याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने अद्याप घेतलेला नाही. परिणामी राज्य मंडळाच्या एसएससी बोर्डाचे निकाल कधी लागणार याची चिंता विद्यार्थी-पालकांना लागून राहिली आहे.

राज्यात दहावीचे सुमारे सोळा लाख विद्यार्थी आहेत. कोरोना काळात संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग होऊ शकले नाहीत. या काळात बहुतांश विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी इंटरनेटच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनदेखील शिकता आलेले नाही. या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. दहावी तसेच पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीची परीक्षा या महिनाअखेर किंवा जून महिन्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहाता बारावीची परीक्षादेखील कधी होतील याबाबत साशंकता आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मूल्यमापन करणार का ? कोणत्या निकषांच्या आधारे करणार? अंतर्गत मूल्यांकन करायचे झाल्यास त्याचे निकष काय ? या बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, पंधरा दिवसांनंतरही अद्याप त्यावर कोणताच ठोस निर्णय झालेला नाही.

अंतर्गत मूल्यांकनाच्याआधारे दहावीचा निकाल येत्या २० जूनपूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचे सीबीएसई परीक्षा मंडळाने सोमवारी जाहीर केले. त्यामुळे राज्य सरकार निकाल कधी जाहीर करणार याविषयी विद्यार्थी-पालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सीबीएसई असेल वा आयसीएसई, आयबी यासारख्या देशी-विदेशी परीक्षा मंडळांची अंतर्गत मूल्यमापनाची व्यवस्था आहे. वर्षानुवर्षे ती व्यवस्था त्यांच्याकडे आहे. राज्य मंडळाकडे अतंर्गत मूल्यमापनाची व्यवस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे मूल्यमापन करायचे झाले तर कशा पद्धतीने करायचे, त्याचे निकष काय यावर अद्याप निर्णयच झालेला नाही. परिणामी राज्य मंडळाच्या परीक्षांचा निकाल कसा व कधी लावणार याबाबत सध्या कोणतीच माहिती उपलब्ध नाही. राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्य मंडळातील आधिकारी बोलायला तयार नाहीत. शालेय शिक्षण विभाग ज्याप्रमाणे निर्णय घेईल त्यानुसार आम्ही कार्यवाही करू, असे आधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
----

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख