झिकाचा रुग्ण आढळला अन् केंद्रीय पथक तातडीनं पुण्यात

देशात केरळ राज्यात पहिल्यांदा झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत.
झिकाचा रुग्ण आढळला अन् केंद्रीय पथक तातडीनं पुण्यात
Team of experts rushed to pune as Zika patient found

नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे नुकताच झिका आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण असल्यानं खळबळ उडाली आहे. त्यानंतर राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून केंद्र सरकारनंही गांभीर्यानं दखल घेतली आहे. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल होणार आहे. (Team of experts rushed to pune as Zika patient found)

देशात केरळ राज्यात पहिल्यांदा झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत. तिथे झिकाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर झिकाचा रुग्ण आढळलेलं महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्णही पुणे शहरात आढळून आला होता. त्यानंतर झिकाचा रुग्णही पुणे जिल्ह्यातही सापडल्याने खळबळ उडाली आहे. मागील वर्षी 9 मार्च रोजी कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. 

आता झिकाचा रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात दि. 30 जुलै रोजी आढळला आहे. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना सुरू कऱण्यात आल्या आहेत. बेलसर गावातील पाच किलोमीटर परिसरातील नागरिकांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनेही पावले टाकली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल होणार आहे. 

दरम्यान, बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणु आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. 

काय आहे झिका आजार..

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून, या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. गर्भवती महिलेस हा आजार झाल्यास होणाऱ्या बाळाच्या डोक्याचा घेर कमी (मायक्रोसेफाली) असू शकतो. तथापी हे सप्रमाण सिध्द झालेले नाही तरीही या दृष्टीने गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.